छत्रपती संभाजीनगर येथील उत्तरपत्रिकांच्या हस्ताक्षर पालट प्रकरणातील आरोपी दीड मासापासून पसार !
छत्रपती संभाजीनगर – राज्यात गाजलेल्या इयत्ता १२ वीच्या ‘भौतिकशास्त्र’ विषयाच्या उत्तरपत्रिकांच्या हस्ताक्षर पालट प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे; मात्र या प्रकरणातील आरोपी तब्बल ४५ दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. भगवानसिंग उसारे आणि मनीषा शिंदे असे या दोन्ही आरोपी शिक्षकांची नावे असून गेल्या दीड मासापासून फर्दापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तथापि अजूनही त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही, तसेच दोन्ही आरोपींचे भ्रमणभाषही बंद आहेत.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि इतर ठिकाणच्या इयत्ता १२ वीच्या ‘भौतिकशास्त्र’ विषयाच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर पालट आढळून आल्याने शिक्षण मंडळाने या प्रकरणी चौकशी समितीची नेमणूक केली होती. विशेष म्हणजे ३७२ उत्तरपत्रिकेत अक्षरात पालट असतांनाही या दोन्ही शिक्षकांनी याची माहिती शिक्षण मंडळाला दिली नव्हती. पोलीस दोन्ही आरोपींच्या घरावर पाळत ठेवून आहेत, तसेच या प्रकरणात आतापर्यंत एकूण ३० जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. त्यामुळे एवढ्या महत्त्वाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना दीड मास उलटूनही न सापडणे हे दुर्दैवी आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
संपादकीय भूमिका :महत्त्वाच्या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडत नाहीत, हे पोलिसांना लज्जास्पद आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकांची माहिती समजल्यानंतर त्यांना लगेचच का पकडले नाही ? यामुळे आरोपी पसार होण्यात पोलिसांचा सहभाग तर नाही ना ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? |