अंधेरी (मुंबई) येथे श्रीराम मंदिराजवळील भूमी कब्रस्थानासाठी देण्याची शिवसेनेच्या नेत्यांची मागणी !
सकल हिंदु समाजाकडून विरोध !
मुंबई – अंधेरी (पूर्व) मधील मरोळ येथे असलेल्या ‘प्रजापूर व्हिलेज’जवळील श्रीराम मंदिराच्या बाजूची जागा कब्रस्थानासाठी देण्याची मागणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) उपनेते आणि माजी नगरसेवक कमलेश राय यांनी केली आहे. ही मागणी कमलेश राय यांनी शिवसेनेच्या ‘लेटरहेड’वरून केली आहे. सकल हिंदु समाजाकडून मात्र याला विरोध करण्यात येत आहे.
श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तान असू नये, यासाठी सकल हिंदु समाजाकडून यापूर्वी आंदोलन करण्यात आले आहे. याविषयी माहिती असूनही कमलेश राय यांनी विशिष्ट समाजाच्या मतांसाठी ही मागणी केली आहे. यामुळे भविष्यात धार्मिक असंतोष, वैमनस्य आणि संघर्ष होऊ शकतो. कब्रस्तान होऊ नये, या मताचे आम्ही नाही; मात्र त्यासाठी पर्यायी जागा देण्यात यावी. जागा उपलब्ध असतांना श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानाची मागणी हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्या सरकारमधील नेत्याने करणे हे दुर्दैवी आहे. श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानासाठी जागा दिल्यास विरोध करू, अशी भूमिका सकल हिंदु समाजाकडून करण्यात आली आहे.