बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट केव्हा ?
बंगालमध्ये २ दिवसांपूर्वी प्रचंड हिंसाचारात पंचायतीची निवडणूक पार पडली. बंगालच्या २२ जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीच्या ६३ सहस्र २२९, पंचायत समितीच्या ९ सहस्र ७३० आणि जिल्हा परिषदेच्या ७३० जागांसाठी हे मतदान झाले. या माध्यमातून ५ कोटी ७ लाख नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावणे अपेक्षित होते. या मतदानासाठी अभूतपूर्व १ लाख ३५ सहस्र सैनिक-पोलीस तैनात करण्यात आले होते; मात्र तरी अपेक्षेप्रमाणे हिंसाचाराच्या घटना घडल्याच. तेथे झालेल्या हिंसाचारात अद्यापपर्यंत १५ लोक ठार झाले आहेत. या हिंसाचाराचे आणि तृणमूल काँग्रेसच्या दादागिरीची भीषणता स्पष्ट करणारे अनेक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत.
निवडणुकीतील हिंसाचार
एका व्हिडिओमध्ये तृणमूल काँग्रेसचा गुंड कार्यकर्ता एका मतदान केंद्रावर मतपेटीजवळ बसून ‘लोकांनी मत कुठे द्यायचे ?’ हे दादागिरी करत सांगत होता आणि लोकांना तसे करण्यास भाग पाडत होता. तृणमूलच्या काही गुंडांनी एका मतदान केंद्रावरील लोकांच्या मतपत्रिका (बॅलट पेपर) घेऊन त्यावर स्वत:चे मत नोंदवून मतपेटीत टाकले. कूचबिहार येथील सीताई मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली, तर तेथील फोलिमारी येथील मतदान केंद्रावरील भाजपच्या ‘मतदान प्रतिनिधी’ (पोलिंग एजंट) विश्वास यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एके ठिकाणी गावठी बाँब फेकून एका उमेदवाराच्या सहकार्याची हत्या करण्यात आली. कूचबिहारमध्येच दिनहाटा येथील मतदान केंद्रातील मतपेटीत पाणी ओतण्यात आले. दक्षिण दिनाजपूर येथे मतपेट्या पळवून लुटण्यात आल्या. मतपेट्या पळवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी झालेले दिसून आले. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भाजप, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक मतदान केंद्रांबाहेर हाणामारी झाली. ही निवडणूक आहे कि हिंसाचार आणि हत्यांचा काळ आहे ? हेच लक्षात येत नाही, अशी भयावह स्थिती होती.
मूकदर्शक पोलीस
‘मतदानपेट्या सहजपणे पळवून नेल्या जात असतांना एवढ्या मोठ्या संख्येत असलेले पोलीस, केंद्रीय पोलीस दलाचे सैनिक ते थांबवू का शकले नाहीत ?’, असा प्रश्न भारतियांच्या मनात निर्माण होतो. याविषयी भाजपचे बंगाल येथील पदाधिकारी सुवेंदु अधिकारी यांनी ‘बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि बंगाल पोलीस यांची मिलीभगत असल्याने पोलीस कुठलीच कारवाई करत नाहीत, तसेच केंद्रीय पोलीस दलाच्या सैनिकांना वेगळ्याच ठिकाणी बंदोबस्तासाठी पाठवले जाते’, असा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांमध्ये तथ्य वाटते; कारण सहस्रो पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलाचे सैनिक असतांना त्यांचे अस्तित्व जाणवत नाही. बंगाल येथील या स्थितीला केवळ ‘अराजक’ हेच नाव देता येईल. एवढी भीषण परिस्थिती निवडणुकीच्या वेळी आली आहे, तर एरव्ही तेथे काय परिस्थिती असेल ? याची कल्पना करता येईल. बंगाल येथे ही परिस्थिती एका दिवसात आलेली नाही.
बंगाल आणि हिंसाचार
बंगाल येथे ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री झाल्यापासून हिंसाचाराने पाय रोवले आहेत. बंगाल येथे वर्ष २०२१ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीही पुष्कळ हिंसाचार झाला होता. त्या वेळी निवडणुकीच्या पूर्वी आणि नंतर हिंसाचार झाला होता. भाजप सत्तेत येऊ नये; म्हणून हिंसाचाराचा आधार घेण्यात आला आणि तृणमूल सत्तेत आल्यावर भाजपच्या ग्रामीण भागांतील कार्यकर्त्यांना एकटे अन् कुटुंबियांसमवेत गाठून त्यांच्या हत्या करण्यात आल्या. ग्रामीण भागांतील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या बातम्याही तेव्हा निवडक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. भाजपचे एकूण ३०३ कार्यकर्ते जे हत्येच्या भीतीने त्यांची घरे, संपत्ती सोडून पळून गेले होते. ते अद्यापही घरी परतू शकलेले नाहीत. एवढी भीषण परिस्थिती ज्या राज्यात आहे, तिथे निवडणूक सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात कशी पार पडू शकेल ? बंगालमध्ये एरव्हीही भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणजेच हिंदूंच्या हत्या होत असतात. ‘अमुक एक कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत’, ‘कुणाचा मृतदेह शेतात’, ‘कुणाचा रस्त्यावर सापडला’, अशा मथळ्यांच्या बातम्या येत असतात. एकेकाळी क्रांतीकारक, विचारवंत आणि प्रज्ञावंत यांचा बंगाल आज नागरिकांच्या हत्या, हिंदु महिलांवर अत्याचार यांमुळे जळत आहे, तरी त्याची नोंद घेऊन साधा निषेधही नोंदवला जात नाही. तेथील स्थानिक हिंदूंना भय आहे कि त्यांना अजूनही ममता ‘मसिहा’ वाटतात ? त्यामुळे ते अत्याचारांविरुद्ध संघटित होत नाहीत, हे लक्षात येत नाही. ममता यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा, तर पक्षाच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप आहे. जगात सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशातील एका राज्यात एवढा दीर्घकाळ हिंसाचाराचे सत्र चालू कसे राहू शकते ? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. आतापर्यंत बंगालमध्येच ‘वन्दे भारत एक्सप्रेस’वर सर्वाधिक दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. ज्या बंगालमधील बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत लिहून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली, तेथेच ‘वन्दे भारत एक्सप्रेस’वर दगडफेक होणे, ही बंगालची बांगलादेशच्या दिशेने वाटचाल चालू झाल्याचे निदर्शक आहे. ममता यांचे सरकार आणखी काही वर्षे सत्तेत राहिले, तर ही परिस्थिती येण्यास वेळ लागणार नाही. शल्य एवढेच की, बंगालमध्ये एवढे अराजक चालू असतांना तेथे राष्ट्रपती राजवट अजून का लावण्यात येत नाही ? अजून कोणती परिस्थिती निर्माण झाल्यावर तेथे कारवाई करण्यात येणार आहे ? असे प्रश्न सर्व भारतियांना पडत आहेत.
बंगालमधील निवडणुकीतील आणि नियमित हिंसाचाराची नोंद घेऊन केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट कधी लावणार ? |