गुलामगिरीच्या खुणा मिटवा !
भारत १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. इंग्रजानी भारताला मराठ्यांच्या हातातून खेचून घेतले होते आणि त्यापूर्वी मराठ्यांनी मोगलांच्या अत्याचारी राजवटीतून भारताची मुक्तता केली होती. म्हणजेच भारताला स्वतंत्र केले आणि मराठ्यांच्या पतनानंतर भारत पुन्हा पारतंत्र्यात गेला. क्रांतीकारक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे भारत पुन्हा मुक्त झाला. वर्ष १५०८ पासून भारताचाच एक भाग असणारा गोवा पोर्तुगिजांच्या गुलामगिरीत गेला होता. जवळपास साडेचारशे वर्षे तो गुलामगिरीत राहिल्यानंतर त्याला १९ डिसेंबर १९६१ या दिवशी स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने सैनिकी कारवाई करून गोव्याला मुक्त करणे अपेक्षित होते; मात्र नेहरूंच्या आत्मघातकी धोरणामुळे ते होऊ शकले नाही. शेवटी अन्य राजकीय नेते, देशभक्त आणि गोव्यातील नागरिक यांच्या रेट्यामुळे शेवटी गोवा स्वतंत्र झाला. जसा भारत स्वतंत्र झाल्यानंतर मोगल आणि इंग्रज यांच्या गुलामगिरीच्या खुणा पुसण्याची आवश्यकता होती, तशीच आवश्यकता गोव्यात पोर्तुगिजांच्या गुलामगिरीच्या खुणा पुसण्याची आवश्यकता होती. भारतात जे झाले नाही, तेच गोव्यातही झाले नाही; मात्र आता काळ पालटत आहे. देशात आज या खुणा पालटण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. उत्तरप्रदेशात अनेक जिल्हे, शहरे आदींची मोगलकालीन नावे पालटण्यात येऊन त्यांची मूळ भारतीय नावे त्यांना देण्यात आली. अनेक ठिकाणी असे होत आहे. हीच प्रक्रिया गोव्यात त्याच्या स्वातंत्र्यानंतर होणे आवश्यक होती आणि आतातरी ती होणे आवश्यक आहे; मात्र तसे होतांना दिसत नाही, हे हिंदूंसाठी लज्जास्पदच म्हणावे लागेल. संपूर्ण भारतात गुलामगिरीच्या सहस्रावधी खुणा आजही आपल्याला ‘आपण गुलाम होतो’, हे दाखवत आहेत. ते पालटण्यासाठी जी इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे, ती अल्पच दिसत आहे. काही ठिकाणी पालट होत असले, तरी ते पुष्कळ अल्प आहेत. गुजरातच्या अहमदाबाद शहराचे नामांतर अद्यापही कर्णावती झालेले नाही, हे एक मुख्य उदाहरण म्हणून सांगता येईल. याचप्रमाणे लहान गोव्यात पोर्तुगिजांनी दिलेली अशी असंख्य नावे आहेत, जी वर्ष १९६१ नंतर पालटण्याची आवश्यकता होती. जर सरकार तसा विचार करत नव्हते, तर देशभक्त जनतेने त्याची मागणी करत सरकारवर दबाव निर्माण करून ते करवून घेण्याची आवश्यकता होती; मात्र तसे काही गेल्या ६२ वर्षांत दिसून आले नाही. ‘याला विविध कारणे आहेत’, असे जरी म्हटले, तरी ‘त्यासाठी असणारी देशभक्तीची आणि स्वाभिमानाची भावना अल्प पडली’, असेच म्हणायला हवे. ‘नावात काय असते ?’, असे शेक्सपिअर या प्रसिद्ध लेखकाचे वाक्य आहे; मात्र नावात बरेच काही असते, हे लक्षात घ्यायला हवे. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे नाव उच्चारल्यावर जी क्षात्रतेजाची भावना मनात निर्माण होते, त्याच्याविरुद्ध ‘औरंगजेब’ हे नाव उच्चारल्यावर होते, यातून नावात काय असते, हे लक्षात येते. यामुळेच गुलामगिरीच्या खुणा या बहुतेक नामातूनच लक्षात येत आहेत.
सरकारने आदेश काढावा !
भारतावर मोगलांनी आक्रमण केल्यानंतर त्यांनी देशातील बहुतेक ठिकाणांची नावे इस्लामनुसार ठेवली. यातून त्यांनी हिंदूंचा धर्म आणि संस्कृती यांवर आक्रमण केले. ते आक्रमणाचे जोखड आजही आपण वाहत आहोत. पोर्तुगिजांनीही वेगळे काही केले नाही. त्यांनीही हेच केले. पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यात जो काही भेद होता, तो धर्मांतर आणि नामांतर यांत होता. जे पोर्तुगिजांनी हिंदूंच्या संदर्भात गोव्यात केले, ते इंग्रजांनी संपूर्ण देशात केले नाही. आज विदेशींना नाही, तर भारतियांनाच गोवा म्हणजे सकाळ-संध्याकाळ दारू पिणार्यांचे, अर्धनग्न रहाणार्यांचे, चर्चचे, ख्रिस्त्यांचे राज्य अशी प्रतिमा आहे; मात्र हे संपूर्ण चुकीचे आहे. गोवा हे मंदिरांचे, धार्मिक आणि सांस्कृतिक ठेव्यांचे राज्य आहे, हे भारतियांना गेल्या ६२ वर्षांत सांगितले गेले नाही. आता गोवा सरकार यासाठी काही प्रमाणात प्रयत्न करू लागले आहे. आजही गोव्यातील पोर्तुगीजकालीन नावे तशीच आहेत. पणजी असे नाव असतांना आजही त्याचे ‘पेनजिम्’, तसेच डिचोलीचे ‘बिचोलिम्’ अशा प्रकारची पोर्तुगीज पद्धतीने उच्चारणा केली जाते. हे थांबवणे आवश्यक आहे. राज्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना यासाठी त्यांच्या परीने सरकारकडे मागणी करत आहेत. लोकांमध्ये जागृती करत आहेत; मात्र हे सरकारने स्वतःहून करणे अपेक्षित आहे. गोव्यात २५ टक्के ख्रिस्ती आहेत, तर बहुसंख्य हिंदू आहेत. जे ख्रिस्ती आहेत, त्यांचे पूर्वज हिंदु होते आणि त्यांना पोर्तुगिजांनी बाटवले, हा इतिहास आहे अन् तो त्यांनाही ठाऊक आहे. तर मग ही नावे आणि अन्य गुलामगिरीच्या खुणा का पुसता येत नाहीत ? हा प्रश्न उपस्थित होतो. याला राजकारण, मतांची गणिते आणि इच्छाशक्तीचा अभाव, हीच कारणे दिसतात. भारताचा शोध लावणार्या वास्को-द-गामा याच्या नावाने आज ‘वास्को’ हे शहर ओळखले जाते. वास्को-द-गामा हा लुटारू होता आणि या आक्रमकाचे नाव आपण गेली अनेक दशके मिरवत आहोत, हे लज्जास्पदच म्हणावे लागेल. जगाच्या पाठीवर अशा प्रकारची मानसिकता असणारे कुणी नसतील. वास्को शहराचे नाव पालटून ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याची मागणी गोव्यातील धर्माभिमान्यांकडून केली जात आहे. वास्को हे नाव एक उदाहरण आहे, गोव्यात शेकडो नावे पोर्तुगीजकालीन आहेत. ती युद्धपातळीवर पालटण्याची आवश्यकता आहे. एक दिवस हे करावेच लागणार आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल यांनी एका आदेशाद्वारे देशातील ५६२ संस्थाने भारतात विलीन करून घेतली, तसे गोवा सरकारने एका आदेशाद्वारे राज्यातील सर्वच पोर्तुगीज नावे पालटून त्या ठिकाणची मूळ भारतीय नावे अधिकृत केली पाहिजेत’, अशी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांची अपेक्षा आहे.
मोगल, इंग्रज, पोर्तुगीज यांचे गुलाम होतो, हे दाखवणार्या खुणा आपण किती दिवस मिरवणार आहोत ? |