गोहत्या थांबवण्यासाठी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !
विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने मोर्च्याचे आयोजन
सोलापूर – सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही व्हावी आणि गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद करू नयेत, या मागण्यांसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने १२ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, तसेच सर्वश्री विलास शहा, महेश भंडारी, केतन शहा, जय साळुंखे, नरेंद्र काळे, अंबादास गोरंटला, गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख प्रशांत परदेशी, बजरंग दलाचे नागेश बंडी, सेवा विभाग प्रमुख शीतलकुमार परदेशी, सहसंयोजक रवी बोल्ली, श्री. सतीश सिरसिल्ला, श्री. अविनाश कैय्यावाले यांसह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलीस प्रशासनाकडून गोहत्येवर बंदी घालणे अपेक्षित असतांना उलट गोरक्षकांवरच खोटे गुन्हे नोंद केले जात आहेत. शहर आणि जिल्हा येथे अनेक ठिकाणी सर्रास गोमांस विक्री होत आहे. गोवंश हत्याबंदी कायद्यासाठी पोलीस प्रशासनाने कार्यशाळांचे आयोजन करावे. भाकड गोवंशांसाठी सरकारी गोशाळा स्थापन करावी.
संपादकीय भूमिका :हिंदुत्वनिष्ठ शासन असतांना गोहत्या थांबवण्यासाठी हिंदूंना मोर्चे काढावे लागणे लज्जास्पद ! |