भावभक्तीचा आदर्श निर्माण करणारे संत सावता महाराज !
कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।।
लसण मिरची कोथंबिरी । अवघा झाला माझा हरि ।।
स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातो हात ।।
सावत्याने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ।।
संसारातील कर्तव्ये विठ्ठलरूप स्मरून करत रहाणे, यालाच संत सावता महाराज ‘कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।’ म्हणतात. सावता माळी यांनी ईश्वराच्या नामजपावर अधिक भर दिला. ईश्वरप्राप्तीसाठी संन्यास घेण्याची किंवा सर्वसंगपरित्याग करण्याची आवश्यकता नाही. प्रपंच करतांनाच ईश्वरप्राप्ती होऊ शकते, असे म्हणणार्या सावता महाराजांनी त्यांच्या मळ्यातच ईश्वर पाहिला.
संत सावता महाराज (संत सावता माळी) यांचा काळ वर्ष १२५० ते १२९५ चा आहे. सावता माळी हे ‘कर्तव्य आणि कर्म करत रहाणे, हीच खरी ईश्वरसेवा’, अशी प्रवृत्तीमार्गी शिकवण देणारे संत ! वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले.
सावता महाराज म्हणतात – भक्तीमध्येच खरे सुख नि आनंद आहे. तीच विश्रांती आहे.
सांवता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा ।
जेणे मुक्ती द्वारा ओळंगती ।।