संतांचे त्वरित आज्ञापालन करणार्या आणि साधनेचे प्रगल्भ दृष्टीकोन असणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. विशाखा चौधरी !
आषाढ कृष्ण एकादशी (१३.७.२०२३) या दिवशी कु. विशाखा चौधरी यांचा २४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार (वय ३३ वर्षे) यांना जाणवलेली तिची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
कु. विशाखा चौधरी यांना २४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. संतांचे त्वरित आज्ञापालन केल्याचा लाभ होऊन आनंद मिळणे
‘कु. विशाखा चौधरी ही पनवेल येथे रहात असतांना मधे मधे देवद आश्रमात यायची. आमच्या दोघींमध्ये काही वेळा साधनेविषयी बोलणे व्हायचे. अशीच एकदा ती आश्रमात आली असतांना मला म्हणाली, ‘‘साधना करतांना मी तुमचे ऐकले; म्हणून मला लाभ झाला. त्यामुळे आज मी आनंदी आहे. ‘संतांचे ऐकल्याचा काय लाभ होतो ?’, हे त्या वेळी कळत नाही; पण आपण संतांनी सांगितलेल्या कृती करत जातो, तेव्हा कालांतराने आपल्याला ‘त्याचा काय लाभ होत आहे ?’, हे समजते.’’
२. साधनेविषयी असलेला प्रगल्भ दृष्टीकोन !
आता कु. विशाखा रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. २१.२.२०२३ या दिवशी विशाखाशी बोलत असतांना ती मला म्हणाली, ‘‘साधक मला म्हणतात, ‘तू सगळे सोडून आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी आली आहेस. तुझा किती मोठा त्याग आहे’; पण मला वाटते, ‘जे माझे कधी नव्हतेच, तेच मी सोडले आहे. जे माझे आहे, ते मला सोडायचे आहे आणि ते म्हणजे माझे स्वभावदोष आणि अहं ! ते मी सोडले, तर खरे सोडले’, असे होईल.’’
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव
तिच्या लहान भावाविषयी (श्री. कृष्णल चौधरी, वय १९ वर्षे) बोलतांना ती मला म्हणाली, ‘‘माझा भाऊ केवळ एक दिवसासाठी रामनाथी आश्रमात आला होता; पण त्या एकाच दिवसात त्याची आश्रमातील सर्व संतांशी भेट झाली. ‘त्याची एकाच दिवसात आश्रमातील सर्व संतांशी भेट होणे’, ही फारच चांगली गोष्ट झाली. तो खरोखरच गुरुदेवांचा आहे; म्हणून असे झाले; पण त्याला ते कळत नाही. मलाही ‘मी गुरुदेवांची आहे’, हे कळायला किती दिवस लागले !’’
– (पू.) सौ. अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत, वय ३३ वर्षे), सनातन आश्रम, देवद. (२३.२.२०२३)