गोवा एक्‍सप्रेसमधील ‘स्‍लिपर कोच’ न्‍यून केल्‍याने प्रवाशांना अनेक अडचणी !

मिरज (जिल्‍हा सांगली) – गोवा एक्‍सप्रेस (वास्‍को-निजामुद्दीन वास्‍को गोवा) या लांब पल्‍ल्‍याच्‍या रेल्‍वेत प्रशासनाने सामान्‍य श्रेणीचे डबे, तसेच शयनयान डबे (स्‍लिपर कोच) न्‍यून केल्‍याने सध्‍या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. १५ जूनपूर्वी या गाडीला ९ ‘स्‍लीपर कोच’ होते, जे सध्‍या केवळ २ करण्‍यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना बसण्‍यासाठी जागा अपुरी पडत असून लोकांना आता ‘स्‍लीपर’ तिकीट मिळणे अडचणीचे झाले आहे. या गाडीत प्रतिदिन चेंगराचेंगरी होत असून वादावादीचे प्रकारही घडत आहेत.

१. पुणे, तसेच त्‍या पुढील सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगाव येथून गोवा येथे जाण्‍यासाठी प्रवाशांना अन्‍य कोणतीच रेल्‍वे उपलब्‍ध नसल्‍याने आणि केवळ २ शयनयान डबे असल्‍याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एकदम ७ डबे अल्‍प करून सध्‍या या गाडीत वातानुकूलित श्रेणीचे डबे वाढवण्‍यात आले आहेत; मात्र इतक्‍या मोठ्या संख्‍येने असलेल्‍या प्रवाशांनी जायचे कुठे ? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

२. गोवा एक्‍सप्रेस दुपारी ३.३० वाजता मडगाव येथून सुटल्‍यानंतर मिरज येथे येईपर्यंत सतत मधल्‍या स्‍थानकांवरील प्रवासी शयनयान डब्‍यात येऊन बसतात. त्‍यामुळे अगोदर आरक्षण केलेल्‍या प्रवाशांना मोठी अडचण येते. देहली येथे जाणार्‍या प्रवाशांकडे सामान भरपूर असल्‍याने सामान कुठे ठेवायचे, ही मोठी अडचणही निर्माण होत आहे. जूनच्‍या अखेरीस, तसेच जुलैच्‍या पहिल्‍या आठवड्यात गाडीत इतकी गर्दी होती की, लोकांना शौचालयात जाणेही दुरापास्‍त झाले होते.

३. शयनयान डबे आणि वातानुकूलित डबे यांच्‍या तिकिटात मोठे अंतर असल्‍याने ७०० रुपयांचा शयनयान श्रेणीतून करावयाचा प्रवास वातानुकूलित श्रेणीतून करतांना ३ सहस्र रुपये मोजावे लागतात.

४. देहलीकडे प्रवास करणारे प्रवासी अनेक मास अगोदर तिकीट काढून ठेवतात, तसेच तात्‍काळ आणि ‘प्रिमीयम’ शयनयान तिकीट घेऊन जे प्रवासी शयनयान डब्‍यातून प्रवास करतात, त्‍यांनाही नियमित तिकीटधारकांचा त्रास सहन करावा लागत आहे.

५. ही गाडी गेल्‍या २ वर्षांपासून आठवड्यातील बहुतांश दिवस प्रतिदिन २ ते ४ घंटे किंवा त्‍याहीपेक्षा अधिक विलंबाने धावत असल्‍याने सांगली-मिरज यांसारख्‍या ठिकाणी प्रवाशांना रात्रभर स्‍थानकावर बसून रहावे लागते. दुसर्‍या दिवशी गोवा येथे पोचण्‍यास विलंब होत असल्‍याने व्‍यापारी, उद्योजक लोकांनाही याचा फटका बसत आहे. (देशाला स्‍वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटूनही रेल्‍वे वेळेत धावत नाहीत, हे संतापजनक आहे. जनतेला त्रास देणार्‍या रेल्‍वे प्रशासनाला सरकारने जाब विचारणे आवश्‍यक ! – संपादक)

६. या संदर्भात मिरज येथील ‘रेल्‍वे कृती समिती’चे श्री. मकरंद देशपांडे आणि श्री. सुकुमार पाटील म्‍हणाले, ‘‘गोवा एक्‍सप्रेसच्‍या गाड्यांच्‍या डब्‍यांच्‍या रचनेत पालट केल्‍याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याविषयी पुणे विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापकांशी संपर्क साधला आहे. या गाडीचे डबे पूर्ववत् करावेत किंवा गोवा ते निजामुद्दीनपर्यंत संपूर्ण ‘शयनयान डबे’ असलेली जादा रेल्‍वे सोडावी, अशी मागणी आम्‍ही समितीच्‍या वतीने केली आहे.’’

गोवा एक्‍सप्रेसमधील शयनयान डब्‍यांची संख्‍या न्‍यून केल्‍यावर प्रवाशांना कोणत्‍या अडचणी येतील, याचा अभ्‍यास प्रशासनाने केला नाही का ? अभ्‍यास न करता निर्णय घेतल्‍याने प्रवाशांना येणार्‍या अडचणींचे दायित्‍व कुणाचे ? सारासार विचार न करता जनतेला त्रास होईल, असे निर्णय घेणारे प्रशासन काय कामाचे ?