श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १५ ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यात ‘हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा’ ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
कोल्हापूर – भारत जेव्हा पारतंत्र्यात गेला, तेव्हा राष्ट्राचा ध्वज हा भगवा झेंडा होता, मग आपण जेव्हा पारतंत्र्यातून परत स्वातंत्र्यात आलो, तेव्हा भारताचा ध्वज हा भगवा झेंडा का झाला नाही ? तिरंग्या झेंड्याविषयी आम्हाला पूर्णत: आदरच आहे; मात्र सहस्रो वर्षांपासून असलेला, राष्ट्रभक्ती-देशभक्तीची आग उत्पन्न करणारा भगवा झेंडा आम्हाला तेवढाच प्रेरणादायी आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षापासून १५ ऑगस्टला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने झेंडावंदन झाल्यावर ‘हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा’ काढण्यात येतील, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.
ते शिरोली येथील शिवानी मंगल कार्यालय येथे ८ जुलैला झालेल्या सभेत ‘परम पवित्र भगवा ध्वज’ यावर बोलत होते. या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे यांसह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.
पू. भिडेगुरुजी म्हणाले…
१. वर्ष १९३० च्या ‘ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’च्या झालेल्या राष्ट्रीय सभेत ‘स्वातंत्र्यानंतर भारताचा राष्ट्रध्वज हा भगवा असेल’, असा ठराव संमत करण्यात आला होता. असे असतांना वर्ष १९३६ मध्ये झालेल्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वार्षिक अधिवेशनात म. गांधी यांनी ‘राष्ट्रध्वज कोणता असावा ?’, यांसाठी प्रश्न उपस्थित करून एका समितीची स्थापना केली. या समितीने जनमत विचारात घेऊन वर्ष १९४० मध्ये ‘स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज हा भगवाच असावा’, असा अहवाल दिला. असे असतांना केवळ म. गांधी यांच्या हट्टामुळे या देशाचा राष्ट्रध्वज हा तिरंगा करण्यात आला.
२. सध्या देशाचा राष्ट्रध्वज हा तिरंगा असून त्याविषयी आम्हाला पूर्णत: आदर आहे. अनादी काळापासून या देशाचा ध्वज हा भगवा असल्याने तो आम्हाला विलक्षण प्रेरणा देतो. हा ध्वज लावण्यासाठी प्रत्येक गावात किमान २५ फूट उंचीचा ‘हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ’ उभारण्यात यावा. येथे प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी गावातील लोकांना एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना सामूहिक श्रद्धांजली वहाण्याचा कार्यक्रम करावा.
३. आजपर्यंत जेव्हा जेव्हा देशावर संकटे आली, तेव्हा तेव्हा या देशाचे नेतृत्व महाराष्ट्राने केले आहे. पराक्रम, शौर्य गाजवले आहे. त्यामुळे यापुढील काळातही आपल्यावर मोठे दायित्व असून देशाचे नेतृत्व महाराष्ट्रानेच केले पाहिजे !
विशेष
आपल्या मार्गदर्शनात पू. भिडेगुरुजी चीनच्या संदर्भात म्हणाले,
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा भाषणात म्हणाले होते की, चीनमधून भारतात ६८ लाख कोटी रुपयांची निर्यात होते. इतक्या मोठ्या प्रमाणात चीन आपल्या देशातून पैसा घेऊन जातो. असे असतांना भारतीय मात्र चिनी आस्थापनांनी बनवलेले भ्रमणभाष संच वापरण्यात धन्यता मानतात.
२. चीनने आपल्यावर आक्रमण करून १ लाख ८४ सहस्र चौरस मीटर मोठ्या भूभाग कह्यात घेतला आहे. याविषयी आपल्या मनात चीड नसून स्वत्व, स्वाभिमान, देशभक्ती नसल्यामुळे भारतीय नागरिक स्वदेशी अन्न खाण्यास प्राधान्य देण्याऐवजी ‘चायनीज फास्ट फूड’ खाण्यात धन्यता मानतात.