औरंगजेबाचे समर्थन करणार्यांना पक्षात प्रवेश दिल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !
(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
अहिल्यानगर – भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी पक्षाचे मोठमोठे ‘होर्डिंग’ लावले आहेत. या ‘होर्डिंग’वर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे मोठे छायाचित्र लावलेले आहे. या पक्षाच्या कादिर मौलाना यांनी मध्यंतरी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलतांना काही विधाने केली होती. त्या वेळी औरंगजेबाचे समर्थन केले होते. महापुरुषांचे छायाचित्र लावून औरंगजेबाचे समर्थन करणार्या कादिर मौलानासारख्या लोकांना पक्षात प्रवेश दिला जात असल्यामुळे हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे येथील नगर-मनमाड महामार्गावरील ‘बी.आर्.एस्.’च्या ‘होर्डिंग’वर हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने काळे फासून निषेध करण्यात आला आहे.
कादिर मौलाना याने औरंगजेबाचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारी जनता हे खपवून घेणार नाही, अशी चेतावणी हिंदु राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय अडोळे यांनी दिली आहे. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले असून शहरातील अनेक ‘होर्डिंग’ना या संघटनांनी काळे फासले आहे.