प्रदीप कुरुलकर यांनी २ महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे ए.टी.एस्.च्या अन्वेषणात उघडकीस !
कुरुलकरांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता !
पुणे – पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप असलेले डी.आर्.डी.ओ.चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी डी.आर्.डी.ओ.तील कामाची कंत्राटे देतांना २ महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. ए.टी.एस्.ने (आतंकवादी विरोधी पथकाने) न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्यदलांसाठी तंत्रज्ञान विकसित करणार्या, क्षेपणास्त्र मोहिमांची आखणी करणार्या डी.आर्.डी.ओ.सारख्या नामवंत संस्थेच्या आवारात हे प्रकार घडत होते. (डी.आर्.डी.ओ.सारख्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण संस्थेमध्ये असे प्रकार घडणे लज्जास्पद आहे ! – संपादक) आपण किती महत्त्वाच्या संस्थेचे नेतृत्व करत आहोत याचे भान कुरुलकरांना नव्हते, हेच यातून स्पष्ट झाले आहे.
ए.टी.एस्.च्या अन्वेषणात उघडकीस झालेली माहिती
१. कुरुलकरांच्या भ्रमणभाषमध्ये अनेक महिलांचे भ्रमणभाष क्रमांक आणि ‘व्हॉट्सअॅप चॅट’ आढळून आले. कुरुलकरांनी मागील वर्षभरात जिथे प्रवास केला होता, तिथे ए.टी.एस्.ने अन्वेषण केले. या अन्वेषणात मुंबईतील कलिना इथल्या ‘गेस्ट हाऊस’मध्ये कुरुलकर वेगवेगळ्या ६ महिलांना भेटल्याचे ‘सी.सी.टी.व्ही. चित्रणा’त आढळून आले.
२. या महिलांचा माग काढत ए.टी.एस्.ने त्यांची चौकशी केली असता त्यांपैकी २ महिलांनी कुरुलकरांनी लैंगिक शोषण केल्याचे सांगितले.
३. एकीकडे लंडनमध्ये बसलेल्या झारा दास गुप्ताशी कुरुलकरांचे अश्लील ‘चॅटिंग’ चालू होते, तर दुसरीकडे इथे भारतात त्याच काळात कुरुलकर ६ वेगवगेळ्या महिलांना डी.आर्.डी.ओ.च्या ‘गेस्ट हाऊस’मध्ये भेटत होते.
४. डी.आर्.डी.ओ.च्या वर्तुळात कुरुलकरांची एक रंगेल अधिकारी अशीच प्रतिमा सिद्ध झाली होती. या सर्व गोष्टींची आणि कुरुलकरांच्या सवयींची माहिती काढून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेंनी कुरुलकरांना जाळ्यात अडकवले.
५. कुरुलकरांना अटक केल्यानंतर त्यांनी कोणती गोपनीय माहिती शत्रूराष्ट्राला दिली आहे ? आणि ते त्यासाठी कोणाला भेटले ? याचे अन्वेषण ए.टी.एस्.ने चालू केले.
डॉ. कुरुलकर आणि पाकिस्तानी झाराचं व्हाट्सअॅप चॅटिंग उघड, राष्ट्राची माहिती दिल्याने खळबळ#Pradipkurulkar #Pune #Punenews #Saamtv #Saamtvdigital #Saam https://t.co/bq7OkMI6hw
— SaamTV News (@saamTVnews) July 10, 2023