राज्यातील राजकीय घडामोडींवर पुणेकरांचा ‘एक सही संतापाची’ मोहिमेस प्रचंड प्रतिसाद !
पुणे – महाराष्ट्रातील घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर सामान्य मतदारांनी स्वत:ची संतप्त प्रतिक्रिया नोंदवली. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील शनिपार चौकामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली ‘एक सही संतापाची’ या मोहिमेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही पक्षातील नेत्यांमध्ये पक्षनिष्ठा दिसून येत नाही, अशा शब्दांमध्ये पुणेकर नागरिकांनी राजकीय नेत्यांना सुनावले आहे.
मागील काही मासांमध्ये देश आणि राज्यात चुकीच्या पद्धतीने राजकारण चालू आहे. आपण आज एकाला मतदान केले; पण ४ वर्षांत कोण कोणासह गेले ? हे समजत नसून या राजकीय लोकांनी लोकशाहीची थट्टा केल्याचे यातून दिसून येत आहे. एकमेकांवर खालच्या स्तरावर आरोप-प्रत्यारोप करायचे आणि काही घंट्यांमध्ये सत्तेसाठी त्यांच्याकडे जायचे, हे अत्यंच चुकीचे आहे. (जनतेला अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना जाणीव करून द्यावी लागणे, हे हास्यास्पद ! – संपादक)