रेल्वेत बाँबस्फोट करण्याच्या संशयास्पद संदेशानंतर महाराष्ट्रातील रेल्वेस्थानकांवर सतर्कतेची चेतावणी !
संदेश पाठवणार्याला गोवा येथून घेतले कह्यात !
छत्रपती संभाजीनगर – मुंबई पोलिसांना ७ जुलै या दिवशी रेल्वेत बाँबस्फोट घडवण्याविषयी संशयास्पद संपर्क आल्यानंतर राज्यभरातील रेल्वेस्थानकांवर सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. बाँबस्फोट करण्याचा संदेश देणार्या समाजकंटकाला गोवा येथे अटक करण्यात आली आहे.
‘७ जुलै या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या आत रेल्वेगाडीत बाँबस्फोट केला जाणार आहे’, अशी धमकी समाजकंटकाने दिली होती; मात्र स्फोट कुठे, कोणत्या गाडीत होणार ? ते त्याने सांगितले नाही. त्यामुळे धमकीची माहिती कळताच मुंबईच नव्हे, तर अवघी राज्य पोलीस यंत्रणाच खडबडून जागी झाली, तर मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मिरज, सोलापूर, कोल्हापूर रेल्वेस्थानकांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रेल्वेस्थानकावर पोलिसांची गस्त पहायला मिळत होती. समवेतच काही रेल्वेमध्येही पोलिसांनी गस्त घातली. २ दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना ‘रेल्वे पॅक होगा, हम हमारा काम करेंगे’ अशा आशयाचा संदेश रात्री प्राप्त झाला होता. त्यानंतर मुंबई येथील सर्व रेल्वेस्थानकांवर पोलीस विभाग सक्रीय झाला होता. बाँबशोधक पथक आणि श्वानांच्या साहाय्याने रेल्वेस्थानकांचा कानाकोपरा पिंजून काढण्यात आला; मात्र कोणताही संशयास्पद प्रकार समोर आला नाही.