छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत २०० कोटींचा घोटाळा उघडकीस !

कोणतेही तारण न घेता स्‍वतःच्‍याच संस्‍थांना कोट्यवधींचे कर्जवाटप !

छत्रपती संभाजीनगर – येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत नियमबाह्य कर्जवाटप करून तब्‍बल २०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. ओळखीतील लोक आणि स्‍वतःच्‍याच इतर संस्‍था यांना कोट्यवधी रुपयांच्‍या कर्जाची खैरात वाटल्‍याचा ठपका शहरातील ‘आदर्श महिला नागरी सहकारी बँके’वर ठेवण्‍यात आला आहे. वर्ष २०१६ ते २०२३ या कालावधीत झालेल्‍या उपनिबंधक कार्यालयाच्‍या लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आला आहे. त्‍यामुळे सिडको पोलीस ठाण्‍यात ११ जुलै या दिवशी मुख्‍य संचालक अंबादास मानकापे यांच्‍यासह अन्‍य संचालक आणि कर्जदार यांच्‍यावर २ स्‍वतंत्र गुन्‍हे नोंद करण्‍यात आले आहेत.

एप्रिल २००३ मध्‍ये ‘आदर्श ग्रुप’ अंतर्गत आदर्श महिला नागरी बँकेची स्‍थापना करण्‍यात आली होती. काही कालवधीतच बँक चर्चेत आली आणि ठेवीदारांची संख्‍या वाढू लागली; मात्र गेल्‍या ६ मासांपासून या बँकेतील अपव्‍यवहारांविषयी चर्चा चालू होत्‍या. त्‍यामुळे ठेवीदारांनी पैसे काढण्‍यासाठी बँक गाठली; पण पैसे मिळत नसल्‍याने ठेवीदारांनी बँकेसमोरच आंदोलन चालू केले होते, तर अनेक ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रारी करण्‍यास प्रारंभ केला. सहकारी संस्‍थेच्‍या जिल्‍हा उपनिबंधकांच्‍या आदेशावरून विशेष लेखापरीक्षक धनंजय चव्‍हाण यांनी वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीतील लेखापरीक्षण केले, तसेच जून २०२३ मध्‍ये त्‍यांनी याचा अहवाल वरिष्‍ठांकडे सादर केला. त्‍यामध्‍ये मानकापे आणि त्‍यांचे सहकारी यांचे अनेक कारनामे समोर आले.

संपादकीय भूमिका :

महाराष्‍ट्रात आतापर्यंत अनेक सहकारी बँका आणि पतसंस्‍था यांमध्‍ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्‍टाचार, घोटाळा झाल्‍याचे निदर्शनास येऊनही आतापर्यंत दोषींवर गुन्‍हे नोंद होण्‍याच्‍या व्‍यतिरिक्‍त त्‍यांना कोणतीही शिक्षा झालेली नाही. त्‍यामुळे ‘आम्‍हाला जाब विचारणारे कुणी नाही’, अशा धुंदीत असलेले सहकारी बँकांचे अध्‍यक्ष आणि संचालक असे घोटाळे करत आहेत. त्‍यामुळे सहकारी बँकांतील भ्रष्‍टाचार संपवायचा असेल, तर प्रथम दोषींना कठोर शिक्षा करण्‍याविना पर्याय नाही.