किशोर आवारे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या कह्यात !
पिंपरी – तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेले माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान तथा भानू खळदे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कह्यात घेतले आहे. आवारे यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने डोक्यात वार करून १२ मे या दिवशी हत्या केली होती. या प्रकरणी अन्वेषण करतांना गुन्ह्यामध्ये तळेगाव दाभाडे येथील माजी नगरसेवक चंद्रभान खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला कह्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याच्या कटामध्ये चंद्रभान यांचाही सहभाग असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. संबंधित प्रकरणी पोलिसांनी ५ आक्रमणकर्त्यांसह दीड मासापासून फरार असलेले चंद्रभान खळदे यांनाही नाशिक परिसरातून कह्यात घेतले.