सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य हिमालयाच्या उंचीचे !
हिमालय पर्वताचे प्रत्येक भारतियाला आकर्षण वाटते. तेथील प्रत्येक शिखराची रचनाच अफाट ! इतकी की, जगातील इतर कुठल्याही नैसर्गिक, निर्जीव वस्तूची संज्ञा जोडून आपण हिमालयाचे वर्णन करू शकणार नाही. किती भव्यता आणि दिव्यता आहे या शिखरांमध्ये ? ही भव्यता आपल्याला देशभरातील उर्वरित पर्वत शिखरांमध्ये पहायला मिळत नाही.
वर्ष १९९८ मध्ये नेपाळ, वर्ष २००० मध्ये चारधाम यात्रा अन् वर्ष २०२२ मध्ये काश्मीर प्रवास अशा तिन्ही वेळी मला हिमालयाचे दर्शन झाले आहे. हिमालयाचे अस्तित्वच मानवास जगण्याची अन् इतरांस जगवण्याची प्रेरणा देत असते. पूर्ण आयुष्य तिथेच घालवण्याची इच्छा अनावर झाल्याविना रहात नाही. मनुष्यप्राण्याकडे असे हे जन्मजन्मांतरीचे नाते जोडून राहिला आहे हिमालय ! त्याचे नित्य स्मरणच मनास एकप्रकारे मोहून टाकते. माणसाला सर्वार्थाने मनुष्य घडवण्यास हे हिमालयाचे अस्तित्व कारणीभूत असावे, असे वाटते. हिमालयाच्या आकर्षणाने स्वतःचे कर्तृत्व निर्माण करणारी माणसे जगात पूर्वी होती, तशीच ती आजही आहेत.
गेल्या वर्षी काश्मीरच्या प्रवासाच्या वेळी पहलगामला रात्रीच्या मुक्कामाला थांबलो होतो. पहाटे अचानक जाग आली. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून हिमालयाच्या शिखरांचे दर्शन घडले. पहाटे ५.३० वाजता त्यातील एका शिखराचा माथा सूर्यप्रकाशाने पूर्णतः उजळलेला दिसला. या सात्त्विक दृश्यावरून काही केल्या नजरच हटत नव्हती. क्षणभर त्या शिखराचा चेहरा मी न्याहाळला. तो चेहरा आजही माझ्या डोळ्यांपुढे येतो, तेव्हा मी भारावून जातो. सहजपणे नतमस्तक होतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा चेहरा आणि सूर्यप्रकाशात न्हाऊन गेलेला त्या शिखराचा चेहरा दोहोंत साम्य दिसत होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी चालू केलेले महान कार्य, हिंदु समाजाच्या भल्यासाठी चालू असलेले त्यांचे प्रयत्न हे हिमालयासारखेच उत्तुंग आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य म्हणजे जगासाठी महत्त्वाचे योगदान !
आपल्या हिंदु धर्माची स्थापना कुणी आणि कधी केली ? याचा उलगडा कधीच कुणाला झाला नाही. जगातील अन्य सर्व पंथांची स्थापना करणारे त्यांचे संस्थापक जगाला ज्ञात आहेत. आपापल्या पंथाची महानता सांगतांना आणि हिंदु धर्माला हिणवतांना ते ही उणीव आवर्जून मांडतात. सामान्य हिंदूंच्या मनात स्वधर्मविषयक न्यूनगंड येण्यास हे एवढेच कारण प्रबळ ठरते. ती उणीव भरून काढायच्या दिशेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चालू असलेले कार्य आज सर्वसामान्यांच्या दृष्टीने काही अंशी गती घेत आहे. अखिल मानवजातीस हिमालय पथदर्शक वाटतो, त्याच प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्माची होणारी वाटचाल आज तेवढ्याच मोलाची वाटत आहे. हिंदु धर्मास उर्जितावस्था प्राप्त करून देणार्या त्यांच्या कार्याचे महत्त्व आज जगात अधोरेखित होतांना दिसत आहे. सर्व साधक त्या वाटचालीस आधार देणारे वाहक ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याची तुलना हिमालयाशी केल्याविना अन्य पर्याय सापडत नाही. तुम्हा-आम्हा सामान्यांच्या जीवनकाळात हे कार्य घडत आहे. हे प्रत्येकास लक्षणीय वाटते. हिंदु राष्ट्र प्रत्यक्षात अवतरण्याची चाहूल लागणे, रामराज्याप्रमाणे भारत अन् जगभरात समर्पक राज्यव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होणे, पुन्हा एकदा हिंदु धर्माच्या आधारे मार्गक्रमण करणार्या मानवी व्यवस्थेस सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे मार्गदर्शक लाभणे, या घटना साध्या सोप्या दिसल्या, तरी अतर्क्य अशाच आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वतःचे अमूल्य आयुष्य त्या कामी पणास लावलेले आहे. शेकडो संत आणि सहस्रो साधक स्वआचरण अन् शिकवण यांच्या आधारे त्यांनी घडवले आहेत. मानवजातीच्या उत्थानाचे हे त्यांचे हिमालय पर्वताएवढे कार्य जगासाठी महत्त्वाचे योगदान आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याचे अनुकरण करत आमचे उर्वरित आयुष्य सत्कारणी लावण्याची प्रेरणा मिळो !
‘समजा हे महान कार्य त्यांनी चालू केलेच नसते, तर ?’, असाही एक विचार आमच्या सामान्य बुद्धीला सहज स्पर्श करून जातो. आज आपल्या धर्माची साहजिकच या भारतभूमीची अवस्था पराकोटीची भयावह, तसेच अंतिम घटका मोजणारी झालेली दिसली असती. ते चित्र डोळ्यांसमोरून काही केल्या हटत नाही. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सर्व कार्य विधीलिखित होते. ते होणारच होते’, असे आपण कितीही म्हटले, तरी अशा परिपक्व कार्यासाठी प्रत्यक्षात कुणीतरी राबल्याविना, अशा आचरणीय कार्याचे उदाहरण कुणीतरी सोदाहरण जगापुढे ठेवल्याविना, अशी युगप्रर्वतक कार्ये तीळमात्रही पुढे जाऊ शकत नाहीत; म्हणूनच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी चालू केलेले कार्य आम्हा साधकांना अनुकरणीय वाटते, प्रेरणादायक वाटते आणि म्हणून प्रातःवंदनीयसुद्धा वाटते. अशा कार्याचे अनुकरण करत करत उर्वरित आयुष्य सत्कारणी, सार्थकी लावण्याची प्रेरणा प्रत्येकास मिळो. तुम्हा-आम्हाला त्या कामी त्यांचे आशीर्वाद मिळत जावो, हीच त्यांच्याकडे प्रार्थना करतो.
– श्री. महेश पारकर, प्रसिद्ध मराठी आणि कोकणी साहित्यिक, शिरोडा, गोवा. (५.५.२०२३)