‘कोलेस्ट्रॉल’ (रक्तातील एक घटक) न्यून करणार्या औषधांमुळे होणारे गंभीर त्वचारोग !
‘माझे अतिशय जवळचे एक नातेवाईक आहेत. ते त्वचेच्या समस्या आणि विशेषतः चेहर्यावर लाल पुरळ उठणे यांसाठी गेल्या ४ वर्षांपासून अनेक त्वचारोगतज्ञांकडून उपचार घेत होते. उन्हात गेल्यावर त्यांचा त्रास अधिकच वाढायचा. गेल्या एक मासापासून त्यांच्या अंगावर अचानक लाल पुरळ दिसू लागले आणि खाज सुटू लागली, तसेच ती सतत वाढत गेली. एके दिवशी मी त्यांचे पाय, छाती इत्यादींवर लाल ठिपके पाहिले. तेव्हा मला प्रथम वाटले की, ते अंडी, मांस, आंबट आणि मसालेदार पदार्थ इत्यादी सेवन करत असतील. त्यामुळे ही समस्या उद़्भवली असेल. नंतर माझ्या लक्षात आले की, ते गेल्या १५ वर्षांपासून कोलेस्ट्रॉल न्यून करण्यासाठी ‘स्टॅटिन’ औषध घेत आहेत.
१. औषधांच्या दुष्परिणामांविषयीच्या संशोधनातून त्वचारोग होण्यामागील कारण कळणे
त्यानंतर मी अशी औषधे जसे ‘एटोरवॅस्टॅटिन’चा (Atorvastatin) त्वचेवरील दुष्परिणामाच्या संदर्भात काही संशोधनात्मक लेख वाचायला प्रारंभ केला. तेव्हा त्यांचा त्वचेच्या रोगांशी थेट संबंध असल्याचे अनेक शोधनिबंधांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि त्या नातेवाईकाच्या त्वचेवरील पुरळही या लेखांमध्ये वर्णन केल्याप्रमाणेच आहेत. तेव्हा ‘हे सर्व वैद्यकीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित होत असतांना त्याकडे एकाही उच्च पदस्थ डॉक्टरचे लक्ष का गेले नाही ?’, याचे मला आश्चर्य वाटले.
२. हृदयविकार टाळण्यासाठी घेतले जाणारे औषध बंद केल्यावर त्वचारोगाविषयी लक्षात आलेला लक्षणीय भेद
आता ही औषधे कोलेस्ट्रॉल न्यून ठेवून हृदयविकार टाळण्यासाठी घेतली जात होती. त्यामुळे हा निर्णय घेणे अवघड होते; पण मग १० दिवस ही औषधे बंद करून बघूया, असे वाटले.
आश्चर्यजनक म्हणजे केवळ ५ दिवसांत चमत्कारिकरित्या लक्षणीय भेद दिसून आला आणि १० व्या दिवशी त्वचा पूर्णपणे बरी झाली. याखेरीज रणरणत्या उन्हात बराच वेळ बसूनही त्यांना अॅलर्जी झाली नाही. नुकतेच कळले की, आमच्या आणखी एका नातेवाईकाच्या चेहर्यावर पुरळ येत आहे आणि तेही उन्हात जाऊ शकत नाहीत. विशेष म्हणजे तेही कोलेस्ट्रॉल न्यून करण्यासाठी अनेक वर्षांपासून ‘स्टॅटिन’ घेत आहेत.
३. नवीन संशोधनांकडे दुर्लक्ष करता कामा नये !
या रासायनिक औषधांमुळे किती लोकांना अनेक आजार होतात, हे ठाऊक नाही; पण परिस्थिती बिघडत रहाते, नवनवीन औषधे वाढतच जातात; पण ही समस्या कुठल्या औषधामुळे तर नाही ना, याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. केवळ ‘प्रोटोकॉल’ (मसुदा) बनवले गेले आहेत. ज्याद्वारे आपले डॉक्टर बांधील आहेत आणि नवीन संशोधने पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलवर विशेषत: ‘एल्.डी.एल्. कोलेस्ट्रॉल’वरही नवीन संशोधन समोर आले आहे की, हृदयविकाराचे असे काही खास कारण नाही की, ज्यासाठी अशी हानीकारक औषधे आयुष्यभर घ्यावीत.’
– डॉ. विवेक शील अग्रवाल, नवी देहली (२२.६.२०२३)