साधू-संतांनी नेहमीच राजकारणापासून दूर राहिले पाहिजे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री
नवी देहली – साधू-संतांनी राजकारणाकडे पाहूही नये. साधू-संतांना राजकारणापासून नेहमीच दूर राहिले पाहिजे. राजकारणात आल्याने मर्यादा येतात. साधूंना त्याचा प्रवास अमर्याद ठेवण्याची आवश्यकता आहे, असे विधान बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले. ‘तुम्ही राजकारणात येणार का ?’, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
सौजन्य न्यूज ऑनटाइम
देशात समान नागरी कायदा हवाच !
समान नागरी कायद्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, मी या कायद्याचे समर्थन करतो. देशासाठी समान नागरी कायदा अत्यंत आवश्यक आहे. एका देशात २ कायदे कसे असू शकतात ? जर एकाच वडिलांची २ मुले असतील, त्यांना वेगवेगळ्या सुविधा कशा दिल्या जातील ? असा प्रश्न त्यांनी विचारला. समान नागरी कायद्याद्वारे कोणत्याही धर्माच्या परंपरावर आघात केले जाणार नाहीत.
१०० कोटींमधील दोन तृतियांश हिंदू जरी जागे झाले, तर हिंदु राष्ट्र स्थापन होईल !
हिंदु राष्ट्राविषयी धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, हिंदु कुंभकर्णी झोपेत आहेत. त्यांना उठवण्याची आवश्यकता आहे. मी कुणालाही चिथावणी देत नाही. मी हिंदूंना त्यांची खरी ओळख जाणून घेण्यास आणि सनातन परंपरा अन् संस्कृती यांच्याविषयी सतर्क रहाण्यास सांगत आहे. देशातील १०० कोटी हिंदूंमधील दोन तृतियांश हिंदू जरी जागे झाले, तर भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यापासून कुणी रोखू शकत नाही. इतके हिंदू जागे झाले की, त्यांनी हिंदु राष्ट्रासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे.