सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ! – नरहरि झिरवळ, उपाध्यक्ष, विधानसभा
मुंबई – सर्व बाजूने विचार केला, तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत; पण हा निर्णय शेवटी अध्यक्षांकडे असेल. त्यांच्याकडे शेवटचे अधिकार आहेत. त्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करणे उचित ठरणार नाही, असे महत्त्वाचे विधान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवळ यांनी १० जुलै या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
अपात्रतेची निर्णयप्रक्रिया चालू झाल्यावर नरहरि झिरवळ यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर व्यवस्थित अभ्यास करून निर्णय दिला जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर आता या आमदारांच्या अपात्रतेची निर्णयप्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्या १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णयप्रक्रिया तातडीने घेण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यानंतर आता या आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे.