सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समष्टी रूपाप्रति कोटीशः कृतज्ञता !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयातील साधक सेवा कशी करतात, याची जिज्ञासा या लेखामुळे पूर्ण झाली.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.७.२०२३) |
‘कृतज्ञतेला शब्द नसती, असते केवळ कृती ।
कृतज्ञतेची ही कृती दर्शवते तुमची स्थिती ॥’
ही चारोळी अंदाजे १२ वर्षांपूर्वी सुचली होती. कृतज्ञता म्हटली की, ती भगवंताप्रती, गुरूंप्रती व्यक्त होते. गुरुकृपायोगानुसार साधना करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘साधकांना प्रत्येक घटकाप्रती कृतज्ञता वाटायला हवी’, असे शिकवले. या व्यापक दृष्टीकोनाचा विचार मनात आला आणि यंदाच्या गुरुपौर्णिमा विशेषांकाची सेवा करतांना सहकारी साधकांनी विशेषांक अधिकाधिक परिपूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न आठवून त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटू लागली. या सेवेतील साधकांविषयीची सूत्रे थोडक्यात येथे देत आहे.
१. समर्पितभावाने सेवा करणारी कु. सायली डिंगरे !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकांच्या सेवेचे दायित्व कु. सायली डिंगरे पहाते. यंदाच्या गुरुपौर्णिमा विशेषांकाच्या कालावधीत ती काही कौटुंबिक कारणामुळे गावी गेली होती. असे असले, तरी विशेषांकाचा ‘हेडर’ (पान १ वरील मुखचित्र) किंवा पूर्ण पान विज्ञापन यांसाठी तिचे साहाय्य मागितल्यावर तिने वेळोवेळी साहाय्य केले. तिने सांगितलेले अधिक चांगले पालट, त्यामागील दृष्टीकोन, सेवेतील बारकावे यांतून मला शिकायला मिळाले. यातून तिच्यातील समर्पणभाव, ३ गुरूंना अपेक्षित अशी सेवा करण्याची तळमळ, आदी गुण दिसून आले.
२. अन्य आवृत्त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार्या सौ. श्रद्धा निंबाळकर !
सौ. श्रद्धा यांनी विशेषांकाच्या पानांची संरचना केली. ही सेवा करतांना त्यांनी पाने सर्व आवृत्त्यांना वेळेत पाठवता यावीत, त्यांना त्यांच्या आवृत्तीच्या विज्ञापनांनुसार लेख बसवायला अडचण येऊ नये, यांसाठी तिने आटोकाट प्रयत्न केले. ऐनवेळी धावपळ होऊ नये, यासाठी सौ. श्रद्धा हिने संबंधित सेवांचा आढावा २ दिवस आधीच मागवून घेतला. यामुळे ‘कुठल्या पानावर एखादे लिखाण बसण्यात अडचण येणार का ?’, याची संपादकांना वेळेत कल्पना आली.
३. सेवेत नाविन्य आणण्याचा आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा प्रयत्न करणार्या सौ. आनंदी बधाले आणि सौ. नारायणी जोशी !
सौ. आनंदी अतुल बधाले (विवाहापूर्वीची कु. पूजा नलावडे) आणि सौ. नारायणी अमर जोशी (विवाहापूर्वीची कु. मानसी कुलकर्णी) या साधिकांकडे विशेषांकाचे पूर्ण पान विज्ञापन आणि हेडर बनवणे, त्यासाठी संकल्पना तयार करणे, लेखांसाठी आयकॉन बनवणे आदी सेवा होत्या. गुरुपौर्णिमा किंवा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा जन्मोत्सव यांसाठीच्या अंकांत पूर्ण पान विज्ञापन देणार्या विज्ञापनदात्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती (गुरुदेवांप्रती) भाव असल्याने त्यांच्या विज्ञापनात ‘गुरुदेवांचे मोठ्या आकारातील छायाचित्र असावे’, अशी त्यांची अपेक्षा असते. गुरुदेवांची छायाचित्रे जन्मोत्सव विशेषांकात बर्यापैकी घेतलेली असल्याने ‘गुरुपौर्णिमा विशेषांकात छायाचित्र कोणते घ्यावे ? पानाची मांडणी कशी असावी ?’, हे प्रश्न होते. सौ. आनंदी बधाले आणि सौ. नारायणी जोशी यांना यावर काही सुचल्यास त्याविषयी संपादक साधकांसह कलेशी संबंधित सेवा करणार्या साधकांना विचारून घेणे, त्यांना संकल्पना कच्च्या स्वरूपात दाखवणे, छायाचित्र निवडणे, आदी सेवा विचारून विचारून करत होत्या. विज्ञापनाची संकल्पना विज्ञापन देणार्याला आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी व्हायला हवी, काहीतरी नवीन करायला हवे, यासाठी त्यांचा प्रयत्न दिसून आला.
४. सदैव कृतज्ञताभावात रहाता येऊ दे !
वरील साधकांच्या व्यतिरिक्त अन्यही काही साधकांचा या सेवेत कमी-अधिक सहभाग होता. कलेशी संबंधित सेवा करणार्या साधकांनीही प्रांजळपणे सूत्रे सांगून हेडर, विज्ञापनाचे पान आणि चित्रे चांगली होण्यासाठी साहाय्य केले. विभागातील सर्व साधक त्यांच्या लक्षात आलेली सूत्रे त्वरित सांगून साहाय्य करत होते. विज्ञापने मिळवण्याची सेवा करणारे साधक अधिकाधिक विज्ञापने मिळवण्याचा प्रयत्न करत होते. विशेषांकाची सेवा कुणा एका साधकाने करण्यासारखी नाही. त्यामुळे सर्व संबंधित साधकांनी संघटितपणे आणि विचारून विचारून सेवा केल्यासच सेवा परिपूर्ण करता येते. नेमके हेच साध्य होत होते. या सर्व साधकांप्रती केवळ एका विशेषांकापुरती कृतज्ञता न वाटता सदैव कृतज्ञ रहाता येऊ दे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, आम्हाला प्रतिदिनच्या सेवेतही साधकांप्रती कृतज्ञता वाटू दे. आश्रमात किंवा धर्मकार्याची सेवा करणार्या अन्य साधकांप्रतीही कृतज्ञता वाटून व्यापक होता येऊ दे. हे सर्व साधक म्हणजेच तुमचे समष्टी रूप आहे. या तुमच्या समष्टी रूपाप्रती कोटीशः कृतज्ञता !
– सौ. समीक्षा गाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२३)
गुरुपौर्णिमा विशेषांक चैतन्यमय झाल्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्याने कृतज्ञतेत वाढ होणे !
गुरुपौर्णिमा विशेषांक पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या सेवेत असलेल्या साधकांना, ‘विशेषांकात किती चैतन्य आहे पहा !’ असे म्हटले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘विशेषांक हातात घेतल्यावर (अंक उघडण्यापूर्वीच) चैतन्याचा झोत येत आहे, असे जाणवले’, असे सांगितले. त्यांनी दैनिक विभागात येऊन विशेषांक चांगला झाल्याविषयी सांगितले. अवतारी गुरूंच्या या उद़्गारांमुळे आमच्याकडून विशेषांकाची सेवा करवून घेतल्याविषयी वाटत असलेल्या कृतज्ञतेत कित्येक पटींनी वाढ झाल्याचे जाणवले. खरेतर या विशेषांकातील पानांवर घ्यावयाचे लेख सहजपणे मिळत गेले. भक्तवात्सल्याश्रमावरील सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या भक्ताच्या काव्यामुळे प.पू. बाबांविषयीचे लिखाण, सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याची माहिती असलेले लिखाण, गुरुदेवांच्या देहात जाणवलेल्या पालटाविषयी माहिती, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण, हे सर्व ‘ईश्वराचेच नियोजन आहे’, असे जाणवत होते. त्यामुळे विशेषांकाला एकप्रकारे पूर्णत्व आल्याचे जाणवले.
– सौ. समीक्षा गाडे
‘सर्व ईश्वरनियोजित असते’, याविषयी जाणवलेली सूत्रे
१. उपलब्ध असलेल्या छायाचित्राप्रमाणे लेख मिळणे : या विशेषांकात एका पानावर ३ गुरूंचे एक अप्रतिम छायाचित्र घेण्याचा मानस होता; परंतु त्याविषयी संबंधित लिखाण नव्हते. त्यामुळे ‘३ गुरूंचे छायाचित्र छापण्याची संधी हुकणार कि काय ?’, असे वाटत असतांनाच साधक श्री. वीरेंद्र मराठे यांचा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासम त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी, जशा वेदांसम श्रुति-स्मृति !’ या मथळ्याखालील लेख मिळाला आणि आम्हाला ३ गुरूंचे छायाचित्र प्रसिद्ध करता आले. हा लेख वाचून साधकांनी भावजागृती झाल्याचे सांगितले.
– सौ. आनंदी बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.
२. वैशिष्ट्यपूर्ण लिखाण उपलब्ध होणे : २५ जूनला गुरुपौर्णिमेचा पहिला अंक आणि ३ जुलैला मुख्य अंक होता. गुरुपौर्णिमेनिमित्तच्या अंकांसाठी विशेष काही लिखाण सिद्ध झालेले नव्हते. जन्मोत्सवानिमित्तच्या अंकांची सिद्धता आम्ही १ मास आधीच चालू केली होती, तेवढा वेळ गुरुपौर्णिमेच्या विशेषांकांसाठी देता आला नव्हता. अशा स्थितीत ‘देवाचे नियोजन ठरलेले असते’, याची अनुभूती घेता आली.
जन्मोत्सवानिमित्तच्या अंकांची सेवा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीचे काही लिखाण आणि रंगीत चित्रे ऐनवेळी अन्य तातडीचे लेख आल्याने जागेअभावी काढून ठेवण्यात आली होती. हे लिखाण गुरुपौर्णिमेच्या विशेषांकांत घेता आले.
– सौ. श्रद्धा निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |