रत्नागिरी जिल्ह्यात ‘मनसे’ची मोहीम
‘एक सही संतापाची’
रत्नागिरी – राज्याची सद्य:स्थिती, राजकारण्यांची राजकीय स्वार्थासाठी अभद्र युती याच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसेच्या) ‘एक सही संतापाची’ या मोहिमेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत संताप व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही मोहीम संपूर्ण राज्यासह जिल्हात रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर अशी सर्वत्र राबवली जात आहे.
सद्य:स्थितीत कोण कोणत्या पक्षात जाईल ? हे सांगणे अवघड झाले आहे. ४ वर्षांत अनेक वेळा सत्तापालट झाला आहे. मतदारांचा विश्वासघात केला जात आहे. एकदा मतदान केले की, तुम्हाला गृहीत धरणार? राजकारणाचा चिखल झाला आहे का? असे प्रश्न विचारत जर संताप होत असेल, तर त्या संतापाची सही करून स्वत:चा संताप नोंदवा, अशा पद्धतीची मोहीम मनसे राबवत आहे.
रत्नागिरी शहरात माळनाका, मांडवी समुद्रकिनारा या ठिकाणी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होत स्वाक्षरी नोंदवत स्वत:चा रोष व्यक्त केला. ‘राज ठाकरे आता एकमेव पर्याय आहेत’, अशी भावनाही या ठिकाणी व्यक्त झाली आहे. या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, पदाधिकारी आणि मनसे सैनिक उपस्थित होते.
चिपळूण येथे बहादूरशेख नाका येथे रत्नागिरी जिल्हा वाहतूक सेनेच्या वतीने ही मोहीम राबवण्यात आली. या वेळी वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले म्हणाले, ‘‘मला माझ्या दैवताचा अभिमान वाटत आहे. या चिखलात आमचा नेता आणि आमचा पक्ष नाही. त्या सर्वांनी राजकारणाचे वाटोळे केले आहे. म्हणूनच एक वेळेला फक्त मनसेला सत्तेत बसवा. बघा, महाराष्ट्र राज्य कसे प्रगतीपथावर असेल. आता आपण मतदारांनी जागरूक होऊन मतदान केले पाहिजे अन्यथा हे असेच चालू राहील. यासाठी मतदारांनी पुढाकार घेतला पाहिजे.’’ या वेळी प्रदीप संसारे, मंगेश महाडिक, राहुल शिंदे, मनोज कोलगे, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.