गोवा : राज्यसभेवर सदानंद शेट तानावडे यांची बिनविरोध निवड

विरोधकांकडून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय

विधानसभा सचिव उल्मन यांच्याकडे राज्यसभा उमेदवारीचा अर्ज सादर करतांना सदानंद शेट तानावडे, समवेत मुख्यमंत्री डॉ. सावंत, मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री विश्वजीत राणे आणि  आमदार दिगंबर कामत

पणजी, ११ जुलै (वार्ता.) – राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ११ जुलै या दिवशी अर्ज प्रविष्ट केला आहे. विरोधी गटातील ७ आमदारांच्या ११ जुलै या दिवशी झालेल्या बैठकीत राज्यसभेसाठी विरोधकांकडून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार निवडणूक जिंकू शकत नाही, याची स्वीकृतीही विरोधी पक्षनेत्यांनी दिली आहे.

राज्यात भाजपप्रणित सरकारकडे २ तृतीयांश बहुमत असल्याने सदानंद शेट तानावडे यांची निवड जवळजवळ बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदानंद शेट तानावडे अर्ज प्रविष्ट करण्यासाठी विधानसभा सचिवांच्या कार्यालयात आले, तेव्हा त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य मंत्रीगण यांची उपस्थिती होती.

गोव्यातील राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांची कारकीर्द २८ जुलै या दिवशी संपत आहे. १३ जुलै हा अर्ज प्रविष्ट करण्याचा शेवटचा दिवस आहे. १४ जुलै या दिवशी अर्जांची छाननी आणि १७ जुलै या दिवशी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. २४ जुलै या दिवशी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत ‘आप’ने त्यांचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.