सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश स्थायी सदस्य देशांमध्ये नसतांना संयुक्त राष्ट्रे जगाचे प्रतिनिधित्व कसे करू शकतात ? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या जागतिक प्रतिनिधित्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी रोखठोक भूमिका !

  • प्रसिद्ध फ्रेंच वर्तमानपत्र ‘लेस इको’ने घेतली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत !

नवी देहली – भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला असून त्याला त्याचे उचित स्थान प्राप्त करण्याची पुन्हा एकदा आवश्यकता आहे. जेव्हा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशाला स्थायी सदस्यत्व प्राप्त नाही, तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद जगाच्या हिताविषयी बोलण्याचा दावा कशी काय करू करते ?, अशी रोखठोक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौर्‍यावर जायच्या आधी मांडली. पंतप्रधान निवासात ‘लेस इको’ या प्रसिद्ध फ्रेंच वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीने त्यांची मुलाखत घेतली. या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी हे १३ आणि १४ जुलै अशा दोन दिवसीय फ्रान्स दौर्‍यावर आहेत. त्यानंतर ते संयुक्त राष्ट्र अमिरातीच्या दौर्‍यावर जातील.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विश्‍वासार्हतेवर पंतप्रधान मोदी यांना संशय आहे का ?, या ‘लेस इको’च्या प्रतिनिधीच्या प्रश्‍नावर मोदी म्हणाले की, येथे विश्‍वासार्हतेचे सूत्र नाही, तर त्याहून मोठी गोष्ट आहे. मला असे वाटते की, जगाला दुसर्‍या विश्‍व युद्धानंतर संयुक्त राष्ट्रांनी बहुपक्षीय सरकारी व्यवस्थांविषयी प्रामाणिकपणे चर्चा करणे आवश्यक होते. गेल्या ८ दशकांत जागतिक स्तरावर बरेच पालट झाले आहेत. सदस्य देशांची संख्या चार पटींनी वाढली आहे. वैश्‍विक अर्थव्यवस्थेचे स्वरूप पालटले आहे. आपण नव्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत. नव्या शक्तींचा उदय झाला आहे. यामुळे सापेक्षदृष्ट्या वैश्‍विक संतुलनातही पालट झाले आहेत. आपल्याला तापमानवाढ, सायबर संरक्षण, आतंकवाद, अंतर्गत संरक्षण, कोरोना महामारी यांसारख्या नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद विसंगतीचे प्रतीक ! – पंतप्रधान

पंतप्रधान पुढे म्हणाले की, सध्याचे स्थायी सदस्य देश जगाचे वास्तविक प्रतिनिधी आहेत का, हा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. ज्या उद्देशाने त्यांना स्थायी सदस्य म्हणून स्थापित करण्यात आले, त्याची पूर्तता करण्यासाठी आज ते सक्षम आहेत का ? जगभरातील देशांच्या दृष्टीकोनातून संयुक्त राष्ट्र संघटनेचे महत्त्व राहिले आहे का ? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद विशेष करून या विसंगतीचे प्रतीक आहे. आपण याला वैश्‍विक संघटनेच्या रूपात कसे काय पाहू शकतो, जेव्हा आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांसारख्या महाद्वीपांकडे त्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले ? याचे विषम सदस्यत्व अपारदर्शक निर्णय घेण्याचे नेतृत्व करते.

भारत-फ्रान्स मैत्रीसंदर्भात मोदी यांचा दृष्टीकोन !

भारत-फ्रान्स मैत्रीच्या संदर्भात मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये व्यापक स्तरावर संबंध आहेत, तसेच त्यांच्यात रणनीतिक भागीदारी आहे. यांतर्गत राजकीय, संरक्षण, आर्थिक, मानवकेंद्रित विकास आणि स्थिरता यांचा सहभाग आहे. जेव्हा समान दृष्टीकोन आणि मूल्य असलेले देश द्विपक्षीय रूपाने एकत्र येऊन काम करतात, तेव्हा ते कोणत्याही आव्हानाला यशस्वीरित्या सामोरे जाऊ शकतात.

वर्ष २०४७ पर्यंत भारत विकसित देश बनेल !

भारताच्या विकासाच्या गतीवर बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, वर्ष २०४७ मध्ये आमच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असून त्या दृष्टीकोनातून आमची स्पष्ट भूमिका आहे. त्या दिशेने आम्ही कामही करत आहोत. आम्ही वर्ष २०४७ मध्ये भारताला विकसित राष्ट्र म्हणून पाहू इच्छितो. आम्ही अश एक अशी अर्थव्यवस्था आणू इच्छितो, जी जनतेचे शिक्षण, अन्न, स्वास्थ्य, पायाभूत सुविधा, संधी या सर्व आवश्यकता पूर्ण करू शकेल. भारत एक सशक्त संघीय लोकशाही बनून राहील. यामध्ये सर्व नागरिकांचे अधिकार सुरक्षित असतील. भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमध्ये वैश्‍विक नेता बनेल. भारत लोकशाहीच्या शक्तीचे सशक्त उदाहरण बनावा, अशी आमची इच्छा आहे.