अधिक मास आणि सत्कर्मांचा संकल्प

१. मलमासाला लाभलेले पुरुषोत्तम नामाविधान

पुरुषोत्तम हे वासुदेवांचे, महाविष्णूंचे नाव आहे. पूर्वी या अधिक मासाला ‘मलमास’ हे नामाविधान होते, मग मलमासाला पुरुषोत्तमाने वरदान दिले की, ‘या मासामध्ये जे जे सत्कर्म घडेल, त्या प्रत्येक सत्कर्माचा प्रचंड गुणाकार होईल आणि ती सगळी सेवा पुरुषोत्तमाकडे रुजू होईल. या मासात उत्तमोत्तम सद्गुरु सेवा जो करील, त्याच्या आयुष्याचे खरोखर सार्थक झाल्याविना रहाणार नाही’, असे श्रीकृष्णाने मलमासाला दिलेले वरदान आपल्या पुराणांमध्ये नमूद केलेले आहे.

२. पुरुषोत्तम मासात काय करावे ?

२ अ. पुरुषोत्तम मासात अधिकाधिक सत्कर्म, दान, त्याग आणि सेवा करावी : पुरुषोत्तम मासामध्ये आपण जे जे काही चांगले काम करतो, सत्कर्म करतो, नाम घेतो, मंत्र म्हणतो, त्या सगळ्यांचा मोठा गुणाकार होतो. याचे आणखी एक कारण म्हणजे मनाचा कारक असलेल्या चंद्राचा प्रभाव अधिक मासामध्ये असतो; म्हणून अधिकाधिक सत्कर्म, दान, त्याग आणि सेवा ही सगळी या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्याला करायला हवी.

२ अ १. सत्कर्मांचा गुणाकार करणारा मास : हा गुणाकाराचा मास असल्याने आपण जे करू, ते सद्सद्विवेकबुद्धी, सारासार विचारशक्ती जागृत ठेवून करणे महत्त्वाचे आहे. या कालावधीत प्रत्येकाला तात्पुरता लोभ बाजूला ठेवून सत्कर्मांचा अमूल्य लाभ मिळवता आला पाहिजे. सत्कर्माचे मूल्य भविष्य काळात कधी तरी आपल्याला मिळणार असते आणि तेव्हा आपल्या जीवनाचे सोने होते, हे सुनिश्चित आहे. खरे सोने मिळण्यापेक्षा जीवनाचे सोने झाले, तर किती उत्तम ! बाजारातले सोने विकत घेऊन आपण खरे सुख मिळवू शकतो का ? त्यापेक्षा संपूर्ण जीवनाचेच सोने जर आपण करू शकलो, तरच आपला जन्म निश्चितपणे सार्थकी लागेल; कारण केवळ तेच सोने मृत्यूनंतरही आपल्या समवेत असेल.

२ अ २. लाभाचा गुणाकार करायचा कि लोभाचा ? हे आपणच ठरवावे ! : या पुरुषोत्तम मासामध्ये अशा प्रकारचे उत्तम सत्कर्म सोडून तात्पुरता स्वार्थ साधून देणारी काही तरी किरकोळ कामे करत राहिलो, तर नेमका कसला गुणाकार होईल ? याचा साधा विचार करावा. आपण गुणाकार कसला करणार आहोत ? सत्कर्माचा कि लोभाचा ? लोभाचा गुणाकार न करता लाभाचा गुणाकार करायचा असेल, तर नामाचा निश्चय केला पाहिजे.

– ब्रह्मलीन सद्गुरु बापट गुरुजी

(साभार : ‘गुरुतत्त्व (एक मार्गदर्शक), जून २०१८)

नामाचा निश्चय करावा !

नामाचा निश्चय झाल्यानंतर ते निश्चयी मनच सगळ्या लोभ-मोहादि असुरांना वठणीवर आणेल. आपण आपल्या सद्गुरूंचे सतत अनुसंधान ठेवले, तर आसुरी शक्ती आपल्यावर विजय मिळवू शकणार नाहीत. आपण वाईट शक्तींपासून कायमचे मुक्त होऊ. आपल्या जीवनाचा रथ एकदा सद्गुरूंकडे सोपवून दिला की, आपले काम झाले ! आपल्या कर्मगतीतून कसा मार्ग काढायचा ? ते सद्गुरु ठरवतील. ते बघतील की, याला कुठच्या रस्त्याने लवकरात लवकर नेता येईल; मग लवकरात लवकर नेतांना कदाचित् काही दुःखेही सहन करावी लागतील; पण त्याला काय हरकत आहे ? ती दुःखे कधी तरी सहन करायचीच आहेत. उलट ती १०० पटीत सहन करण्याऐवजी जर सद्गुरु कार्यासाठी आपण आपले जीवन झोकून दिले, तर ती एका टक्क्यामध्ये संपतील !

कर्मनियमानुसार कर्माची झाडे सद्गुरुकृपेने जळून जातात; पण त्यांची बीजे मात्र आपल्याला भोगावीच लागतात; कारण त्यातून पळवाट काढण्याची सोय निसर्गामध्ये नाही. बीजे भोगतांनाही आपण एवढे रडतो, तर ते कुकर्मांचे झाड पूर्णपणे भोगायला लागले असते, तर आपले काय झाले असते ? दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा, सामान्य मनुष्याला सत्कर्मांमुळे आपली किती कर्म जळाली ? याचे चित्र दिसत नाही. ते जर दिसले असते, तर कदाचित् सगळे जण ताबडतोब सत्कर्माला लागले असते; पण त्यामुळे जगरहाटी मात्र बंद झाली असती; म्हणूनच बहुधा निसर्गात तशी सोय नाही. जगरहाटी चालू राहिली पाहिजे; म्हणून इथे लोभ, क्रोध, सगळे आहे आणि त्याच्यावर विजय मिळवण्याचे ज्ञानही आहे. केवळ ते ज्ञान कृतीत उतरवता येत नाही, हाच दुर्दैवाचा भाग आहे.’