परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आणि अनन्य भोळा अन् उत्कट भाव असलेल्या पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्या १२२ व्या (व्यष्टी) संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे !
पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे (वय ७४ वर्षे) यांचा साधनाप्रवास ….
६. ७. २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पू. (सौ.) शालिनी मराठे यांनी आरंभीच्या काळात केलेल्या सेवा पाहिल्या. आजच्या भागात ‘त्यांना कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर त्या त्याला कसे धैर्याने सामोर्या गेल्या ?’, ते पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/699307.html
१६. प.पू. डॉ. आठवले यांच्या कृपेने अनेक आश्रमांत आणि अनेक धर्मस्थानांच्या ठिकाणी जाऊन देवदर्शन करता येणे
‘वर्ष १९७४ (साधनेत येण्याच्या आधीपासून) ते वर्ष २०२२ पर्यंत मला पुणे येथील सेवाकेंद्र, पनवेल येथील देवद आश्रम, प.पू. भक्तराज महाराज यांचा इंदूर आणि कांदळी येथील आश्रम इत्यादी ठिकाणी जाता आले. मला ‘मथुरा, गोकुळ, जोगेश्वरी, अष्टविनायक, नाशिक, त्र्यंबकेश्वर, गाणगापूर, अक्कलकोट, गुहागर, गोकर्ण, उडुपी, श्री शैल्यम, तिरुपती, धर्मस्थळ, हळेबीड, मदुराई, योगी अरविंद आश्रम, शिवकांची, विष्णुकांची, केरळ येथील पद्मनाभ मंदिर, रामेश्वर, विवेकानंद स्मारक इत्यादी ठिकाणी जाऊन देवदर्शन घेता आले’, हे मी माझे भाग्य समजते. त्याचप्रमाणे मला देहली, राजस्थान, मध्यप्रदेश, बंगळुरू, चेन्नई इत्यादी ठिकाणीही जाता आले.
१७. यजमानांनी अधिकोशातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ साधना करण्यासाठी सनातनच्या आश्रमात जाणे
‘२०.२.२००० या दिवशी यजमानांनी (श्री. प्रकाश मराठे , (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी) अधिकोषाच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी गेले. ते गोवा येथील दोनापावला, मडगाव, नेसाई, सुखसागर अन् रामनाथी आश्रम इत्यादी ठिकाणी सेवा करत असत. यजमान आठवड्यातून एकदा घरी यायचे आणि लगेच दुसर्या दिवशी सेवेसाठी परत आश्रमात जायचे. त्या वेळी घरी मी आणि सासूबाई दोघीच रहात होतो. घरी येणारे साधक आणि पाहुणे यांचे स्वयंपाकपाणी अन् सासूबाईंचे सर्व करत नोकरी करतांना प.पू. गुरुदेवांनी माझ्याकडून जमेल तशी सेवाही करून घेतली.
१८. स्वेच्छानिवृत्ती आणि सासूबाईंचे देहावसान
वर्ष २००१ मध्ये साधारण वयाच्या ५२ व्या वर्षी मी ‘पॉप्युलर हायस्कूल’ येथील शिक्षिकेच्या नोकरीचे त्यागपत्र देऊन स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर फेब्रुवारी २००२ मध्ये पलंगावरून पडल्यामुळे सासूबाईंच्या (पू. (कै.) सीताबाई मराठे यांच्या) खुब्याचे हाड मोडले. त्यामुळे त्यांचे शस्त्रकर्म झाले. २६.१.२००८ या दिवशी त्यांनी वयाच्या ८९ वर्षी देह ठेवला. तोपर्यंत ६ वर्षे मला त्यांचे सर्व जागेवरच करावे लागत होते. आरंभी मला त्यांची सेवा मनापासून करता येत नव्हती; पण पुढे प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आमच्या दोघींची मने जुळली. त्यामुळे त्यांची सेवा चांगली होऊन जातांना त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले.
१९. सनातनच्या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी जाणे आणि संगणक शिकून सेवा करणे
१.३.२००८ या दिवशी मी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आले. त्याच वर्षापासून (वर्ष २००८ पासून) मला मधुमेह आणि रक्तदाब असे शारीरिक त्रास चालू झाले. रामनाथी आश्रमात आल्यानंतर मला ग्रंथांशी संबंधित सेवा करण्याची संधी मिळाली. मला संगणक येत नव्हता; पण अन्य साधकांनी साहाय्य केल्यामुळे मला आवश्यकतेपुरते मराठी टंकलेखन करता येऊ लागले.
२०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना होऊन जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होणे
वर्ष २०१६ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझी ६१ टक्के आध्यात्मि पातळी घोषित झाली आणि प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मला वेगवेगळ्या विषयांवर लेख अन् कविता सुचत गेल्या. त्यांच्याच कृपेने सुचलेले लेख आणि कविता ‘आवडली’, असे सांगून प.पू. डॉक्टर मला खाऊ (प्रसाद) पाठवून आनंद देत असत.
२१. कर्करोग होऊन रुग्णाईत होणे
२१ अ. रक्तस्राव होऊ लागल्यामुळे गर्भाशयाचे शस्त्रकर्म होणे : १६.२.२०२२ या दिवशी मला रक्तस्राव होऊ लागला. त्या वेळी मला अन्न-पाणी जात नव्हते; म्हणून सनातनचे साधक आधुनिक वैद्य मराठे यांच्या सांगण्यानुसार माझ्या क्ष-किरण (‘एक्स-रे’) आणि इतरही काही चाचण्या केल्या. त्यांनी मला मणिपाल रुग्णालयामध्ये भरती केले. ५.३.२०२२ या दिवशी माझ्या गर्भाशयाचे शस्त्रकर्म झाले.
२१ आ. आधुनिक वैद्यांनी गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचे निदान करणे : १४.३.२०२२ या दिवशी आधुनिक वैद्यांनी मला भेटायला बोलावले होते. त्यांनी माझे टाके काढले आणि मला ‘रेडिएशन’ (कर्करोगावरील किरणोत्सर्ग उपचारपद्धती) करण्याच्या विभागात जायला सांगितले. त्यानुसार मी आणि माझ्या समवेत आलेली साधिका कु. तृप्ती कुलकर्णी त्या विभागात जाऊन तेथील आधुनिक वैद्यांना भेटलो. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्हाला कर्करोग झाला असून तो दुसर्या स्तरावर (स्टेजला) गेला आहे.’’ हे ऐकून मी घाबरले आणि लगेच परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच मला बळ द्या. तुम्हीच मला सांभाळू शकता. आजपर्यंत तुम्हीच मला सांभाळले आहे. आताही तुम्हीच मला सांभाळणार आहात. हे प्रारब्ध संपवण्यासाठी तुम्हीच मला बळ द्या.’ त्या दिवशी आमच्या समवेत यजमान श्री. प्रकाश मराठेही रुग्णालयात आले होते. त्यांना हे कळल्यावर वाईट वाटले; पण त्यांनी मला धीर दिला.
२१ इ. कर्करोगावरील उपचार : आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘रेडिएशन’द्वारे उपचार करावे लागतील.’’ त्याप्रमाणे माझ्यावर २५ वेळा उपचार झाले; पण काहीच सुधारणा होत नव्हती. तेव्हा ते म्हणाले, ‘‘बेळगाव येथे जाऊन दोन वेळा उपचार घ्यावे लागतील.’’ त्याप्रमाणे मी दोन वेळा बेळगाव येथे जाऊन उपचार घेऊन आले; पण काही उपयोग झाला नाही. मला औषधे घेण्याचा तिटकारा आहे; पण या आजारपणात आधुनिक वैद्य सांगतील, त्याप्रमाणे मी सर्व उपचार करून घेतले आणि औषधेही घेतली.
२१ ई. ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच तारणहार आहेत’, याची जाणीव होऊन सर्व भार त्यांच्यावर टाकणे : कर्करोग झाल्यानंतरही आरंभी मला वाटायचे, ‘मी यातून बरी होईन’; पण दिवसेंदिवस माझा त्रास वाढतच गेला आणि लक्षात आले, ‘आता केवळ परात्पर गुरु डॉक्टरच मला साहाय्य करू शकतात.’ त्यामुळे मी त्यांच्यावर सर्व भार टाकला.
२२. यजमान श्री. मराठे यांनी औषधोपचारात काहीच न्यून पडू न देणे
१८.२.२०२२ पासून १६.७.२०२२ पर्यंत मी नागेशी येथे रहायला होते. रामनाथी येथे होणारे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ झाल्यानंतर जून मासात ते केवळ रात्री झोपायला यायचे आणि सकाळी रामनाथी आश्रमात सेवेसाठी परत जायचे. त्यांना माझे श्रम-कष्ट पहावत नसत; पण ते शांत रहात असत. मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही तुमची काळजी घ्या. माझी काळजी करू नका. तुम्हाला यायला जमत नसेल, तर केवळ भ्रमणभाष करा.’’ त्यांना माझ्या आजारपणात बरेच पैसे व्यय करावे लागले; पण त्यांनी माझ्या औषधोपचारात काहीही न्यून पडू दिले नाही.
२३. कर्करोगाचे दुखणे वाढत गेले, तशी विरक्तीही वाढणे
माझे दुखणे बळावत गेले, तशी माझी विरक्ती वाढत गेली. अनेक साधक मला भेटायला येत. त्यांना बरे वाटावे; म्हणून मी त्यांच्या समवेत छायाचित्रे काढून घेत असे आणि त्यांची समजूतही काढत असे. मी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय तळमळीने पूर्ण करत असे. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करत असे. काही वेळा मला एवढा त्रास होई की, ते सहन न होऊन मला रडूही येत असे. ‘इतरांना त्रास व्हायला नको’, यासाठी मी एकटी असतांना मधेमधे रडतही असे. माझी प.पू. डॉक्टरांवर दृढ श्रद्धा आहे. केवळ त्या बळावरच मी तग धरू शकले. १३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा झाली आणि माझी आध्यात्मिक पातळी १ टक्क्याने वाढून ती ६७ टक्के झाली असल्याचे घोषित झाले. गुरुदेवांनी माझ्या या स्थितीतही मला असा आनंद दिला.
२४. प्रार्थना
२२.५.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या रथोत्सवाच्या वेळी मला त्यांचे दिव्य दर्शन झाले. मला पुष्कळ आनंद झाला. माझे जीवन आनंदाने उजळून निघाले. माझ्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कळकळीची प्रार्थना झाली, ‘यापुढेही माझी जीवननौका पार करून मला तुमच्या चरणी समर्पित करून घ्या.’
२५. कृतज्ञता
माझ्या या आजारपणात मला सर्व संत, सर्व साधक, तसेच आधुनिक वैद्य यांनी पुष्कळ साहाय्य केले. विशेष करून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, तसेच पू. परांजपेकाका आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेकाकू, प.पू. दास महाराज अन् पू. (सौ.) माई यांनी मला वेळोवेळी धीर देऊन साहाय्य केले. त्या सर्वांना माझा साष्टांग नमस्कार ! मला कु. कविता राठिवडेकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सौ. मनीषा पानसरे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), डॉ. पांडुरंग मराठे, कु. सुगुणा गुज्जेटी, सौ. सारिका अय्या यांच्यासह अन्य साधकांनी पुष्कळ साहाय्य केले आणि भरभरून प्रेमही दिले. त्यासाठी त्या सर्वांप्रती कृतज्ञता !
लहानपणापासून आई-वडील, भाऊ, लग्नानंतर सासू-सासरे, यजमान श्री. मराठे आणि पुढे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे माझ्यासारख्या एका सामान्य जिवाचे जीवन कृतार्थ झाले. यासाठी मी प.पू. भक्तराज महाराज, प.पू. डॉक्टर, सद़्गुरु, संत, साधक आणि आतापर्यंत माझ्या जीवनात आलेला प्रत्येक सहयोगी जीव यांच्या चरणी कृतज्ञ आहे. मला हे सर्व दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत कृतज्ञता !’
(क्रमशः)
– सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०२२)
(हे लिखाण पू. (सौ.) शालिनी मराठे संत होण्यापूर्वीचे आहे.)