हिंदु राष्ट्र सेनेकडून के. चंद्रशेखर राव यांच्या फलकावर शाईफेक करत निषेध !
बी.आर्.एस्. पक्षाचे मौलाना अब्दुल यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याचे प्रकरण
सोलापूर, १० जुलै (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर येथे बी.आर्.एस्. पक्षाचा पदाधिकारी मौलाना अब्दुल याने लुटारू औरंगजेबाचे उदात्तीकरण करत ‘औरंगजेब आमचा आदर्श आहे’,असे संतापजनक विधान केले आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या गजवेल मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली आहे. या घटनांच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार या ठिकाणी के.सी.आर्. यांच्या फलकावर शाईफेक करून निषेध व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी हिंदु राष्ट्र सेनेचे शहरप्रमुख श्री. रवि गोणे, शहर उपाध्यक्ष श्री. विलास पोतू, तसेच सर्वश्री श्रीकांत सुरवसे, विजय महिंद्रकर, लिंबाजी जाधव, शिरीष येमूल यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘के.सी.आर्. यांना महाराष्ट्रात यायचे असेल, तर त्यांनी शिवभक्तांची क्षमा मागावी, अन्यथा महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही’, अशी चेतावणी हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने या वेळी देण्यात आली.