महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्या शाळांमध्ये महाराष्ट्र शासन त्यांच्या कार्याचे संग्रहालय उभारणार !
मुंबई – राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्या महापुरुषांच्या गावांतील शाळांचा महाराष्ट्र शासनाकडून विकास करण्यात येणार आहे. यांतील काही शाळांमध्ये या महापुरुषांनी शिक्षण घेतले आहे. राज्यातील अशा १३ ऐतिहासिक गावांतील शाळांची शासनाने निवड केली आहे. या शाळांमध्ये संबंधित राष्ट्रपुरुषांच्या कार्याची माहिती सांगणारी संग्रहालये उभारण्यात येणार आहेत. यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी शासनाने घोषित केला आहे.
अहिल्याबाई होळकर नगरमधील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळा, अमरावतीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा शाळा, तर शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉ. पंजाबराव देशमुख शाळा, कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराज शाळा, नाशिक येथे कवी कुसुमाग्रज शाळा, सातारा येथे क्रांतीसिंह नाना पाटील शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, सावित्रीबाई फुले शाळा, पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले शाळा, रत्नागिरी येथे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि सानेगुरुजी शाळा, सांगली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतीसिंह नाना पाटील शाळा या महापुरुषांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी असणार्या शाळांचा विकास करण्यात येणार आहे. या शाळांची नवीन इमारत, प्रयोगशाळा, उद्यान, पायाभूत सुविधा आदी सुविधा या शाळांच्या ठिकाणी देण्यात येणार आहेत.