देवतांची भूमिका करणार्‍या कलाकारांचा आध्‍यात्मिक स्‍तरावर अभ्‍यास करतांना लक्षात आलेली सूत्रे

या लेखात ‘श्रीकृष्‍ण’ ही भूमिका साकारलेल्‍या पूर्वीच्‍या आणि अलीकडच्‍या काही दूरदर्शनवरील मालिका यांचा तुलनात्‍मक अभ्‍यास केला आहे. ज्‍यांच्‍या अभिनयातून कृष्‍णतत्त्व अनुभवता येते, अशा श्री. सर्वदमन बॅनर्जी, श्री. नितीश भारद्वाज आणि श्री. सौरभ राज जैन या ३ कलाकारांचा अभ्‍यास या लेखात केला आहे. श्रीकृष्‍णाची भूमिका मिळण्‍यापूर्वी त्‍यांची असलेली विचारप्रक्रिया, भूमिका मिळाल्‍यानंतर त्‍यांना आलेल्‍या अनुभूती आणि त्‍यांचे सध्‍याचे जीवन यांविषयी हा लेख आहे. ३० जून २०२३ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज पुढील भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/697091.html

५. श्रीकृष्‍णाची भूमिका साकारणारे कलाकार आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती

५ अ. श्रीकृष्‍णाची भूमिका करतांना समाधी अवस्‍था अनुभवणारे आणि ‘ती भूमिका प्रत्‍यक्ष श्रीकृष्‍णानेच केली आहे’, असा भाव असलेले श्री. सर्वदमन बॅनर्जी ! 

कु. रेणुका कुलकर्णी

५ अ १. अभिनय क्षेत्रात प्रगतीच्‍या शिखरावर असूनही साधनेसाठी झगमगते चित्रपट जगत् सोडून ऋषिकेश (उत्तराखंड) येथे वास्‍तव्‍य करणारे श्री. सर्वदमन बॅनर्जी ! : आध्‍यात्मिक स्‍तरावर श्रीकृष्‍णाचे पात्र साकारणार्‍यांमध्‍ये श्री. सर्वदमन बॅनर्जी यांचे नाव अग्रणी आहे. ‘श्रीकृष्‍णाचे गोड हास्‍य’, ‘स्‍थिरता’ आणि ‘खट्याळपणा’ असे सर्वच गुण त्‍यांच्‍या मुखावर झळकतात. त्‍यांनी भगवान श्रीकृष्‍णाचे पात्र मनापासून केले होते. याव्‍यतिरिक्‍त त्‍यांनी ‘आद्य शंकराचार्य’, ‘भगवान दत्तात्रेय’, ‘स्‍वामी विवेकानंद’ इत्‍यादी अनेक सात्त्विक भूमिका केल्‍या आहेत. आद्य शंकराचार्यांची भूमिका करतांना त्‍यांनी ‘संस्‍कृतमध्‍ये शास्‍त्रार्थ करणे, दीड वर्ष संन्‍याशाप्रमाणे वेशभूषा करणे, अनवाणी चालणे’, हे कठीण आव्‍हान स्‍वीकारले. (‘यामुळे श्री. सर्वदमन बॅनर्जी यांची एकप्रकारे साधना होऊन प्रकृतीलयच झाला’, असे म्‍हणता येईल.’ – संकलक) त्‍या काळात त्‍यांना उत्तमोत्तम भूमिका मिळत असून आणि यशाच्‍या शिखरावर असूनही त्‍यांनी अभिनयसंन्‍यास घेतला. सध्‍या श्री. बॅनर्जी चित्रपट जगताच्‍या (बॉलिवूडच्‍या) झगमगत्‍या जगाकडे पाठ फिरवून आध्‍यात्मिक उन्‍नतीसाठी देवभूमी उत्तराखंड येथील ऋषिकेश येथे वास्‍तव्‍याला आहेत. तेथे त्‍यांनी ध्‍यानकेंद्र (Meditation Centre) उघडले असून ते देश-विदेशांतून येणार्‍या जिज्ञासूंना ध्‍यान, योग इत्‍यादी संदर्भात मार्गदर्शन करतात.

५ अ २. श्रीकृष्‍णाची भूमिका करण्‍याची इच्‍छा नसणे; पण श्रीकृष्‍णाला प्रार्थना केल्‍यावर समुद्राच्‍या प्रत्‍येक लाटेवर एक श्रीकृष्‍ण, असे सहस्रो श्रीकृष्‍ण दिसणे : ‘यू ट्यूब’ वाहिनीवर दिलेल्‍या एका मुलाखतीत ते सांगतात, ‘‘मी श्रीकृष्‍णाची भूमिका साकारण्‍यास तितकासा उत्‍सुक नव्‍हतो. त्‍यामुळे मी दिग्‍दर्शक रामानंद सागरजींना सांगितले, ‘‘माझ्‍यात शिवतत्त्व आहे; कृष्‍णतत्त्व नाही. मला शिवाची भूमिका करायला आवडले असते’’; मात्र रामानंद सागरजींनी मला भगवान श्रीकृष्‍णाचीच भूमिका साकारण्‍याची विनंती केली. मी त्‍यांच्‍याकडे १० दिवसांचा अवधी मागितला आणि भगवान श्रीकृष्‍णाला प्रार्थना केली, ‘जर तू खरंच माझ्‍या समवेत असशील, तर मला काहीतरी साक्ष दे !’ त्‍यानंतर बरोबर आठव्‍या दिवशी एके ठिकाणी रिक्‍शाने जात असतांना मी शेजारील अथांग समुद्राकडे बघत होतो. तेव्‍हा मला समुद्राच्‍या प्रत्‍येक लाटेवर एक श्रीकृष्‍ण, असेे सहस्रो श्रीकृष्‍ण दिसले. श्रीकृष्‍णाच्‍या दर्शनाने माझी भावजागृती झाली आणि मला चक्‍कर येऊन मी रिक्‍शातच मागे डोके टेकले. तेव्‍हा रिक्‍शावाल्‍याने घाबरून रिक्‍शा थांबवून मला उठवले. नंतर मी आनंदाने त्‍याला रिक्‍शा रामानंद सागर यांच्‍या कार्यालयाकडे वळवायला सांगितली आणि त्‍यांना मी भगवान श्रीकृष्‍णाची भूमिका करण्‍यास होकार दिला. (‘श्रीकृष्‍ण हा भगवान श्रीविष्‍णूचा आठवा अवतार आहे आणि आठव्‍याच दिवशी अनुभूती मिळणे, हा दैवी योगायोग !’ – संकलक)

कु. म्रिण्‍मयी केळशीकर

५ अ ३. महाभारतीय युद्धाच्‍या चित्रीकरणाच्‍या वेळी भगवद़्‍गीतेचा उपदेश देण्‍यासाठी रथावर चढल्‍यावर समाधी अवस्‍था प्राप्‍त होऊन ३६० अंशांपर्यंतचे सर्व दिसणे : श्री. सर्वदमन बॅनर्जी ध्‍यानावस्‍थेत अभिनय करायचे. महाभारतीय युद्धाचे चित्रीकरण झाल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘मी तेथे नव्‍हतोच ! श्रीकृष्‍णानेच माझ्‍यात अवतरित होऊन ती भूमिका केली आहे.’’ श्रीकृष्‍णाचा अभिनय करतांना त्‍यांनी समाधी अवस्‍था अनुभवली आहे. एका मुलाखतीत श्री. बॅनर्जी यांनी त्‍यांना आलेल्‍या आध्‍यात्मिक अनुभूती सांगितल्‍या आहेत. त्‍या मालिकेत अर्जुनाचे पात्र साकारण्‍यार्‍या श्री. संदीप मोहन यांनी श्री. बॅनर्जी यांची मुलाखत घेतली आहे. त्‍या मुलाखतीत श्री. बॅनर्जी यांनी सांगितले, ‘‘भगवद़्‍गीतेचा उपदेश देण्‍यासाठी मी रथावर चढल्‍यावर मला समाधी अवस्‍था प्राप्‍त व्‍हायची. त्‍या वेळी माझे दृष्‍टीक्षेत्र ३६० अंशांपर्यंत विस्‍तारायचे, म्‍हणजे मला माझ्‍या मागचेही सर्व स्‍पष्‍टपणे दिसायचे. रथावरून उतरल्‍यावर दृष्‍टी परत सामान्‍य व्‍हायची. साधारण व्‍यक्‍तीचे दृष्‍टीक्षेत्र हे समोरील वस्‍तू आणि तिच्‍या आसपासचा परिसर एवढेच मर्यादित असते. साधना करणार्‍या व्‍यक्‍तीचे दृष्‍टीक्षेत्र काही प्रमाणात विस्‍तारते. ध्‍यानावस्‍थेत साधकाला १८० अंशांपर्यंतचे दिसू शकते, तर समाधी अवस्‍थेत त्‍याला ३६० अंशांपर्यंत, म्‍हणजे सर्वच दिसते.’’ (समाधी अवस्‍थेतील साधकाला अशी अनुभूती येते. ‘योगानंद’ या योगींच्‍या आत्‍मचरित्रातही (‘Autobiography Of a Yogi’ – Yogananda) ३६० अंशांपर्यंत दृष्‍टीक्षेत्र विस्‍तारल्‍याचा उल्लेख सापडतो.

५ अ ४. ‘या मालिकेतील भूमिका दैवी ऊर्जेनेच केल्‍या आहेत’, असे कलाकाराला जाणवणे आणि श्रीकृष्‍णाची भूमिका करतांना श्री. सर्वदमन बॅनर्जी यांच्‍या अंगात दैवी संचार होणे : एका मुलाखतीत श्री. संदीप मोहन श्री. सर्वदमन बॅनर्जी यांना म्‍हणतात, ‘‘आपल्‍या भूमिका आपण केल्‍याच नाहीत’, असे वाटते. त्‍या दैवी ऊर्जेनेच केल्‍या आहेत. तुम्‍ही (श्री. सर्वदमन) श्रीकृष्‍णाची भूमिका करण्‍याआधी त्‍या विचारांत हरवून कुठे असाल, तिथेच ध्‍यानावस्‍थेत जात होतात. त्‍यामुळे प्रत्‍यक्ष चित्रीकरणाच्‍या वेळी तुम्‍हाला शोधून ध्‍यानाच्‍या स्‍थितीतून बाहेर आणावे लागायचे. तुम्‍ही कुठलाही संवाद पाठ केला नव्‍हता; मात्र तरीही तुम्‍ही श्रीकृष्‍णाची भूमिका सहजतेने करायचात.’’

५ अ ५. ‘श्री. सर्वदमन बॅनर्जी यांच्‍या श्रीकृष्‍णाच्‍या वेशातील एका छायाचित्रात त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून दिव्‍य प्रकाश बाहेर येत आहे’, असे जाणवणे : श्री. बॅनर्जी यांनी त्‍यांच्‍या घरी त्‍यांचे श्रीकृष्‍णवेशातील एक छायाचित्र लावले आहे. त्‍यात त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून येणारा दैवी प्रकाश स्‍पष्‍टपणे दिसतो. त्‍या छायाचित्राविषयी ते सांगतात ‘‘हे छायाचित्र मी माझे कौतुक म्‍हणून लावलेे नाही. ‘हे छायाचित्र माझे नसून त्‍यात साक्षात् श्रीकृष्‍णच उपस्‍थित आहे !’, असा माझा त्‍या छायाचित्राप्रती भाव आहे.’’ या मुलाखतीत पुढे ते म्‍हणतात, ‘‘श्रीकृष्‍णाचा अभिनय करतांना माझ्‍या डोळ्‍यांतून पांढरा प्रकाश प्रक्षेपित व्‍हायचा. तो मलाच नव्‍हे, तर इतरांनाही स्‍पष्‍ट दिसायचा. या अवस्‍थेतील माझे छायाचित्र एका इटालियन छायाचित्रकाराने काढले आहे.’’

५ अ ६. श्री. सर्वदमन बॅनर्जी यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे : श्री. बॅनर्जी यांनी ‘श्रीकृष्‍ण’ मालिकेत उत्‍कृष्‍ट अभिनय केला आहे. त्‍यांचा अभिनय बघतांना कृष्‍णतत्त्व पुष्‍कळ प्रमाणात जाणवते आणि भावही जागृत होतो. श्री. बॅनर्जी यांच्‍या भावमुद्रा बघतांना ‘ते केवळ अभिनय करत नसून या अभिनयामुळे त्‍यांना अंतरातून आनंद मिळतो आणि तो त्‍यांच्‍या चेहर्‍यावर दिसतो’, असे आम्‍हाला जाणवले. श्री. बॅनर्जी हे साधना करत असल्‍याने त्‍यांना श्रीकृष्‍णाचा अभिनय करतांना आध्‍यात्मिक अनुभूती आल्‍या. त्‍यामुळेच त्‍यांनी पुढे साधना करण्‍याचा निर्णय घेतला.’

– कु. रेणुका कुलकर्णी (संगीत अभ्‍यासक) आणि कु. म्रिण्‍मयी केळशीकर (नाट्य आणि संगीत अभ्‍यासक), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा (१७.५.२०२२)

(क्रमशः)

(साभार : विविध सामाजिक संकेतस्थळे )


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/703061.html