ट्रॅव्हल्समधील प्रवाशांचे संपूर्ण नाव आणि पत्ता नसल्यास होणार कठोर कारवाई !
वर्धा – राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरून धावणार्या खासगी बसगाड्यांची काटेकोरपणे पडताळणी होणे आवश्यक आहे. प्रवासाचे आरक्षण करतांना प्रवाशांचे संपूर्ण नाव, पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक नमूद असावेत. यात त्रुटी आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याची सूचना प्रशासनास देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन खासदार रामदास तडस यांच्या सूचनेनुसार झाले.
जिल्ह्यातील अपघातपूरक स्थळांची माहिती घेत खासदार तडस यांनी समृद्धी महामार्गावरील ३२ अपघातप्रवण स्थळांवर सूचनेचे फलक लावावेत, वळण रुंद करावे, वेगमर्यादा, रबलिंग स्ट्रप आणि वाहकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. अपघातग्रस्तांना साहाय्य करणार्या संस्था आणि व्यक्ती यांना प्रोत्साहन द्यावे. समृद्धी मार्गावर प्रति १०० किलोमीटर अंतरावर थांबा देण्याचे नियोजन करण्याची गोष्ट अमलात आणण्याचा आग्रह तडस यांनी सभेत धरला. आमदार डॉ. पंकज भोयर यांनीही त्यांचेच समर्थन करून ‘बुलढाणा अपघातात प्रवाशांची नोंद नसल्याचे सूत्र हे कळीचे ठरले आहे’, असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याविषयी शासनाने स्पष्ट निर्देश दिल्याचे नमूद केले. अपघातस्थळी तात्काळ आरोग्य सेवा देण्याचे सूत्र उपस्थित करण्यात आले.