ज्ञान आणि प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारा पुणे येथील सनातनचा गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !
पुणे, ४ जुलै (वार्ता.)– अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात ते गुरु ! वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. आषाढ पौर्णिमेचा हा दिवस म्हणजेच साधकांच्या मनांत गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनमोल क्षणच असतो. हीच अनुभूती सनातनच्या साधकांसह समाजातील जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांनी यंदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेतली.
‘सनातन संस्थे’च्या वतीने ३ जुलै या दिवशी पुणे येथील जुन्नर, दिघी, हडपसर, धनकवडी, सिंहगड रस्ता, प्रभात रोड(एरंडवणे), तळेगाव, भोर या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. सात्यकी सावरकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी, श्री. पराग गोखले, तसेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान’चे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, ‘स्वा. सावरकर युवा विचार मंच’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर, ह.भ.प. राजेंद्र महाराज शास्त्री आणि अधिवक्त्या सौ. मृणाल व्यवहारे-साखरे आदींनी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ३ सहस्र ६२५ हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. दिघी येथे सकाळच्या सत्रात सनातनच्य संत पू. ननावरेआजी, पू. (सौ.) संगीत पाटील, पू. श्रीमती सुलभा जोशीआजी यांची वंदनीय उपस्थिती लाभली. संध्याकाळच्या सत्रात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गगुरु (कु.) स्वाती खाडये, पू. (सौ.) मनीषा पाठक आणि पू. (सौ.) संगीता पाटील यांची वंदनीय उपस्थिती होती.
या महोत्सवात समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार, तसेच ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन झाले. तसेच स्वसंरक्षण प्रात्यक्षिके हे विशेष आकर्षण ठरले. विविध विषयांवरील आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात आले होते.
हिंदु राष्ट्राच्या मार्गावर चालणार्यांचे दर्शन घ्यायला आलो आहे ! – विद्याधर नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान
( कोथरूड येथील गुरुपौर्णिमा )
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमान येथील कारागृहात साधा कागद, पेन्सिल नसतांनाही कारागृहाच्या भिंतीवर ५ सहस्र पंक्तींचे काव्य लिहून ते पाठ केले आणि कारागृहातून बाहेर आल्यावर ते लोकांना लिहून दाखवले. हे ज्यांनी केले त्यांचे मनोधैर्य खचलेले असेल का ? या वेळी श्री. विद्याधर नारगोलकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी असलेल्या विविध आक्षेपांचे खंडन केले. ‘मी मार्गदर्शन करायला आलो नाही, तर हिंदु राष्ट्राच्या मार्गावर चालणार्यांचे दर्शन घ्यायला आलो आहे’, असे त्यांनी सांगितले. ते श्री कोहिनूर मंगल कार्यालय, प्रभात रोड या ठिकाणी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.
या सोहळ्यास ४०० हून अधिक धर्मप्रेमी आणि जिज्ञासू उपस्थित होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन ६४ टक्के आध्यत्मिक पातळी असलेले साधक श्री. सम्राट देशपांडे यांनी केले.
श्री. नारगोलकर पुढे म्हणाले की, शंकराचार्यांना अटक झाली, तेव्हा पहिले आंदोलन समितीने केले, याशिवाय बसस्थानकाची दुरवस्था, हलाल जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहाद, पंढरपूर येथील मंदिराचा भ्रष्टाचार असो, कोणतेही सूत्र असो, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या सर्व सूत्रांवर समाजात जागरूकता निर्माण करत आहे.
सत्कार
सनातनची युवा साधिका कु. संजना संकेत कुलकर्णी, युवा साधक कु. आर्य प्रवीण नाईक, कु. ऋषिकेश सुधीर तावरे यांनी साधना आणि सेवा करत १२ वी इयत्तेत सुयश प्राप्त केले. त्यानिमित्त ६८ टक्के अध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. वर्षा भिडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमात भाजपचे माजी नगरसेवक श्री. जयंत भावे, सौ. मंजुश्री संदीप खर्डेकर, ‘स्वारद फाउंडेशन’च्या सौ. स्वाती मोहोळ यांची उपस्थिती लाभली.
सहकार्य
१. ‘कोहिनूर मंगल कार्यालया’चे श्री. साने बंधू यांनी कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले.
२. श्री. सुरेश रानडे यांनी मंडप साहित्य, तर श्री. भाग्येश बंगाळे यांनी प्रोजेक्टर विनामूल्य उपलब्ध करून दिले.
वैशिष्टपूर्ण घटना
१.’कीक्ट्रॉनिक्स कंपनी’च्या मालक सौ. दीपा कुलकर्णी यांनी पूर्णवेळ कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांच्या कर्मचार्यांसाठी मार्गदर्शन ठेवण्यासाठी त्यांनी सांगितले आहे. त्याचसमवेत त्यांच्या ‘ऑडिटोरियम’मध्ये कधीही कार्यक्रम घेऊ शकतो, असेही सांगितले.
२. उद्योजक श्री. अतुल कोटकर यांनी त्यांच्याकडे प्रशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी सांगितले.
३. एका जिज्ञासूने चप्पल व्यवस्था पाहून त्यांच्या कार्यक्रमातसुद्धा अशा प्रकारे व्यवस्था करण्यासाठी साधकांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन द्यावे, असे सांगितले.
४. पक्षाघात झाल्यामुळे एका काकूंना चालायला आणि पुष्कळ वेळ बसण्यासाठीही त्रास होतो. तरीसुद्धा काकू त्यांच्या यजमानांसह पूर्ण वेळ गुरुपौर्णिमा सोहळ्याला उपस्थित होत्या. साधकांकडून पुष्कळ जिव्हाळा आणि प्रेम मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी साधना करण्याचा निश्चय करावा ! – सद्गगुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
(दिघी येथील गुरुपौर्णिमा)
जन्महिंदुपेक्षा कर्महिंदु असणे अधिक महत्त्वाचे आहे. हिंदु धर्मामध्ये ३६५ दिवसांपैकी साधारण १५० दिवस काहीतरी सण-उत्सव-व्रत-वैकल्ये असतात. हे धर्मशास्त्राप्रमाणे साजरे केले, तर कुटुंबियांवर धर्मसंस्कार होतील. कुटुंबातील मुलांचे मन धर्मपरायण होईल. धर्म आचारशील असतो. धर्माचरण केले, साधना केली, तरच खर्या अर्थाने धर्माचे आणि आपलेही रक्षण होते. साधनेमुळेच अंतरातील दिव्य ऊर्जा जागृत होते, मनोबल वाढते. आत्मशक्ती जागृत होते. या दिव्यशक्तीच्या आधारे हिंदु धर्माचे, या देवभूमी भारताचे रक्षण सहजसुलभ होणार आहे. त्यामुळे देवभूमी भारताचे रक्षण आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी साधना करण्याचा निश्चय करावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गगुरु स्वाती खाडये यांनी केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त दिघी येथील राघव मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी १ सहस्रांहून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्तच्या संदेशाचे वाचन ६७ टक्के अध्यात्मिक पातळी असलेल्या श्रीमती मीनाक्षी पांडे यांनी केले.
सत्कार
भाजपच्या माजी नगरसेविका सौ. निर्मलाताई गायकवाड यांचा सत्कार सनातन संस्थेच्या सौ. लता वाघ यांनी केला.सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) संगीता पाटील आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा सन्मान सौ. मीनल पावसकर यांनी केला.
विशेष सहकार्य
श्री. उदय गायकवाड यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी त्यांचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. ‘सुमंगल एंटरप्राइजेस’चे श्री. कमलेश बोर्हाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. दिघी येथील ९६ वर्षीय आजोबा श्री. गोपाळ गोविंद नेर्लेकर हे कार्यक्रमाला उपस्थित होते. हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक असून त्यांनी ३५ वर्षे दिघी येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रवचनाची सेवा केली आहे. आजोबा देवघर कक्षावर आले असता सर्व प्रदर्शन पाहून ‘तुमचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘मी वयोमानानुसार अधिक वेळ बसू शकत नाही; परंतु सनातन संस्थेचा कार्यक्रम आहे म्हणून मी आलो आहे’, असे त्यांनी सांगितले. त्यांनी सद्गगुरु स्वाती खाड्ये आणि पू.(सौ.) मनीषा पाठक यांची भेट घेतली. संस्थेविषयी गौरवोद्गार काढले.
२. या ठिकाणी सभागृह पूर्ण भरलेले असतांनाही जिज्ञासू उभे राहून संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झाले.
३. कार्यक्रमानंतर अनेकांनी हिंदु राष्ट्राविषयी शंकांचे निरसन व्यक्त्यांकडून करून घेतले.
४. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
(जुन्नर येथील गुरुपौर्णिमा)
जुन्नर येथे तिळवण तेली समाज कार्यालय, श्री. तुळजाभवानी सभागृह संताजीनगर, जुन्नर येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात अधिवक्त्या सौ. मृणाल व्यवहारे-साखरे यांनी ‘हिंदु स्त्रियांवर होणारे अत्याचार’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक यांनी ‘हिंदूंची सद्यस्थिती आणि साधनेची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी २७५ हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्तच्या संदेशाचे वाचन ६६ टक्के अध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. कविता तापकीर यांनी केले.
सत्कार
अधिवक्त्या सौ. मृणाल व्यवहारे साखरे यांचा सत्कार सौ. सुजाता शिंदे आणि श्री. प्रवीण नाईक यांचा सत्कार श्री. सोमनाथ डुंबरे यांनी केला.
विशेष सहकार्य
१. तिळवण तेली समाज, जुन्नर यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी सभागृह उपलब्ध करून दिले.
ज्या भूमीत स्त्रीच्या रक्षणासाठी महायुद्धे झाली, त्याच भूमीत लाखो स्त्रियांची विटंबना होणे हे लज्जास्पद ! – श्री चैतन्य तागडे, सनातन संस्था
(तळेगाव दाभाडे येथील गुरुपौर्णिमा)
ज्या भूमीत स्त्रीच्या रक्षणासाठी महायुद्धे झाली, त्याच भूमीत आज लाखो स्त्रियांची विटंबना होणे, हे लज्जास्पद आहे. आघातांना तोंड देण्यासाठी हिंदूंनी आपले पद आणि प्रतिष्ठा बाजूला ठेऊन एक हिंदू म्हणून एकत्र येणे, काळानुसार साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे अत्यंत आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. ते अपूर्वा गार्डन मंगल कार्यालय, तळेगाव दाभाडे या ठिकाणी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा सोहळ्यास संबोधित करत होते. या वेळी ५०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी त्यांनी ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्र स्थापनेचा संकल्प करा’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. तसेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त संदेशाचे वाचन सनातन संस्थेच्या साधिका सौ. धनश्री कर्वे यांनी केले.
संत आणि मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला पाचाणे येथील युवा कीर्तनकार ह.भ.प. सौ. जयश्रीताई येवले आणि गोळेवाडी येथील ह.भ.प. रोहिदास महाराज जगदाळे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. अंबी गावाच्या सरपंच सौ. संगीता घोजगे, भाजपचे मावळ तालुका प्रभारी श्री. भास्करराव म्हाळसकर, उर्से गावाच्या सरपंच कु. भारती गावडे, आढे गावाच्या सरपंच सौ. सुनीता सुतार, तसेच गोळेवाडी गावच्या सरपंच सौ. अलका जाधव यांचीही उपस्थिती लाभली.
सत्कार
सनातन संस्थेच्या वतीने कीर्तनकार ह.भ.प. सौ. जयश्रीताई येवले यांचा सन्मान सौ. रूपाली लोहोट आणि गोळेवाडी येथील ह.भ.प. रोहिदास महाराज जगदाळे यांचा सन्मान श्री. महेश सरवटे यांच्या हस्ते करण्यात आला.
क्षणचित्रे
१. एक ९० वर्षांचे श्री. केळकरआजोबा कार्यक्रमासाठी बरोबर ५ वाजता उपस्थित होते. प्रसारकाळात त्यांची साधकांना भेट झाली असता ते बरेच आजारी होते; परंतु कार्यक्रमाला येणार, असे तेव्हा सांगितले होते. त्यानुसार ते स्वतः एकटे रिक्शा करून वेळेत कार्यक्रमस्थळी आले.
२. तळेगाव, आढे, पिंपळखुटे, अंबी, कातवी, उर्से, वारंगवाडी, गोळेवाडी आणि वराळे या गावांतून जिज्ञासू कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
१. भाजपचे मावळ तालुका प्रभारी श्री. भास्करराव म्हाळसकर यांना प्रदर्शन पाहून खूप आंनद झाला. ‘तुम्ही खरी धर्मजागृती करत आहात. प्रभावी कार्य करण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. तुम्हाला दंडवत’, असा उत्स्फूर्त अभिप्राय दिला.
२. कार्यक्रमानंतर युवा कीर्तनकार ह.भ.प. सौ. जयश्रीताई येवले यांनी सांगितले की, तुम्ही ज्या पद्धतीने विषय सांगितला, त्यामुळे तो लगेच समजला. अन्यथा वाचून काही लक्षात येते असे नाही. आज या कार्यक्रमाला आल्याने माझ्या डोक्यात प्रकाश पडला आहे, असे मला वाटत आहे.
सहकार्य
कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सभागृहाच्या मालक श्रीमती स्मिता शेळके यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
हिंदु स्त्रियांच्या शील रक्षणासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय ! – श्री. नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती
( सातारा रस्ता येथील गुरुपौर्णिमा)
राजमाता जिजाबाई यांच्या नात्यातील स्त्रीस खानाने उचलून नेले, त्याचा प्रतिशोध म्हणून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची निकड जिजाबाईंना जाणवली आणि त्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले. धर्मरक्षणासाठी या सर्वांनी केलेल्या प्रयत्नांनी आज हिंदु धर्म टिकून आहे. दुर्दैवाने आज हिंदु स्त्रिया पराकोटीच्या असुरक्षित झाल्या आहेत. लव्ह जिहादची आक्रमणे हिंदु स्त्रियांवर दिवसागणिक वाढत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक हिंदूने किमान आपल्या कुटुंबाचे तरी जिहादी आक्रमणापासून रक्षण व्हावे, यासाठी हिंदु राष्ट्र स्थापण्याचा संकल्प केला पाहिजे, तसेच त्यासाठी कार्यरतही होणे आवश्यक झाले आहे.
हिंदु धर्म, हिंदु स्त्रिया यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी केले. विणकर सभागृह, सातारा रस्ता या ठिकाणी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा सोहळ्यास ते संबोधित करत होते. ३५० हून अधिक धर्मप्रेमी आणि जिज्ञासू या वेळी उपस्थित होते. या संपूर्ण भावसोहळ्यास सदगुरु स्वाती खाड्ये, सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक, पू. श्रीमती उषा कुलकर्णी, पू. गजानन साठे यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
त्यानंतर सनातन संस्थेच्या समष्टी संत सद्गगुरु स्वाती खाड्ये यांनी उपस्थित साधकांना ‘गुरुपौर्णिमेच्या दिनी कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधना कशी करावी ?’ याविषयी मार्गदर्शन केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. चारुशीला वाळनूसकर आणि श्री. नीलेश शेटे यांनी केले. ६८ टक्के आध्यत्मिक पातळीचे साधक श्री. महेश पाठक यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन केले. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाची चलचित्रफीतही दाखवण्यात आली.
सत्कार
सनातनची युवा साधिका कु. अंजली मुजुमले हिने साधना आणि सेवा करत १२ वी इयत्तेत सुयश प्राप्त केले. त्यानिमित्त सद्गगुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
सहकार्य
१. ‘काळे मंडप’चे श्री. विकास काळे, ‘भापकर मंडप’चे मालक श्री. सचिन भापकर यांनी कार्यक्रमासाठी मंडप साहित्य उपलब्ध करून दिले.
२. ‘अभिजित साउंड सर्व्हिस’ यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणेसाठी साहाय्य केले.
३. विणकर सभागृहाचे मालक श्री. जयवंतराव ढगे यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या अध्यात्म, साधना, राष्ट्र, धर्म, आपत्कालीन साहाय्य अशा विषयावरील ग्रंथांचे, तसेच नित्योपयोगी सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
२. कार्यक्रम झाल्यानंतर सभागृहातून बाहेर पडतांना अनेक जिज्ञासू ‘पुष्कळ सुंदर कार्यक्रम झाला’, असे उपस्थित साधकांना आवर्जून भेटून सांगत होते.
३. प्रदर्शन कक्षातून जातांना एक महिला जिज्ञासूने त्यांच्या सोबत असणार्या मुलीला ‘ ‘हे सर्व (संस्थेचे साधक) स्वयंस्फूर्तीने हे सर्व कार्य करतात’, असे सांगितले.
गुरुकुल शिक्षण पद्धती आणायची असल्यास हिंदूंसमोर एकच पर्याय हिंदु राष्ट्र ! – डॉ. नीलेश लोणकर, स्वा. सावरकर युवा मंच
( हडपसर येथील गुरुपौर्णिमा)
मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीत राष्ट्र आणि धर्म यांवर प्रेम करणारी पिढी निर्माण होऊ शकत नाही, तर त्याविरोधी घोषणा देणारी पिढी निर्माण झाली, हे जे.एन.यू.मध्ये आपण पाहिले आहे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांवर प्रेम करणारी पिढी निर्माण करायची असल्यास गुरुकुल परंपराच आणावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला भारतात हिंदु राष्ट्र आणावे लागेल. या शिक्षण पद्धतीतच खोट असल्याने मुलांना भ्रमणभाषचे व्यसन लागत आहेत. परिणामी मुले ‘गेम जिहाद’ला बळी पडत आहेत. त्यामुळे शिक्षणपद्धतीत आमूलाग्र पालट होऊन गुरुकुल शिक्षण परंपरा यायला, हवी असे प्रतिपादन स्वा. सावरकर युवा मंचचे डॉ. नीलेश लोणकर यांनी केले. ते इंद्रायणी मंगल कार्यालय, हडपसर येथील गुरुपौर्णिमा कार्यक्रमात बोलत होते. या वेळी ३५० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.
हिंदु समाजासमोर निर्माण झालेल्या आव्हानांवर सावरकरांचे विचार उपयुक्त ! – श्री. सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चुलत नातू
( सिंहगड रस्ता येथील गुरुपौर्णिमा)
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना मिळालेली प्रत्येक संधी देशसेवेसाठी कशी वापरता येईल ? याचाच विचार केला. त्यांची प्रत्येक रणनीती यशस्वी ठरलेली आहे. आज हिंदु समाजासमोर जी आव्हाने निर्माण झाली आहेत, त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार उपयुक्त आहेत. मनुष्याचे धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतरच असते. कारण त्याची राष्ट्राविषयी निष्ठा रहात नाही. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बंदीवानांचे शुद्धीकरण करून घेतले, असे परखड प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चुलत नातू श्री. सात्यकी सावरकर यांनी केले. सिंहगड रस्ता येथील सिद्धार्थ हॉल येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.
या वेळी श्री. पराग गोखले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ५५० हून अधिक साधक, जिज्ञासू, हितचिंतक, जाहिरातदार यांनी कार्यक्रमाचा आणि गुरुपूजनाचा लाभ घेतला.
श्री. सात्यकी सावरकर पुढे म्हणाले की, आजचा हिंदु समाज हा जातीजातींत विभागला आहे. त्या सर्वांना एकत्रित करून हिंदु राष्ट्र निर्माण होईल, असा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार होता. यामध्ये जातीभेद न पाळता मानवता हा मुख्य उद्देश होता. ज्या वेळी राष्ट्रावर इस्लामी संकट घोंगावत होते, तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंना संघटित करण्याची आवश्यकता ओळखली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व बंधुत्वाचे आणि एकतेचे होते. आताच्या या पालटत्या काळात आपल्याला हिंदु समाजाचे सबलीकरण करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गुरुदक्षिणा द्यायची आहे. यासाठी एकमेकांना धरून, एकोप्याने राहून, होणारे सर्व आघात रोखून सर्वांनी एकत्र यायला हवे. समाज सजग, सक्षम आणि बलशाली झाल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही, असे विचार सात्यकी सावरकर यांनी व्यक्त केले.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाला धायरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. बापूसाहेब पोकळे आणि भाजपचे श्री. सारंग नवले उपस्थित होते.
( भोर येथील गुरुपौर्णिमा)
भोर येथील अभिजीत भवन मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात सनातन संस्थेच्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. ज्योती दाते यांनी ‘धर्माधिष्टित हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ह.भ.प. राजेंद्र महाराज शास्त्री यांनी गुरूंचे जीवनातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी २५० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्तच्या संदेशाचे वाचन श्री. श्रीकांत बोराटे यांनी केले.
सत्कार
सनातन संस्थेच्या सौ. ज्योती दाते यांचा सन्मान ‘सनातन प्रभात’च्या कृतीशील वाचक सौ. शुभांगी मांढरे यांनी तसेच
ह.भ.प. राजेंद्र महाराज शास्त्री यांचा सन्मान सनातन संस्थेचे प्रा. श्री विठ्ठल जाधव यांनी केला.
विशेष सहकार्य
अभिजीत भवन मंगल कार्यालयाचे श्री. रामदास सुरवसे यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी सभागृह उपलब्ध करून दिले. ‘स्पीकर’, ‘साऊंड सिस्टीम’ श्री. कुणाल सागळे आणि श्री. बाजीराव शिंदे यांनी उपलब्ध करून दिले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. पाऊस असतांनाही ग्रामीण भागातील धर्माभिमानी आणि जिज्ञासू कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
२. स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांना जिज्ञासूंनी उत्स्फूर्तपणे दाद दिली आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्याची मागणी केली.