स्त्रियांनो, केस कापल्याने होत असलेली आध्यात्मिक हानी आणि केस वाढवल्याने होणारे लाभ जाणून केस न कापता ते वाढवा !
पूर्वीच्या काळी स्त्रिया आपले केस वाढवायच्या; मात्र ‘मागील काही वर्षांपासून अनेक स्त्रियांचा कल केस कापण्याकडे आहे’, असे आढळते. ‘फॅशन’ म्हणून, तर काही जणी सोय म्हणून स्वत:चे केस कापतात. ‘सौंदर्यवर्धन’ या हेतूने अनेक जणी केस आखूड करून केसांचे वेगवेगळे ‘कट’ करतात. केस कापल्यामुळे त्यांची टोके उघडी होऊन केशनलिकांतून रज-तमात्मक लहरी केसांत सहजतेने संक्रमित होतात. यामुळे स्त्रियांचा अनिष्ट शक्तींचा त्रास वाढण्याची शक्यता बळावते आणि त्यांच्यामध्ये बहिर्मुखता, अस्थिरता, रागीटपणा, तसेच भावनाप्रधानता वाढल्याचे निदर्शनाला येते. त्यामुळे स्त्रीने केस कापणे, केस मोकळे सोडून फिरणे आदींसारख्या गोष्टी सौंदर्यवर्धनाच्या दृष्टीने स्त्रियांना चांगल्या वाटत असल्या, तरी त्याद्वारे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांना आमंत्रण देण्यासारखे आहे.
मानवी शरिरात निसर्गाने केलेली केसांची योजना ही केवळ सौंदर्यवर्धनासाठी नाही, तर केसांच्या माध्यमातून ईश्वरी चैतन्य ग्रहण करणे आणि जिवाची सात्त्विकता वाढवणे, यांसाठी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच ‘स्त्रियांनी केस कापणे’, हे हिंदु धर्मशास्त्रानुसार निषिद्ध मानले आहे.
हिंदूंमध्ये धार्मिक आचारांविषयी अनास्था निर्माण झाल्यामुळे अशा निषिद्ध गोष्टी करण्यामध्ये वाढ झाली असून यामुळे स्त्रियांची आध्यात्मिक दृष्टीने पुष्कळ हानी झाली आहे. स्त्रियांनी केस वाढवल्याने त्यांच्या देहातील शक्तीतत्त्व सतत जागृत रहाते आणि त्यामुळे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून त्यांचे रक्षण होते. त्यामुळे स्त्रियांनी केस न कापता ते वाढवावेत. (९.६.२०२३)