राज्यघटनात्मक आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचा संकल्प करा !
सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेमध्ये धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केलेले मार्गदर्शन
३ जुलै २०२३ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने देशभरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
१. गुरुपौर्णिमेचे महत्त्व
गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्याने श्री गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. ज्याप्रमाणे सूर्य उगवला की, अंधाराचा नाश होतो. त्याप्रमाणे श्री गुरूंमुळे आपल्या जीवनातील पाप-ताप रूपी अंधकार नाहीसा होतो. श्री गुरूंमुळे जीवनाकडे पहाण्याची योग्य दृष्टी मिळते, तसेच ‘मी कोण ?’, ‘माझे स्वरूप काय आहे ?’, ‘मनुष्यजन्माचे ध्येय काय आहे ?’, याचे भान होते.
श्री गुरु म्हणजे केवळ देहधारी व्यक्तीमत्त्व नाही, तर ते एक तत्त्व आहे. श्री गुरूंना अपेक्षित अशी साधना आणि सेवा प्रत्येक क्षणी करणे, ही त्यांच्या प्रती खरी कृतज्ञता आहे. सगळ्यांनाच श्री गुरूंच्या सगुण सेवेची संधी उपलब्ध होईल, असे नाही; पण आपल्यापैकी प्रत्येकालाच श्री गुरूंच्या निर्गुण रूपाच्या सेवेची संधी उपलब्ध आहे. सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ आहे. श्री गुरूंच्या निर्गुण रूपाची सेवा म्हणजे अध्यात्मप्रसार ! श्री गुरुचरित्राच्या दुसर्या अध्यायात गुरूंचे नाव ‘वेदधर्म’ असे आहे. थोडक्यात श्री गुरु म्हणजेच सनातन वैदिक धर्म आणि गुरुकार्य म्हणजेच धर्मकार्य !
गुरु-शिष्य परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. या दिव्य गुरु-शिष्य परंपरेने केवळ आश्रम स्थापन केले नाहीत, तर समाजामध्ये धर्म-अध्यात्म-भक्ती यांचा प्रसार करून सामाजिक जीवन उन्नत करण्याचे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे, म्हणजेच धर्मसंस्थापनेचेही कार्य केले. या परंपरेमुळेच हिंदु धर्म अनेक परकीय आघात होऊनही समर्थपणे टिकून राहिला आहे. याची उदाहरणे म्हणजे श्रीकृष्ण-अर्जुन, आर्य चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य, समर्थ रामदासस्वामी-छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी. गुरु-शिष्यांच्या उत्तम उदाहरणांपैकीच एक म्हणजे विद्यारण्यस्वामी आणि हरिहर-बुक्क राय अन् त्यांनी स्थापन केलेले दक्षिण भारतातील विजयनगरचे साम्राज्य !
१ अ. विद्यारण्यस्वामींनी हरिहर आणि बुक्क राय यांच्या माध्यमातून केलेली हिंदु साम्राज्याची निर्मिती : दक्षिण भारतात विद्यारण्यस्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार हरिहर आणि बुक्क राय यांनी एक बलशाली हिंदु साम्राज्य निर्माण केले, ते म्हणजे विजयनगरचे साम्राज्य ! १३ व्या शतकात देहलीमध्ये जुलमी सुलतानशाही चालू होती. देहलीमध्ये राज्य प्रस्थापित झाल्यानंतर अत्याचारी सुलतानाला दक्षिण भारत ‘काबीज’ करण्याची स्वप्ने पडू लागली. त्या काळी इस्लामी आक्रमकांकडून हिंदु राज्यांवर आक्रमणे होत होती. त्यात हिंदु राजाचा पराजय झाला, तर त्याला सुलतानाचे मांडलिक बनवून त्या हिंदु राज्याला सुलतानशाहीच्या अधीन केले जायचे. अशाच प्रकारे हरिहर आणि बुक्क राय यांना देहलीच्या सुलतानाने देहलीला आणले. त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले आणि दक्षिणेतील राज्ये सुलतानशाहीच्या अधिपत्याखाली आणण्याचे दायित्व त्यांच्यावर सोपवले. हरिहर आणि बुक्क राय जेव्हा दक्षिणेत आले, तेव्हा त्यांची अरण्यामध्ये तपस्या करणारे विद्यारण्यस्वामी यांच्याशी गाठ पडली. विद्यारण्यस्वामी हे मोठे संत, तत्त्वज्ञ, चिंतक, तसेच वेदांचे अभ्यासक होते. त्यांनी हरिहर आणि बुक्क यांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदु धर्मामध्ये समाविष्ट करून घेतले. त्यांना राजधर्माचे शिक्षण दिले आणि त्यांच्या माध्यमातून वर्ष १३३६ मध्ये विजयनगरच्या साम्राज्याचा पाया रचला.
विद्यारण्यस्वामींच्या मार्गदर्शनानुसार हरिहर आणि बुक्क यांनी आदर्श शिष्याप्रमाणे राज्यव्यवस्था चालवली. विजयनगरचे साम्राज्य सर्वार्थाने संपन्न होते. विजयनगरच्या साम्राज्याने हिंदूंचे एक शक्तीशाली आणि संपन्न राष्ट्र निर्माण केले, जे पुढे ३०० वर्षे टिकले. या साम्राज्याने हिंदु जनतेचे, तसेच हिंदु अस्मिता, आचार-विचार-संस्कार, श्रद्धा-परंपरा यांचे जिहादी आक्रमकांपासून संरक्षण केले. विद्यारण्यस्वामी यांचे गुरु स्वामी विद्यातीर्थ यांनी विद्यारण्यस्वामींना भारताची संस्कृती आणि समाज यांचे इस्लामी आक्रमणांपासून रक्षण करण्याचे दायित्व दिले होते. विद्यारण्यस्वामींनी विजयनगर साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवून गुर्वाज्ञेचे पालन केले. या उदाहरणातून आपल्याला हे लक्षात येते की, गुरुतत्त्वाने नेहमीच धर्मरक्षणासाठी आपल्या शिष्यांना आज्ञा केली आहे. गुरु-शिष्य परंपरेने धर्मसंस्थापनेचे कार्य कसे केले ? याचे हे उदाहरण आहे. आज अशाच स्वरूपाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्याची आवश्यकता आहे. श्री गुरुतत्त्वाला काळानुसार सध्या आवश्यक असलेले कार्य म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य ! भारत हिंदु राष्ट्र घोषित होण्यासाठी वैचारिक, कायदेशीर, तसेच संघटनात्मक पातळीवर राज्यघटनेच्या दृष्टीने प्रयत्न करणे, ही गुरुसेवाच आहे.
२. राज्यघटनात्मक हिंदु राष्ट्राची आवश्यकता
गेल्या काही दिवसांपासून केवळ भारतात नाही, तर विश्वभरात हिंदु राष्ट्राची चर्चा होत आहे. ‘हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ हिंदूंचे राष्ट्र’, असे नाही. हिंदु राष्ट्र ही कोणतीही राजकीय संकल्पना नाही. हिंदु राष्ट्र ही सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाचा विचार करणारी ईश्वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था आहे. खरे तर वर्ष १९४७ मध्ये जेव्हा धर्माच्या आधारावर फाळणी होऊन मुसलमानांसाठी पाकिस्तान निर्माण झाला, तेव्हा हिंदूंसाठी उर्वरित भारत हा हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवा होता; पण तसे झाले नाही. भारत तेव्हा हिंदु राष्ट्र म्हणून घोषित झाला नाही; मात्र भारताला ‘सेक्युलर’ (निधर्मी) घोषित केल्यामुळे आज सर्वाधिकार अल्पसंख्यांकांना मिळत आहेत आणि बहुसंख्य हिंदूंवर अत्याचार होत आहेत. काश्मीरच नव्हे, तर अनेक राज्यांत हिंदूंचे पलायन चालू आहे. फुटीरतावाद्यांमुळे दुसर्या फाळणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच आज हिंदु राष्ट्राला तळागाळातून, खेड्यापाड्यांतून समर्थन मिळत आहे. ‘हिंदु राष्ट्र’ ही आता चळवळ बनली आहे. ‘हिंदु राष्ट्र’ हीच हिंदूंची ‘मन की बात’ आहे. भारताचा मूळ भाव हा हिंदुत्वाचा आहे. सनातन हिंदु धर्म हाच भारताचा आत्मा आहे. साधनेचे किंवा अध्यात्माचे अधिष्ठान असलेल्या भारताला ‘निधर्मी’ म्हणणे हिर्याला कोळसा म्हणण्यासारखे आहे. स्वामी वरदानंद भारती यांनी म्हटले होते, ‘धर्म आणि राष्ट्र पूर्वीही कधी वेगळे नव्हते, आजही नाहीत. केवळ राजसत्ता वेगळी असू शकते. राजसत्ता वेगळी आणि राष्ट्र वेगळे. राजसत्ता कधी मुसलमान होती, कधी ख्रिस्ती होती; पण हे राष्ट्र मात्र हिंदु राष्ट्रच होते आणि आहे.’
३. सांप्रत काळातील सत्-असत् लढा आणि हिंदु धर्मावरील आघात
‘राज्यघटनेमध्ये भारताला ‘हिंदु राष्ट्र’ असे घोषित करणे’, हा हिंदु राष्ट्र स्थापनेचा एक भाग आहे; पण तेवढेच पुरेसे आहे, असे नाही, तर हे हिंदु राष्ट्र धर्माधिष्ठित असणे आवश्यक आहे. आज नवीन संसद भवनामध्ये पंतप्रधानांनी एक प्रतिकात्मक ‘सेंगोल’ (राजदंड) प्रतिष्ठापित केला आहे. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात खर्या अर्थाने राजधर्म कार्यरत झालेला असेल. अर्थात् हिंदु राष्ट्र हे न्यायाचे राज्य असेल. कुणाला वाटेल, व्यवस्थेत धर्माला स्थान नसेल, भारत निधर्मी असेल, तर काय होईल ? देहात प्राण नसेल, तर देहाचे जे होते, तेच धर्म नसलेल्या राष्ट्राचे होते.
३ अ. मंदिरांवर होत असलेले विविध आघात
पूर्वी इस्लामी आक्रमकांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात केले. मंदिरांवर आक्रमणे केली, देवतांच्या मूर्ती भ्रष्ट केल्या. आज मंदिरांच्या सरकारीकरणाच्या माध्यमातून मंदिर संस्कृतीवर आघात केले जात आहेत. सरकारीकरण झालेल्या देवस्थानांमध्ये भूमीचा अपहार होणे, मंदिरांमध्ये चालणार्या धर्मपरंपरांवर निर्बंध आणणे, असे प्रकार होत आहेत. देशभरात सरकारीकरण केवळ मंदिरांचे झाले आहे; पण अन्य पंथियांच्या एकाही प्रार्थनास्थळाचे नाही ! आंधप्रदेशमधील सरकारने राज्यातील २४ सहस्र मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेण्याचे षड्यंत्र चालू आहे. याचे मूल्य जवळपास १ लाख कोटी एवढे आहे. सरकारीकरण झालेल्या मंदिरांत ना पावित्र्य जपले जाते, ना भक्तांनी अर्पण केलेल्या निधीचा धर्मकार्यासाठी उपयोग होतो. याउलट या देवनिधीचा उपयोग सरकारी कामांसाठी किंवा अन्य पंथियांसाठी केला जातो. मंदिरांच्या सरकारीकरणाच्या जोडीला व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत जाणे, स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली महिलांना प्रवेश निषिद्ध असलेल्या ठिकाणी प्रवेशाचा दुराग्रह धरणे, गाभार्यात घुसण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारचा हेकेखोरपणाही केला जात आहे.
या पुरोगामीपणाच्या विरोधात हिंदु संघटित होऊ लागल्याचे आज चित्र आहे; पण यामध्ये आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होत आहे. हिंदूंच्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आज मंदिरांमध्ये सभ्य आणि संस्कृतीपूरक वस्त्र परिधान करून जायला हवे, यासाठी प्रबोधन करावे लागते. आता त्या पुढे हिंदु धर्मावरील हे आघात रोखण्यासाठी मंदिरांचे पावित्र्य टिकवणे आणि मंदिरे सरकारमुक्त करणे आवश्यक आहे.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
भाग २ : https://sanatanprabhat.org/marathi/701867.html
– (सद्गुरु) नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.