साधकांची साधना होण्यासाठी अपार कष्ट घेणारे, साधकांना आपला अमूल्य सहवास देऊन आणि दिव्य अनुभूती देऊन घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !
‘वर्ष १९८४ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे माझ्या जीवनात येऊन त्यांनी मला प्रत्यक्ष सहवास दिला. त्यांनी मला पुनःपुन्हा साधना सांगून माझ्याकडून ती करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मला विविध संधी उपलब्ध करून दिल्या. गुरु आणि देव यांवर दृढ श्रद्धा बसण्यासाठी त्यांनी मला दिव्य अनुभूती दिल्या. माझ्या अनेक गंभीर चुका मातेच्या वात्सल्याने पोटात घालून त्यांनी मला कधीही दूर लोटले नाही. आतापर्यंत प.पू. गुरुदेवांनी मला दिलेल्या अनेक अनुभूती आणि माझ्याकडून करवून घेतलेले साधनेचे प्रयत्न मी कृतज्ञतापूर्वक त्यांच्याच चरणी अर्पण करतो.
९ जुलै २०२३ या दिवशी प.पू. डॉक्टरांचा परिचय, प.पू. डॉक्टरांचा सहवास आणि प.पू. डॉक्टर पाचल येथील घरात राहून गेल्यानंतर आलेल्या अनुभूती हा भाग पहिला. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.
(भाग २)
५. अन्य अनुभूती
५ अ. गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी उत्तरदायी साधकाने सांगितलेली छायाचित्रे काढली जाणे आणि मनाने काढलेली छायाचित्रे चांगली न येणे : वर्ष १९९८ मध्ये सनातन संस्थेची गुरुपौर्णिमा पाचलला झाली. त्या वेळी दायित्व असलेल्या साधकाने ‘‘निवडक छायाचित्रे काढावीत’’, असे सांगितले होते; परंतु आम्ही ऐकले नाही आणि अधिक छायाचित्रे काढली. तेव्हा उत्तरदायी साधकाने सांगितली होती, तेवढीच छायाचित्रे चांगली आली आणि अन्य छायाचित्रे चांगली आली नाहीत. त्या वेळी गुरुदेवांनी मला साधनेत आज्ञापालनाचे महत्त्व लक्षात आणून दिले.
५ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या समवेत सुखासनावर बसण्याची चूक करणे आणि तरीही तेथून निघतांना गुरुदेवांनी प्रेमानेे पाठीवरून हात फिरवणे : ‘साधनेत आल्यानंतर मी काही मासांनी श्री. दिलीप आठलेकर यांच्या समवेत मुंबई येथील सेवाकेंद्रात गेलो होतो. तेव्हा श्री. आठलेकरकाका मी आणि श्री. राजाराम पाध्ये (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना घेऊन गुरुदेव सेवा करत असलेल्या ठिकाणी गेले. तेथे गुरुदेव सुखासनावर बसले होते. गुरुदेवांनी आमचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले आणि म्हणाले, ‘‘बसा.’’ मी गुरुदेवांच्या बाजूला सुखासनावर बसलो आणि समोरच्या आसंदीवर श्री. राजाराम पाध्ये बसले. त्या वेळी आम्हाला ‘संत आणि गुरु यांच्याशी कसे वागायचे असते ?’, हे कळत नव्हते. तेव्हा गुरुदेव म्हणाले, “आपल्याला ईश्वरी राज्य आणायचे आहे.” काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हणालो, “ईश्वर राज्य भारतातच येणार कि संपूर्ण जगात येणार ?” त्या वेळी गुरुदेव म्हणाले, “आपल्याला काय करायचे आहे ? आपण भारताचाच विचार करू.”
मी त्यांच्या बाजूला सुखासनावर बसलो, काहीतरी अनावश्यक बोललो, तरीही तिथून निघतांना गुरुदेवांनी मातेच्या वात्सल्याने माझ्या आणि श्री. पाध्ये यांच्या पाठीवरून हात फिरवला. आजही तो देवाचा वात्सल्याचा स्पर्श माझ्या स्मरणात आहे.
५ इ. गुरुदेवांना भेटण्याची इच्छा होताच सभेच्या सेवेसाठी बोलावणे : पाचलला आमच्या घरी ३ दिवस राहून गेल्यानंतर ‘सातत्याने गुरुदेवांची भेट व्हावी आणि त्यांचा सहवास मिळावा’, असे मला वाटत होते. एकदा मला कळले की, ‘प.पू. डॉक्टर मुंबई-गोवा महामार्गाने गोव्याला जाणार आहेत.’ तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट होणार नाही; म्हणून ‘महामार्गाच्या बाजूला झाडावर बसून गुरुदेवांचे आणि त्यांच्या गाडीचे दर्शन घ्यावे’, असा एक वेडा विचार माझ्या मनात आला. त्याच दिवशी श्री. केळुसकर यांचा दूरभाष आला की, ‘प.पू. डॉक्टरांची कराडला सभा आहे. तिथे तुम्ही प्रसाराच्या सेवेला जाऊ शकता का ?’ त्याप्रमाणे आम्ही चौघे पाचलहून कराडला सभेच्या सेवेसाठी गेलो.
५ ई. कनातीच्या फटीतून गुरुदेवांचे दर्शन घेत असतांना ‘गुरु एवढे जवळ आले असतांना फटीतून वाकून बघून काय मिळणार ?’, असे सूक्ष्मातून ऐकू येणे : कराडची सभा जवळच्याच रेठरे बुद्रुक या गावात होती. मला कुठेतरी अंतर्मनात ‘गुरुदेवांचे दर्शन घ्यावे, त्यांच्या वाणीतील चैतन्यमय शब्द ऐकावेत’, असे वाटत होते. कनातीच्या अगदी बारीक फटीमधून मी डोळे किलकिले करून गुरुदेवांना बघण्याचा प्रयत्न करत होतो. सभागृह पूर्ण भरल्यामुळे व्यासपिठावरसुद्धा लोक बसले होते. गुरुदेव व्यासपिठावर आले आणि बसले. ते म्हणाले ‘‘पुढे सरका. गुरु एवढे जवळ आलेले असतांना असे फटीतून वाकून बघून काय मिळणार आहे ?’’ या वाक्याने माझ्या संपूर्ण देहामध्ये रोमांच उभे राहिले. मला काही कळेना. गुरुदेवांचे ते शब्द केवळ मलाच ऐकू आले होते आणि ही आकाशतत्त्वाची अनुभूती होती’, हे नंतर आम्हाला सत्संगात गेल्यावर कळले. ‘गुरुदेव, तुम्ही सर्वव्यापी आहात. प्रत्येक जिवाकडे तुमचे लक्ष असते.’
५ उ. गुरुदेवांच्या चरणांवर मस्तक ठेवण्याची अंतरीची इच्छा जाणून गुरुदेवांनी दोन्ही चरण पुढे करणे आणि मस्तक टेकवून घेणे : मी साधनेत आलो, तरीही ‘विविध प्रकारच्या कौटुंबिक समस्या, मुलांविषयी काळजी’, असे ताण माझ्या मनावर असायचे. त्या वेळी गुरुदेव साधकांना भेटत असत आणि त्यांच्याशी बोलत असत. एकदा मलाही गुरुदेवांना भेटण्याचा योग आला. त्या वेळी मी गुरुदेवांच्या समोर गेलो आणि प्रकर्षाने माझ्या मनात ‘आपल्याला गुरुदेवांच्या चरणांवर मस्तक ठेवायला मिळावे’, असा विचार आला. गुरुदेव त्या वेळी काही साधकांशी बोलत होते. गुरुदेव त्यांना म्हणाले, ‘‘थोडा वेळ थांबा. यांना भेटतो.’’ गुरुदेव माझ्या मनातील इच्छा जाणून म्हणाले, ‘‘तुम्हाला नमस्कार करायचा आहे ना ?’’, असे म्हणून त्यांनी दोन्ही चरण पुढे केले. मी गुरुदेवांच्या दोन्ही चरणांवर मस्तक टेकवले आणि सगळा ताण त्या दिव्य चरणांवर रिक्त केला. तेव्हा मला अत्यंत समाधान मिळाले. ते म्हणाले, ‘‘आता समाधान झाले ना ?’’ मी ‘‘हो’’ म्हटले. गुरुदेव, तुम्ही प्रत्येक थकल्या भागल्या जिवाला क्षणोक्षणी आधार देत आहात, याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे.
५ ऊ. अंतरीचे शल्य जाणून आश्वस्त करणे आणि आधार देणे : एकदा फोंडा, गोवा येथील ‘सुखसागर’ येथे गुरुदेव मला म्हणाले, ‘‘संतांसारखे आपल्याला सर्वांवर प्रेम करता आले पाहिजे.’’ त्यानंतर मी पाचलला आलो. माझ्याकडून त्याविषयी ६ मासांत काहीही प्रयत्न झाले नाहीत. ६ मासांनंतर मला पुन्हा ‘सुखसागर’ येथे सेवेसाठी बोलावले. त्या वेळी माझ्या मनात शल्य होते की, गुरुदेवांनी आपल्याला प्रेमभाव वाढवण्यास सांगितले; परंतु माझ्याकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत. मी सुखसागरला साधकांशी बोलत होतो. तेवढ्यात गुरुदेव काही कामानिमित्त समोर आले आणि मला सांगून गेले, ‘‘काळजी करायची आवश्यकता नाही. योग्य वेळी सगळे होईल.’’
६. प्रार्थना
‘गुरुदेव, आपण माझा अखंड सांभाळ करत आहात, मला वेळोवेळी आधार देत आहात. पूर्वीच्या जन्मांतसुद्धा तुम्हीच माझा सांभाळ केला आहे. माझी साधना होण्यासाठी तुम्ही अपार कष्ट घेतलेत, तुमचा अमूल्य सहवास दिलात, वेळोवेळी आधार दिलात, रक्षण केलेत; परंतु आपल्याला अपेक्षित अशी साधना मी करू शकलो नाही. गुरुदेव, मला केवळ आपल्या चरणांशी अखंड स्थान द्या. ‘आपल्या स्मरणाविना एकही क्षण जगणे नको’, हीच माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
(समाप्त)
– श्री गजानन मुंज (वय ६८ वर्षे), ओरोस केंद्र, सिंधुदुर्ग. (२६.११.२०२२)
|