महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या प्रथम अध्यक्षपदी पुणे येथील शेखर मुंदडा !
पुणे – महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ अंतर्गत आयोगाच्या प्रथम अध्यक्षपदी पुणे येथील श्री. शेखर मुंदडा यांची नियुक्ती झाली आहे. ते गेली अनेक वर्षे महा एन्.जी.ओ. फेडरेशनच्या माध्यमातून राज्यभरात गोसंवर्धनाचे काम करत आहेत. महाराष्ट्र मंत्रीमंडळाने गोमांसावर बंदी घालण्यासाठी वर्ष २०१५ च्या कायद्याची कठोरपणे कार्यवाही करण्यासाठी आणि पशूधनाच्या सर्वांगीण भल्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन केला आहे. त्यांच्यासह समितीमध्ये अमरावतीचे सुनील सूर्यवंशी, पुण्यातील संजय भोसले, परभणीचे डॉ. नितीन मार्कंडेय, नागपूरचे सनतकुमार गुप्ता, बुलढाण्याचे उद्धव नेरकर, सिंधुदुर्गचे दीपक भगत या सदस्यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्रात अडीच सहस्रांपेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांचे जाळे सिद्ध करण्यात आणि सहस्रो निष्पाप गायींचे कसायांपासून रक्षण करण्यात श्री. मुंदडा यांची भूमिका पुष्कळ मोठी होती. या निवडीविषयी बोलतांना श्री. शेखर मुंदडा म्हणाले की, यामुळे शासन दरबारी सामाजिक आणि गोरक्षक यांच्या अडचणी सहजतेने सोडवण्यात येतील. पुढील ३ वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.