शरद पवार यांच्‍यापासून महाराष्‍ट्रातील राजकारणाच्‍या र्‍हासाला प्रारंभ !

‘सैतान’ असा उल्लेख करत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्‍यावर टीका !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आणि सदाभाऊ खोत

मुंबई – ८० च्‍या दशकात महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात शरद पवार यांचा उदय झाला. तेव्‍हापासून महाराष्‍ट्रातील राजकारणाच्‍या र्‍हासाला प्रारंभ झाला. भविष्‍यात हा ‘सैतान’ गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, अशी टीका ‘रयत क्रांती संघटने’चे अध्‍यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्‍यावर केली. खोत हे प्रसिद्धीमाध्‍यमांसमोर बोलत होते.

शरद पवार यांच्‍यावर टीका करतांना सदाभाऊ खोत म्‍हणाले, ‘‘महाराष्‍ट्राच्‍या जडणघडणीत यशवंतराव चव्‍हाण, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील यांचे मोठे योगदान आहे. शरद पवार यांच्‍या कालखंडात मात्र ‘प्रस्‍थापित विरुद्ध विस्‍थापित’ असा संघर्ष उभा राहिला. मागील ५० वर्षांत हे चालू आहे. शरद पवार यांनी सरदारांना समवेत ठेवून राज्‍य केले. त्‍या सरदारांनी शेतकर्‍यांची घरे लुटली. गावगाडा उद़्‍ध्‍वस्‍त केला. ते सरदार आज सैरभैर पळत आहेत. शरद पवार यांच्‍यावर नियतीने मोठा सूड उगवला आहे. त्‍यांना गावगाड्याकडे धावत यावे लागत आहे. पुणे येथे पूर्वी ‘काका मला वाचवा’, ही हाक महाराष्‍ट्राला ऐकू आली होती; पण आता ‘पुतण्‍यापासून मला वाचवा’, अशी नवीन हाक महाराष्‍ट्राला ऐकू येत आहे. ‘जैसी करणी वैसी भरणी’ ! पूर्वी बापाने केलेले पाप मुलाला फेडावे लागत होते; पण कलियुगात जो पाप करतो, त्‍याला फेडावे लागते. शरद पवार यांना हे पाप फेडावे लागेल. महाराष्‍ट्रातील राजकारण हे प्रस्‍थापितांकडून विस्‍थापितांकडे जात आहे.’’