ठाणे येथे सनातन संस्थेच्या वतीने ३ दिवसांचे बिंदूदाबन शिबिर उत्साही वातावरणात पार पडले !
ठाणे – येथे सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील साधकांसाठी ३ दिवसांचे बिंदूदाबन निवासी शिबिर पार पडले. येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतांना विविध शारीरिक विकारांवर बिंदूदाबन पद्धतीने उपचार कसे करावेत, याविषयीचे मार्गदर्शन निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी साधकांना केले. शिबिरामध्ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्या त्रासांवर चेहर्यावरील बिंदूदाबन शिकवण्यात आले. वातप्रकृती असलेल्या एखाद्या रुग्णाला मर्दन (मालीश) करण्याचे काही प्रकार शिकवून त्याचा साधकांकडून सरावही घेण्यात आला.
‘वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदाची औषधे किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने घ्यावीत ?’, याचे मार्गदर्शन डॉ. जोशी यांनी केले. या वेळी साधकांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन डॉ. दीपक जोशी यांनी केले. या शिबिराला सद़्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या प्रसंगी त्यांनी ‘बिंदूदाबन ही सेवा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर परिपूर्ण करून श्रीगुरूंची कृपा कशी संपादन करायची ?’, याविषयी मार्गदर्शन केले.