महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयात डब्ल्यू -२० अंतर्गत बचत गट महिलांसाठी प्रशिक्षण आणि चर्चासत्र
रत्नागिरी – भारताकडे असलेल्या जी-२० अध्यक्षपदाच्या कार्यकाळात देशभरात विविध प्रकारच्या बैठका, प्रशिक्षणे, चर्चासत्रे, कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या अनुषंगाने रत्नागिरीत शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डब्ल्यू- २० अंतर्गत महिलांसाठी प्रशिक्षण आणि चर्चासत्र होणार आहे. येत्या १५ जुलैला कर्वे संस्थेच्या शिरगाव येथील कडवाडकर संकुलात हा कार्यक्रम होणार आहे.
भारत सरकारने एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठाला शैक्षणिक भागीदार म्हणून डब्ल्यू-२० चे आयोजन करण्याची घोषणा केली. या अनुषंगाने विद्यापिठाने काही निवडक महाविद्यालयांची निवड डब्ल्यू-२० आयोजनासाठी केली आहे. याच विद्यापिठाशी संलग्न असलेल्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन फॉर वुमेनला डब्ल्यू-२० च्या आयोजनाची संधी मिळाली आहे.
वुमन लिड डेव्हलपमेंट या अंतर्गत ‘ग्रासरूट वुमन लिडरशीप’ या विषयाची निवड केली आहे. यात बीसीए महाविद्यालयाने रत्नागिरीतील विविध बचत गटांच्या समस्या आणि सूचना एस्.एन्.डी.टी. विद्यापिठापर्यंत पोचवण्याचे ठरवले आहे. यामध्ये तालुक्यातील बचत गटाच्या सर्व १० क्लस्टर को- ऑर्डिनेटर्स यांचे तळागाळातील महिलांचे नेतृत्व या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. याचसमवेत डिजीटल मार्केटिंग या संदर्भात कार्यशाळा आणि या १० क्लस्टर्सचे बचतगट स्टॉल प्रदर्शन आणि विक्रीसाठी असणार आहेत.