श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन आणि गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न !
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’च्या जयघोषात श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या, वाद्यांच्या गजरात गुरुपौर्णिमा उत्सव अन् मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. नादब्रह्म, पुणे यांचे ढोल पथक, अमोलराजे भोसले यांचा लेझीम संघ, केरळ येथील ढोल पथक, हरियाणा येथील श्री हनुमान देखावा आणि कोल्हापूर येथील हलगी पथक यांच्या सहभागाने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचलन आणि आभार प्राध्यापक श्री. प्रकाश सुरवसे यांनी मानले.
रथाची आणि पालखी मिरवणूक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणातून निघून नवी विहीर, राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ मार्गे, समर्थ चौक, वीर सावरकर चौक, राम गल्ली, गुरु मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे अन्नछत्र मंडळात आरतीने सांगता करण्यात आली. या भव्य-दिव्य पालखी सोहळ्याचे नेटके आणि सुयोग्य नियोजन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख कार्यकारी विश्वस्त आणि संयोजक अमोलराजे भोसले यांनी केले. मिरवणूकप्रसंगी विविध सामाजिक संघटनांकडून महाप्रसाद,पाणी यांचे पालखी मार्गावर वाटप करण्यात आले.