अखंड नामजप, तसेच चिकाटीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्या ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्रीमती वैशाली मुंगळे (वय ७६ वर्षे) संतपदी विराजमान !
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), ८ जुलै (वार्ता.) – श्रीरामाचा अखंड नामजप करून त्याद्वारे इतरांना नामजपाची गोडी लावणार्या आणि चिकाटीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्या ईश्वरपूर येथील श्रीमती मुंगळेआजी यांना ७ जुलै या दिवशी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘संत’ म्हणून घोषित केले. पू. मुंगळेआजींच्या निवासस्थानी चैतन्यमय वातावरणात मुंगळेआजींशी अनौपचारिक संवाद साधतांना संतपदाचे गुपित सद्गुरु स्वाती खाडये यांनी उलगडले. त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. मुंगळेआजी यांच्याविषयी दिलेल्या संदेशाचे वाचन करून सद्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांना पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी पू. मुंगळेआजींशी संवाद साधतांना सद्गुरु स्वाती खाडये यांचा भाव जागृत झाला होता.
ही आनंदवार्ता ऐकल्यानंतर सर्वांना पुष्कळ आनंद झाला. परात्पर गुरुदेवांची कृपा अनुभवतांना उपस्थित सर्वजण भारावून गेले.
या सोहळ्याला पू. मुंगळेआजी यांचे सुपुत्र श्री. संजय, स्नुषा सौ. संगीता, सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या श्रीमती शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सौ. कल्पना थोरात, वैद्या (कु.) शिल्पा बर्गे, सौ. संगीता लिमकर आणि ईश्वरपूर येथील साधक उपस्थित होते.
श्रीरामाच्या नामानुसंधानात मग्न असणार्या श्रीमती वैशाली सुरेश मुंगळे (वय ७६ वर्षे) !
‘ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्रीमती वैशाली सुरेश मुंगळे (वय ७६ वर्षे) या श्रीरामभक्त आहेत. ऑक्टोबर १९८७ मध्ये स्वप्नात एका पोस्टमास्तरने ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, असे लिहिलेला कागद त्यांच्या हातात दिला आणि ‘तो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा अनुग्रह आहे’, असे समजल्यावर त्यांनी १ लक्ष रामाचा जप लिहिला. त्यांनी अनेक ठिकाणी दासबोधाची पारायणे केली. त्यांनी दासबोध मंडळाच्या परीक्षक म्हणून सेवाही केली आहे. त्यांना अनेक संतांचे दर्शन आणि आशीर्वाद लाभले आहेत.
श्रीमती मुंगळे यांच्या मुखात सतत श्रीरामाचे नाम असते. त्या प्रत्येक कृती ‘श्रीराम’, असे म्हणत करतात. त्या सतत ‘रामनामा’त मग्न असतात. त्या इतरांकडूनही रामनामाचा जप करून घेतात. पूर्वी त्यांनी लोकांकडून ८५ सहस्र, इतका रामनामाचा जप करून घेतला आणि स्वतःही केला. श्रीमती मुंगळे यांनी श्री क्षेत्र गोंदवले येथे त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ६३ सहस्र, इतका रामनामाचा जप केला होता. जुलै २०२२ मध्ये गुरुपौर्णिमेला त्यांना ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यांनी तो वाढदिवसही वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी सलग ३ दिवस ७५ सहस्र इतका रामनामाचा जप केला.
काही मासांपूर्वी पाय घसरून पडल्याने त्या अंथरुणाला खिळून आहेत, तरीही त्यांच्या साधनेत खंड पडला नाही. त्या सतत देवाच्या स्मरणात असतात. त्यांचा चेहरा आनंदी, शांत वाटतो. ‘प्रत्येक कृती भगवंत करतो आणि भगवंतामुळेच होते’, असा त्यांचा भाव आहे. तीव्र वेदना होऊनही ‘सतत भगवंताचा ध्यास आणि श्रीरामाचे अखंड अनुसंधान’, यांमुळे त्या आनंदी आहेत. साधनेमुळे त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज आहे.
त्यांचे सुपुत्र श्री. संजय सुरेश मुंगळे हे सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत.
‘ईश्वराशी अनुसंधान ठेवून आजारपणातही आनंदी कसे रहायचे ?’, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणार्या श्रीमती वैशाली सुरेश मुंगळे यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. वर्ष २०१३ मधील रामनवमीला त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. ‘श्रीरामावरील अपार श्रद्धा आणि भाव, सतत नामानुसंधान’ इत्यादी अनेक गुणांमुळे आजच्या शुभदिनी (७.७.२०२३ या दिवशी) त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे अन् त्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत.
‘पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांची पुढील आध्यात्मिक प्रगती अशीच जलद गतीने होवो’, अशी श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.७.२०२३)
पू. मुंगळेआजी खर्या अर्थाने अध्यात्म जगल्या ! – सद्गुरु स्वाती खाडये
पू. मुंगळेआजींनी चिकाटीच्या जोरावर लहानपणापासूनच नामजप चालू केला. त्या सतत श्रीरामाचा नामजप करतात. त्यांनी गुरूंचे आज्ञापालन करून समाजातील भक्तांकडूनही नामजप करवून घेतला. त्या उच्चपातळीचा भाव सातत्याने अनुभवत आहेत. त्यांनी मानवी जीवनाचे सार्थक करून घेतले. पू. मुंगळेआजी या खर्या अर्थाने अध्यात्म जगल्या. त्यांनी अखंड नामजप करून व्यष्टी आणि समष्टी साधनाही केली.
सेवेविषयी आपलेपणा, देहबुद्धी अल्प असणे, प्रीती, गुरूंना अपेक्षित असे करण्याची तळमळ, चिकाटी, तसेच ‘सर्व काही गुरुच करत आहेत’, असा अपार भाव यांसह अन्य गुणरूपी सुगंध त्यांच्यामध्ये असल्याने त्यांची जलदगतीने आध्यात्मिक प्रगती झाली आहे.
पू. वैशाली मुंगळेआजी यांनी दिलेला भावरूपी संदेश !
सर्वकाही गुरूंवरच सोडून द्या ! – पू. वैशाली मुंगळे
कोणतीही सेवा आणि नामजप करतांना चिकाटी, सातत्य अन् मनाचा खंबीरपणा महत्त्वाचा आहे. नामजप करत सेवा केली की, कोणत्याही गोष्टीची आणि वाईट शक्तीची भीती वाटत नाही. ते गुरूंचे आज्ञापालन होते. ‘दिसेल ते कर्तव्य आणि भोगीन ते प्रारब्ध’ याप्रमाणे रहाणे महत्त्वाचे आहे. ‘गुरुच माझी काळजी घेतात’, असे वाटले पाहिजे. ‘तुम्हीच पहा’, असे म्हणून सर्वकाही गुरूंवरच सोडून द्यायला हवे. त्यामुळे साधकांना वाईट शक्तींचा त्रास कधीही होणार नाही. नामजपासह ईश्वराकडे ‘चांगली बुद्धी दे’, अशी प्रार्थना करावी. योगासने करून आरोग्य चांगले ठेवले पाहिजे; कारण आरोग्य चांगले असल्याविना आपण साधना करू शकणार नाही.
कुटुंबियांचे मनोगत…
देवावरील अफाट श्रद्धेमुळे आई कोणत्याही प्रतिकूल प्रसंगात डगमगली नाही ! – संजय मुंगळे (वय ५२ वर्षे), पू. मुंगळेआजी यांचे सुपुत्र
आईची देवावर अफाट श्रद्धा असल्यामुळे जीवनामध्ये कोणताही प्रसंग किंवा संकट आले, तरी ती कधीच डगमगली नाही. नातेवाईक काही ना काही मिळण्याची अपेक्षा ठेवतात; मात्र आईने कधीच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही. कोरोना महामारीच्या भयावह काळात कुणी घराबाहेर पडत नसतांना देवावरील नितांत श्रद्धेमुळे आईने समाजातील व्यक्ती आणि साधक यांना जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा केली. आईचे साधकांवर पुष्कळ प्रेम आहे. तिने नामजप करून स्वतः आनंद मिळवून इतरांनाही तो वाटला.
पू. मुंगळेआजींनी (सासूबाईंनी) चांगले संस्कार करून योग्य दिशाही दिली ! – सौ. संगीता संजय मुंगळे (वय ५१ वर्षे), पू. मुंगळेआजी यांची स्नुषा
माझ्या विवाहानंतर सासूबाईंकडून मला पुष्कळ शिकायला मिळाले. त्या सतत नामजप करत असल्याने माझाही आपोआप नामजप चालू होतो. माझ्या नामजपात वाढ झाली. त्यांच्या शिकवणीतून मला माझ्या चुका समजत होत्या. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून मला दिशा मिळायची. त्यांनी माझ्यावर पुष्कळ चांगले संस्कार केले आहेत. ‘गुरूंवर निष्ठा कशी ठेवायची’, हे मी त्यांच्याकडून शिकले.
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी एका दिवसात १०० वेळा हनुमान चालिसा म्हटली, तसेच त्या २२ घंटे अखंड रामाचा जप करत होत्या. त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यानंतर त्यांची पातळी पुढे वाढणार आहे, हे मला जाणवत होते.
‘प्रयत्न केल्यानंतर देव आपल्याला बळ देतो’, अशी पू. मुंगळेआजींची श्रद्धा आहे ! – शंकर नरूटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)
पू. मुंगळेआजींना संतांविषयी पुष्कळ आदर असून ‘संतांना आवडतील’, असे पदार्थ त्या भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. बाहेर जाऊन काही सेवा करता येत नाही, याविषयी त्यांना पुष्कळ खंत वाटते. आजारपणामुळे त्या अंथरूणाला खिळून असूनही सेवा आणि नामजप करण्याचा त्यांचा उत्साह पुष्कळ आहे. त्यांना काहीही सांगितले, तरी त्या तत्परतेने आणि तळमळीने करतात. त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे. आपण प्रयत्न करत राहिल्यानंतर देव आपल्याला बळ देतो, अशी त्यांची श्रद्धा आहे.
सोहळ्याच्या वेळी आलेले अडथळे !
पू. मुंगळेआजी यांच्या निवासस्थानी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सिद्धता केल्यानंतर अचानक वीज गेली. त्यामुळे साधकांना दीड घंटा वाट पहावी लागली. वीज वितरण विभागाला सतत भ्रमणभाष करूनही वीज लवकर आली नाही. त्यानंतर विद्युत्जनित्र (जनरेटर) आणून सोहळा चालू केल्यावर वीज येत होती; पण थोड्या वेळाने ती पुन्हा जात होती. असे ४ वेळा झाले. सोहळ्याच्या कालावधीत सद्गुरु स्वाती खाडये यांनाही अस्वस्थ आणि थकल्यासारखे वाटत होते. हे सर्व अडथळे वाईट शक्तींच्या त्रासामुळे येत होते. प्रार्थनेद्वारे अडथळ्यांवर मात केल्यावर हा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी पू. मुंगळेआजी म्हणाल्या, ‘‘चांगले कार्य होत असतांना वाईट शक्तींचे अडथळे येत असतात. आपला संघर्ष होता; मात्र हे अडथळे गुरुच दूर करतात.’’
सोहळा झाल्यानंतर चारचाकी वाहनातून साधक जात असतांना त्यांचे वाहन एका खड्ड्यात अडकले.
क्षणचित्रे !
१. पू. वैशाली मुंगळेआजी यांचा विवाह ७ जुलै या दिवशी झाला होता. विवाहाचा दिवस आणि प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मोत्सव (दिनांकानुसार) असलेल्या दिवशी संत म्हणून घोषित केल्याने त्यांना पुष्कळ आनंद झाला.
२. काहीतरी शुभवार्ता असल्याची जाणीव पू. मुंगळेआजींना झाल्याने त्यांनी त्यांचा मुलगा श्री. संजय मुंगळे यांना साधकांना देण्यासाठी पेढे आणून ठेवण्यास सांगितले होते.