संत जनाबाई यांची श्रेष्ठ ईश्वरभक्ती !
विठ्ठलचरणी सर्व जीवन समर्पित केलेल्या जनाबाई यांनी देहभान विसरून दिवसरात्र एक करून संत नामदेवांच्या घरी सेवा केली. त्यांच्यासाठी प्रत्येक कर्मच ब्रह्मरूप झाले होते. त्या विठ्ठलभक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की, विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत साहाय्य करत असे. संत नामदेव हे संत जनाबाईंचे गुरु ! त्यामुळे जनाबाईंनी त्यांच्या अभंगांची नावे ‘दासी जनी’, ‘नामयाची दासी’ आणि ‘जनी नामयाची’, अशी ठेवली आहेत. या दासीपणाची, स्वत:च्या शूद्र जातीची आणि स्वत:च्या ‘स्त्री’पणाचीही जाणीव व्यक्त करणारे अनेक अभंग संत जनाबाई यांच्या मनातून त्यांच्या शब्दांत उमटले आहेत. विठ्ठलाला मायबाप आणि प्रसंगी ‘सखा’, ‘जिवाचा मैतर’ समजणार्या जनीने विठ्ठलाशी त्याबद्दल संवाद साधलेला तिच्या अनेक हृद्य अभंगांतून दिसतो.
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ।। १ ।।
पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ।। २ ।।
ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ।। ३ ।।
जनी म्हणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ।। ४ ।।
भावार्थ : भक्त जना झाडलोट करते. केर मात्र श्रीकृष्ण भरतो. डोक्यावर टोपली घेऊन तो केर दुसरीकडे टाकून येतो. केवळ भक्तीचा भुकेला असलेला हा श्रीहरि हीन कामेही करू लागला. जनाबाई विठोबाला म्हणते, ‘कशी होऊ रे मी तुझी उतराई !