शिष्याच्या पात्रतेनुसार गुरूंनी शिकवणे
परिपक्व फळाला चोच मारायला पोपट जसे सिद्ध असतात, त्याचप्रमाणे अनुग्रहपात्र शिष्यास शिकवून सिद्ध करण्यास गुरुही सिद्ध असतात. त्यासाठी शिष्याच्या ठिकाणी शिकण्याची उपजत बुद्धी आणि पात्रता लागते. कावळ्याला शिकवून तो काय कोकिळेसारखा गाऊ शकेल ? काही गुण उपजतच असावे लागतात. शेतकरी चांगल्या बीला खत-पाणी घालून त्याचा वृक्ष बनवतो. त्याप्रमाणे गुरु अनुग्रहपात्र शिष्यास शिकवून मोक्षाचा मार्ग दाखवतात. ही गोष्ट शिष्याच्या वयावर अवलंबून नसते.
शंकराचार्य ८ वर्षे ४ मासांचे असतांना ते गुरुगृही आले. ते गुरुगृही केवळ ३ वर्षे होते. या अल्पकाळात चारही वेदांच्या संहिता; ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे; वेदांची शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष ही सहा अंगे; कणाद आणि गौतम यांची शास्त्रे; निरीश्वरसांख्य, सेश्वरसांख्य आणि जैमिनींची पूर्वमीमांसा इत्यादी शास्त्रे इतके शिक्षण पूर्ण झाले. गुरूंजवळ आता त्यांना देण्याजोगे ज्ञान शिल्लक नव्हते; म्हणून गुरूंनी शंकराचार्यांच्या आईला बोलवून त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. शंकराचार्यांची केवढी ही उपजत बुद्धी आणि पात्रता !
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘सुगम अध्यात्म’)