पुणे येथील ‘कॅन्‍टोन्‍मेंट बोर्डा’चे पशूवधगृह बंद केल्‍याने खाटीक व्‍यावसायिकांचे आंदोलन !

आंदोलन करताना खाटिक व्‍यावसायिक

पुणे – कोंढवा येथील पुणे ‘कॅन्‍टोन्‍मेंट बोर्डा’चेे पशूवधगृह कायमस्‍वरूपी बंद केल्‍याने लष्‍कर भागातील खाटिक व्‍यावसायिकांनी १० जुलै या दिवशी बोर्ड कार्यालयात आंदोलन केले. या वेळी कमिटीचे पश्‍चिम महाराष्‍ट्र अध्‍यक्ष सादिक कुरेशी, पुणे शहर अध्‍यक्ष हसन कुरेशी आदी आंदोलन प्रसंगी उपस्‍थित होते. या वेळी ‘ऑल इंडिया जमियतुल कुरेश अ‍ॅक्‍शन कमिटी’चे शहर अध्‍यक्ष हसन कुरेशी म्‍हणाले की, महापालिकेचे दर आम्‍हाला परवडणारे नाहीत. या निर्णयाविरुद्ध आम्‍ही सदर व्‍यवसायाशी निगडित असणारी सर्व मंडळी यांनी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयात अर्ज प्रविष्‍ट केला आहे. सदरचे प्रकरण हे न्‍यायप्रविष्‍ट असल्‍याने हे प्रकरण निकाली निघण्‍याअगोदर, पशूवधगृह बंद करणे हे न्‍यायाला धरून नाही. त्‍यामुळे पशूवधगृह परस्‍पर बंद करण्‍याचा घेतलेला निर्णय त्‍वरित मागे घ्‍यावा, अन्‍यथा तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी कमिटीने पत्रकाद्वारे दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

कॅम्‍प येथील छत्रपती शिवाजी मार्केट येथे खाटीक व्‍यावसायिकांचे मोठे ‘मटन मार्केट’ आहे. १२५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कोंढवा येथे पशूवधगृह चालू आहे. हे पशूवधगृह बंद करून पुणे महापालिकेच्‍या पशूवधगृहात कॅन्‍टोन्‍मेंटच्‍या व्‍यावसायिकांकरिता सोय करावी, अशा आशयाचे विनंती पत्र नुकतेच ‘पुणे कॅन्‍टोन्‍मेंट बोर्डा’चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांनी महापालिका आरोग्‍य विभागाचे आयुक्‍त आशिष भारती यांना दिले होते. या पत्राला अनुसरून महापालिका आयुक्‍तांनी २५ एप्रिलला ठराव मान्‍य करून यामध्‍ये महापालिकेच्‍या जनावरांची कत्तल झाल्‍यानंतर कॅन्‍टोन्‍मेंटच्‍या जनावरांची कत्तल करण्‍याची अनुमती दिली होती. स्‍थायी समितीच्‍या ठरावात मोठ्या जनावरांसाठी प्रत्‍येकी ८० रुपये, तर लहान प्रत्‍येकी २ जनावरांसाठी ३० रुपये प्रमाणे दर निश्‍चित करण्‍यात आले. तसेच त्‍या जनावरांना घेऊन जाण्‍याचे दायित्‍व हे कॅन्‍टोन्‍मेंट बोर्डाचे राहील, असे पत्रक बोर्डाला महापालिकेने पाठवले होते. त्‍यानुसार बोर्डाच्‍या बैठकीत याविषयी प्रस्‍ताव पारित करून मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांनी जनावरांची वाहतूक करण्‍याचे दायित्‍व खाटिक व्‍यावसायिकांचे राहील आणि व्‍यावसायिकाने पालिकेला ठरलेल्‍या दर द्यावा अशा आशयाचा अध्‍यादेश काढला होता; मात्र या बोर्डाच्‍या निर्णयाला खाटिक व्‍यावसायिकांनी विरोध दर्शवला आहे.

गोरक्षा दल महाराष्ट्राचे पुणे संयोजक हृषी कामथे यांनी सांगितले की,

१. कायदेशीररित्‍या अनुमती असलेल्‍या पशूवधगृहात महाराष्‍ट्रात गायी किंवा गोवंश यांची हत्‍या करण्‍याची अनुमती भारतीय राज्‍यघटना देत नाही. अशा पशूवधगृहात म्‍हशींच्‍या मांसाची खरेदी-विक्री चालते.

२. दौंड, फलटण, इंदापूर, नगर आणि भिगवण यांसारख्‍या ग्रामीण भागांतून सध्‍या पुण्‍यात गोमांस पाठवले जाते. गोमांस पुणे शहर परिसरातील अप्‍पर, कात्रज, वैदवाडी, रामटेकडी किंवा वानवडी सारख्‍या परिसरातील झोपडपट्टीत नेतांना पुणे महापालिकेची म्‍हशीच्‍या पशूवधगृहाची पावती केली जाते.

३. रिक्‍शा, ‘पॅगो’ किंवा अन्‍य चारचाकी वाहने गोमांसाची वाहतूक करतांना वापरली जातात. अशी वाहने गोरक्षकांना किंवा पोलिसांना सापडल्‍यानंतर त्‍यामध्‍ये गायी आणि म्‍हशी यांच्‍या मांसाची मिसळून वाहतूक असते.

४. गोतस्‍कराकडे पुणे महापालिकेच्‍या पशूवधगृहाची पावती असल्‍यामुळे पोलीस कारवाई करण्‍याची टाळाटाळ करून गाडी सोडून देतात. तेव्‍हा खाटिकाचा म्‍हशीच्‍या नावाखाली गायीच्‍या कत्तलीचा व्‍यवसाय कायद्याच्‍या चौकटीत चालू रहातो.

५. यामध्‍ये केवळ मुसलमान समाजातील खाटीक वर्गाचाच हात नसून पोलीस-प्रशासन, मुसलमान सराईत गुन्‍हेगार, तसेच राजकीय व्‍यवस्‍थाही सामील आहे. या गोतस्‍करीच्‍या मागे यंत्रणा कार्यरत आहे. (हे सर्व गैरप्रकार होत असतील, तर वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई केली पाहिजे. – संपादक)