भारतमातेचा ‘बॅरिस्टर’ : स्वातंत्र्यवीर सावरकर !
१४ जुलै १९०९ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘बॅरिस्टर’ पदवी देण्याचे नाकारण्यात आले. त्या निमित्ताने…
१४ जुलै १९०९ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘बॅरिस्टर’ पदवी देण्याचे नाकारण्यात आले. त्याचे औचित्य साधून त्याविषयीच्या उपलब्ध असलेल्या माहितीला अनुसरून सावरकरांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांची माहिती ‘भारतमातेचा बॅरिस्टर’ या लेखस्वरूपात येथे मांडत आहे. १३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘राष्ट्रभक्तीला सुरुंग लावण्यासाठी इंग्रजांनी रचले कटकारस्थान आणि क्रांतीकारकांची माहिती समजण्यासाठी इंग्रजांनी पाठवला घरभेदी’, यांविषयीची माहिती वाचली.
आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहे.
(भाग २)
३. भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटीश सरकारशी राजनिष्ठ बनवण्याचा प्रयत्न करणारे कर्झन वायली !
मे १९०९ मध्ये सर कर्झन वायली यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हरनामसिंग यांना ‘ग्रेजइन इन्स्टिट्यूट ऑफ लॉ’ या संस्थेची ‘बॅरिस्टर’ ही सनद मिळू नये; म्हणून पुष्कळ खटपट केली. भारतीय विद्यार्थ्यांना राजनिष्ठ बनवण्याची धडपड कर्झन वायली करत होते. या कार्याचे प्रमुखपद त्यांनी स्वतःकडेच ठेवले होते. वर्ष १८६७ मध्ये लेफ्टनंट कर्झन वायली हे सैनिकी अधिकारी म्हणून प्रथम भारतात आले. वर्ष १८७० मध्ये ते अयोध्या प्रांताचे ‘असिस्टंट कमिशनर’ (उपायुक्त) म्हणून काम करू लागले. नंतर ते भारत सरकारच्या राजकीय सेवेत शिरले. कंदहारच्या लढाईत त्यांनी सहभाग घेतला होता. बडोदा, भावनगर (गुजरात) अशा अनेक संस्थानांमध्ये राज्यकारभाराविषयी सल्ला देणारा ब्रिटीश अधिकारी म्हणून ते काम करू लागले. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा उदयपूरला दिवाण असतांना एका प्रकरणात त्यांची आणि व्हॉईसरॉयची भेट होऊ न देता कर्झन वायलींनी त्यांना ‘दिवाण’ पदावरून काढून टाकले. भारतातील विद्यार्थ्यांची विशेष माहिती ते मिळवत असत. कर्झन वायली हे ‘इंडिया ऑफिस’चे सूत्रसंचालक होते.
३ अ. सावरकर यांनी वर्णन केलेले कर्झन वायली ! : सावरकर कर्झन वायली यांच्याविषयी सांगतांना म्हणाले होते, ‘‘सर कर्झन वायली यांना ओळखत नाही, असा एकही भारतीय नागरिक इंग्लंडमध्ये आढळणार नाही. ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट्स’चे प्रत्यक्ष डोळे म्हणजे कर्झन वायली होय. भारतातसुद्धा इंग्रजी साम्राज्याची प्रामाणिक सेवा करून त्यांनी नावलौकिक संपादन केला.’’
४. सावरकर यांनी गुप्तहेरांना दिलेली हुलकावणी आणि त्यात दिसलेले त्यांचे चातुर्य !
स्कॉटलंड यार्डच्या सहकार्यांना (गुप्तहेरांना) हुलकावणी देण्यासाठी सावरकर काही युक्त्यांंचा अनेकदा उपयोग करायचे. रस्त्याने जातांना काही अंतर ते मित्रांसमवेत गप्पा मारत जायचे आणि नंतर बोलता बोलता एखाद्या भाड्याच्या टॅक्सीत बसून निघून जात. हा त्यांचा नेहमीचाच खेळ होता. तिथे दुसरी टॅक्सी नसल्यामुळे त्यांच्या मागावर असलेला सहकारी हतबल होऊन जागीच उभा रहात असे. सावरकर यांनी शोधलेली ही युक्ती जगातील अनेक क्रांतीकारकांनी जशीच्या तशी कार्यवाहीत आणली होती. सावरकरांचे समकालीन असलेले रशियन क्रांतीकारक लिआँ ट्रॉटस्की यांनीही ही युक्ती कृतीत आणली होती. याचा उल्लेख त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रात केला आहे.
कधी कधी सावरकर हे गुप्तचरांना प्रेमाची वागणूक देत. याविषयी लिआँ सांगतात, ‘‘आम्ही अनेक वेळा सावरकर यांच्या हातावर छत्र्या अडकवून मोकळेपणाने चालत होतो. त्यांना आमच्या छत्र्या घेऊन मुकाट्याने आमच्या मागे यावे लागे. त्यामुळे गुप्तहेरांना त्यांचे काम सहजपणे करता येत होते आणि त्यांना बारीक लक्षही ठेवता येत असे. कधी कधी हे गुप्तचर सावरकरांच्या मागोमाग त्यांच्या खोलीतसुद्धा शिरायचे. अशा वेळी सावरकर जाणीवपूर्वक कागदाचा एखादा चिठोरा घाईघाईने उचलून खिडकीतून बाहेर फेकून देत. अशा प्रकारे अनेक वेळा सावरकर यांनी गुप्तहेरांना वेगवेगळ्या युक्त्या वापरून हुलकावणी दिली आहे.’’
५. सावरकर यांनी ‘ग्रेजइन’विषयी श्यामजी कृष्ण वर्मा यांना पत्राद्वारे कळवले !
‘ग्रेजइन’ने शिस्त राखण्याच्या उपायांवर विवेचन करण्यासाठी नेमलेल्या एका समितीने धाडलेले प्रतिवृत्त १२ मे १९०९ या दिवशी प्रसिद्ध व्हायचे होते. ‘त्यासाठी पुरेसा पुरावा द्या’, याविषयी त्या विधी संस्थेचे डाऊथवॅट यांनी ६ मे या दिवशी सर कर्झन वायली यांना पत्राने कळवले. ही गोष्ट जेव्हा सावरकर यांना कळली, तेव्हा त्यांनी त्याविषयीची ‘ग्रेजइन’ची वृत्ती १२ मे १९०९ या दिवशी श्यामजी कृष्ण वर्मा यांना पत्राने कळवली. या पत्रात सावरकर लिहितात, ‘‘या सत्रात आमच्या ‘बॅरिस्टरी’ला मान्यता देण्याचे शेवटी नाकारण्यात आले आहे, ते आपल्याला इंग्रजी वृत्तपत्रावरून कळले असेल. ते आम्हा दोघांच्या (सावरकर आणि हरिनाम सिंग या दोघांच्या) बॅरिस्टरीला मान्यता देतात किंवा नाही, ही गोष्ट आम्ही सर्वस्वी दुर्लक्ष करण्यासारखीच आहे; पण खरा प्रश्न अधिक गोंधळात टाकणारा आहे. तो प्रश्न एका आठवड्याने बेंचर्सपुढे येईल, तोपर्यंत लिआँ यांनी ते विधान कोणत्या आधारावर केले आहे, ते आम्हाला कळणार नाही. माझी आणि हरिनाम सिंग यांची मातृभूमीची सेवा करतांना काही हानी झाली, तरी आम्हाला त्याची पर्वा नाही; पण मला येथे का अडकून पडावे लागत आहे ? याचे खरे कारण पॅरिसच्या मित्रांनाही कळावे आणि हे सर्व तुम्ही त्यांना सांगाल, अशी मी आशा करतो.’’
६. सावरकर यांना होणारा विरोध !
सर कर्झन वायली हे सावरकर यांच्या विरोधात पुरावा गोळा करण्यासाठी पॅरिसपर्यंत जाऊन पोचले. स्कॉटलंड यार्डचे निरीक्षक (इन्स्पेक्टर) पारकर आणि पोलीस हवालदार (कॉन्स्टेबल) हॅलेट यांना सावरकर यांच्या भाषणाचा आणि वार्ताहर लिंट स्मिथ यांना त्यांच्या प्रतिपादनाचा पुरावा देण्यास त्यांनी सिद्ध केले. लॉर्ड मोर्ले मिंटो हे सावरकर यांच्या क्रांतीकारी संघटनेने त्रस्त झाले होते. १५ मे १९०९ या दिवशी सिमल्याहून ‘इंडिया ऑफिस’ला त्यांनी एक तार पाठवली. या तारेतून त्यांनी कळवले, ‘ग्रेजइन’ने ‘बॅरिस्टरी’ची सनद देण्याचे लांबणीवर टाकले आहे. त्यात विनायक दामोदर सावरकर हे नाव असेल, तर निराळ्या टपालाने त्याच्या राजद्रोही चळवळीच्या पुराव्यांचे कागद आम्ही तुमच्याकडे पाठवत आहोत.’
७. ‘ग्रेजइन’कडून सावरकर यांच्याकडे खंडण सादर करण्याची मागणी !
‘सावरकर आणि हरिनाम सिंग यांनी त्यांच्यावरील आरोपांचे २२ मे १९०९ च्या आत खंडण करावे, नाही तर ९ जून १९०९ या दिवशी त्यासाठी ‘ग्रेजइन’च्या विद्यापिठापुढे त्यांना प्रत्यक्ष उपस्थित रहावे लागेल’, असे ‘ग्रेजइन’ने कळवले. ‘तो पुरावा ५ जूनच्या आत पाठवावा’, असे मॉरिसन यांनी भारत सरकारचे चार्ल्स लायल यांना कळवले.
लॉर्ड मोर्ले मिंटो यांना ‘इंडिया ऑफिस’ने १९ मे १९०९ या दिवशी ‘दोघांपैकी एक विद्यार्थी सावरकरच होते’, असे कळवले. हा पुरावा २९ मे १९०९ या दिवशी लंडनला पोचला; पण सावरकर यांनी घरी पाठवलेली पत्रे आणि ‘वन्दे मातरम्’ हा ‘विहारी’ मासिकामधील निबंध हीच कागदपत्रे होती. त्यात राजद्रोही असे काहीच नव्हते.
८. जाणीवपूर्वक केलेले चौकशीचे नाटक !
१४ जुलै १९०९ या दिवशी ‘ग्रेजइन इन्स्टिट्यूट ऑफ लॉ’ या संस्थेच्या इतिहासात एक विलक्षण घटना घडली. त्या दिवशी ‘विनायक दामोदर सावरकर’ असे नाव मोठ्या आवाजात उच्चारण्यात आले. वास्तविक त्याची काहीही आवश्यकता नव्हती. यापूर्वी संस्थेने अनेक विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती; पण ती प्रकरणे आणि हे प्रकरण यांत पुष्कळ भेद होता. एखाद्या विद्यार्थ्याला तो अभ्यासात हुशार आहे किंवा परीक्षेत उत्तीर्णही झाला; पण त्याला प्रमाणपत्र देऊन पदवी द्यायची किंवा नाही, याविषयीचा निर्णय घेता येत नव्हता; म्हणून हे चौकशीचे नाटक जाणीवपूर्वक करण्यात आले. अशी घटना संस्थेत प्रथमच घडत होती. यापूर्वी असा प्रश्न कधीच उपस्थित झाला नव्हता.
९. इंग्रजांना ‘धगधगता निखारा’ वाटणारे सावरकर !
विनायक दामोदर सावरकर नावाच्या तरुणाने आपल्या ज्वलंत विचारांनी इंग्रजांच्या काळजात धडकी निर्माण केली होती. त्याने असे कोणते कृत्य केले होते की, हा तरुण इंग्रजांना धगधगता निखारा वाटावा…? ‘इंग्रजांच्या साम्राज्यातील सूर्य मावळत नाही’, असा संपूर्ण जगात बोलबाला होता. अशा बलाढ्य साम्राज्याच्या राजधानीत या देशभक्त तरुणाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली होती. ते साम्राज्य पूर्णत: पोखरून काढले होते. असे करतांना त्याने कोणताही पुरावा मागे ठेवला नाही. लंडनमध्ये वास्तव्य करणार्या या तरुणाने भारतातील सशस्त्र स्वातंत्र्यलढ्याच्या कार्यावर नियंत्रण ठेवले होते. त्यानेच भारतात पिस्तुले पाठवली, बाँब पाठवले; पण कोणताही ठोस पुरावा ब्रिटिशांच्या हाती लागला नव्हता; म्हणून ब्रिटीश सरकार काहीही करू शकले नाही. ‘हुतात्म्यांनो !’, हे पत्रक सावरकर यांनी काढून त्याचे सर्वत्र वाटपही केले. त्याच वेळी त्यांना अटक करण्याची इंग्रज सरकारची इच्छा होती; पण करायचे काय ? पुरावाच नव्हता.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.२.२०२३)
यापुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/701554.html |