रत्नागिरी जिल्ह्यात तात्पुरती नियुक्ती केलेल्या शिक्षकांना कामावरून केले कमी
रत्नागिरी – जिल्ह्यातील शिक्षकांचे स्थानांतर (बदली) केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी रोखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरती करण्याचा निर्णय येथील पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला होता. या निर्णयानुसार जिल्ह्यात एकूण ६८४ शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या; मात्र आता यातील काही शिक्षकांना कामावरून कमी करण्याचे पत्र पाठवल्याने या शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक स्थानांतर केल्यामुळे त्या त्या जिल्ह्यात गेले आहेत. यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायचे कुणी ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळांमध्ये शिक्षक नसल्याने ग्रामस्थांसह पालक आक्रमक झाले होते. अनेक ठिकाणी तर ‘आम्ही शाळा बंद करू’, अशी चेतावणी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता.
सहाव्या टप्प्यातील कायम केलेल्या शिक्षकांचे स्थानांतर करून त्यांना सोयीच्या शाळा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हंगामी स्थानिक पुन्हा बेरोजगार झाले आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी टाळण्यासाठी शाळेत रुजू झालेल्या या तात्पुरत्या शिक्षकांना शाळेत कार्यरत ठेवावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.