१०८ कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येच्या प्रकरणी ‘सीबीआय’कडून अन्वेषण करा ! – सकल हिंदु समाजाचे प्रशासनास निवेदन
कोल्हापूर – १०८ कामकुमार नंदी महाराज यांची नुकतीच निर्घृण हत्या करण्यात आली. हे कृत्य मानवतेला काळीमा फासणारे असून जैन समाजासमवेत समग्र हिंदु समाजात दहशत पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक केले आहे. याचा सकल हिंदु समाज म्हणून आम्ही निषेध करतो. या कृत्यामागे मोठे षड्यंत्र असण्याची दाट शक्यता आहे, असे समाजाला वाटते. त्यामुळे या हत्येच्या प्रकरणाचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (सीबीआय) अन्वेषण करून कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हे निवेदन उपजिल्हाधिकारी संपत खिलारे यांनी स्वीकारले.
या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री सुधीर जोशी-वंदूरकर, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि श्री. उदय भोसले, श्री. संदीप घाटगे, जैन श्वेतांबर समाजाचे श्री. उत्तम ओसवाल, दिलीप रायगांधी उपस्थित होते.
कोल्हापूर बंदच्या वेळी दगडफेक करणार्या समाजकंटकांवर कारवाई करा ! – कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना निवेदन
कोल्हापूर – ७ जून २०२३ या दिवशी कोल्हापूर येथे नागरिकांनी पुकारलेल्या बंदच्या संदर्भात समाजमाध्यमांतून काही गंभीर चित्रफिती समोर येत आहेत. यात विशिष्ट समुदायातील समाजकंटक सार्वजनिक ठिकाणी दगड फेकतांना दिसत आहे. काही प्रत्यक्षदर्शीच्या मतानुसार अकबर मोहल्ला, तसेच काळा मशिद ते सोन्या मारुति चौक या भागात पेट्रोल बाँब फेकण्यात आले. यामुळे कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. दुर्दैवाने या समाजकंटकांवर आजपर्यंत कारवाई झालेली दिसत नाही. या निवेदनासमवेत आम्ही काही ‘व्हिडिओ’ जोडत आहोत. तरी या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आले.या प्रसंगी सकल हिंदु समाजाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.