भक्तीयोगाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आणि अन्य योगमार्गियांच्या तुलनेत भक्तीमार्गाने साधना केल्यामुळे संतपद प्राप्त करणार्यांची संख्या अधिक असण्यामागील कारणे !
‘अध्यात्मात ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, हठयोग, शक्तीपातयोग, नामसंकीर्तनयोग आणि भक्तीयोग असे विविध योगमार्ग आहेत. विविध योगमार्गांनुसार साधना करण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि त्यांच्यामुळे विकसित होणारे गुण पुढीलप्रमाणे आहेत. ४ जुलै २०२३ या दिवशी या योगमार्गांविषयीचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.
(भाग २)
४ इ. भक्तीमार्गी जिवातील भावाचे रूपांतर भक्तीत आणि प्रेमभावाचे रूपांतर प्रीतीत झाल्यामुळे त्याच्या साधनेचा प्रवास सकाम साधनेकडून निष्काम साधनेकडे होऊन त्याला संतपद लवकर प्राप्त होणे
भक्तीयोगाने साधना करणार्या जिवामध्ये भगवंताप्रती बालकभाव, समर्पणभाव, दास्यभाव, सख्यभाव, सेवाभाव इत्यादी अनेक प्रकारचे भाव असतात. या भावामुळे त्याची पातळी अल्प असली, तरी भावामुळे त्याच्यावरील मायेचे किंवा अज्ञानाचे आवरण दूर होऊन तो भगवंताच्या अनुसंधानात चटकन आणि सहजतेने राहू शकतो. त्याचप्रमाणे भक्तीमार्गी जिवामध्ये प्रेमभावही असतो. त्यामुळे तो स्वत:च्या कोशात न अडकता इतरांचा विचार अधिक प्रमाणात करत असतो. अशा प्रकारे भक्तीमार्गी जीव इतरांचा विचार करून समष्टी रूपी ईश्वराच्या अनुसंधानात रहात असतो. भाव आणि प्रेमभाव या दोन्ही गुणांमुळे भक्तीमार्गी जिवाची व्यष्टी साधना चांगल्या प्रकारे होऊन त्याचा अहं लवकर न्यून होऊ लागतो. परिणामी त्याच्यातील भावामुळे त्याला ईश्वराच्या चैतन्यलहरी आणि प्रेमभावामुळे ईश्वराच्या आनंदलहरी अधिक प्रमाणात ग्रहण करता येतात. त्याच्यातील भावामुळे ‘प्रत्येक कर्माचे कर्तेपणा स्वत:कडे घेणे’ आणि प्रेमभावामुळे ‘इतरांकडून अनेक अपेक्षा करणे’, हे अहंचे सूक्ष्म पैलू गळून पडतात. त्यामुळे भक्तीमार्गी जिवाची सकाम साधना संपुष्टात येऊन त्याची निष्काम साधना चालू होते. त्यामुळे त्याच्यातील व्यष्टी साधनेच्या स्तरावरील भावाचे रूपांतर भक्तीत आणि समष्टी साधनेच्या अंतर्गत प्रेमभावाचे रूपांतर प्रीतीत होऊन तो लवकर संतपद प्राप्त करतो. भक्तीमार्गी जिवातील भाव आणि भक्ती या गुणांमुळे तो भगवंताच्या सूक्ष्म रूपाशी अन् प्रेमभाव आणि प्रीती या गुणांमुळे तो भगवंताच्या व्यापक रूपाशी लवकर एकरूप होतो. त्यामुळे भगवंताला असा भक्त अतिशय प्रिय असतो.
उदा. प.पू. भक्तराज महाराज यांच्यातील निस्सीम भक्तीमुळे त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला भरवलेला पेढा त्याने त्वरित ग्रहण केला. त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराज यांच्यातील निस्सीम भक्तीमुळे जेव्हा ते देवघरातील पितळ्याच्या मूर्तीच्या बाळकृष्णाला लोणी भरवत होते, तेव्हा पितळ्याच्या मूर्तीतील बाळकृष्णाने त्याचा उजवा हात वर उचलला. त्याचप्रमाणे संत एकनाथ महाराज यांच्यातील प्रीतीमुळे त्यांना वाळवंटात पाण्यासाठी तडफडत पडलेल्या गाढवातील भगवंताच्या अंशाची अनुभूती आली आणि त्यांच्यामध्ये करुणाभाव जागृत झाला. त्यामुळे त्यांनी काशीहून आणलेल्या गंगेचे पाणी तहानलेल्या गाढवाला पाजले. तसेच जेव्हा एक कुत्रा भाकरीचा तुकडा घेऊन पळाला, तेव्हा ‘कुत्र्यातील भगवंताच्या अंशाला कोरडी भाकर खावी लागू नये’, म्हणून त्याला तूप देण्यासाठी संत नामदेव तुपाची बुदली घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावत गेले.
४ ई. भक्तीमार्गी जिवामध्ये असलेल्या सेवावृत्तीमुळे सेवकभाव आणि दास्यभाव जागृत झाल्यामुळे त्यांचा अहं न्यून होणे
प्रगट (स्थूल आणि व्यक्त) आणि अप्रगट (सूक्ष्म आणि अव्यक्त) असे अहंचे दोन प्रमुख प्रकार आहेत. अन्य योगमार्गीयांच्या तुलनेत भक्तीमार्गी जिवामध्ये सेवाभाव अधिक प्रमाणात असतो. तसेच तो इतरांची, गुरूंची आणि देवाची सेवा मनोभावे करत असतो. त्यामुळे त्याचा ‘प्रगट’ स्वरूपातील अहं लवकर न्यून होतो. जस जशी त्याची पातळी वाढत जाते, तस तसे त्याच्यातील सेवाभावाचे रूपांतर ‘दास्यभक्ती’त किंवा ‘सेवाभक्ती’त होऊन त्याच्यातील ‘अप्रगट’ स्वरूपातील अहं लवकर न्यून होतो. अशा प्रकारे अन्य योगमार्गी जिवांच्या तुलनेत भक्तीमार्गी जिवांचा अहं लवकर न्यून होतो. काही वेळा भक्तीमार्गी जिवावरील अविद्येचे आवरण दूर न झाल्याने त्याला ‘आपण श्रेष्ठतम भक्ती करतो’, असा भक्तीचा सूक्ष्म अहं निर्माण होऊ शकतो; परंतु त्याच्यावरील श्रीगुरुकृपेमुळे त्याचा सूक्ष्म अहंही नष्ट होतो.
४ उ. समर्पणभाव आणि कृतज्ञताभाव यांच्यामुळे भक्तीमार्गी जिवामध्ये भगवंताप्रतीचा संपूर्ण शरणागतभाव जागृत होऊन त्याच्या अहंचा लय होणे
भक्तीमार्गी जीव भगवंताला लवकर शरण जाऊन त्याची काया, वाचा आणि मन यांनी केलेली सर्व कर्मे तो भगवंताला सहजरित्या अर्पण करतो. त्यामुळे या कर्मांच्या कर्तेपणाचा अहंकार न्यून होतो. त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म भगवंताच्या इच्छेने होत असल्यामुळे त्याच्याकडून झालेल्या चांगल्या कर्माचा कर्तेपणा तो स्वत:कडे न घेता त्याचे श्रेय भगवंताला देतो. त्यामुळे त्याचा भगवंताविषयी कृतज्ञताभाव निर्माण होतो. समर्पणभाव आणि कृतज्ञताभाव यांच्यामुळे भक्तीमार्गी जीव स्वत:चा मान, प्रतिष्ठा, प्रतिमा, कर्तेपणा इत्यादी सर्व काही सोडून भगवंताला संपूर्ण शरण जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये संपूर्ण शरणागतभाव निर्माण होऊन त्यांच्या अहंचा लय होतो, उदा. संत तुकाराम महाराज गरिबीत आयुष्य जगत असूनही ते भगवंताप्रती कृतज्ञ होते. त्यांचे प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित होते. जेव्हा देहू येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये त्यांच्या कीर्तनात रंगलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी मोगल सैनिक आले, तेव्हा संत तुकाराम महाराज श्री विठ्ठलाला संपूर्ण शरण गेले. तेव्हा त्यांची आर्तभावाने झालेली प्रार्थना ऐकून श्री विठ्ठल त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने शिवरायांची अनेक रूपे निर्माण केली. त्यामुळे मोगल सैनिकांना शिवाजीचे मूळ रूप कुठे आहे ? हे कळले नाही आणि खर्या शिवाजी महाराजांना मोगल सैनिकांच्या वेढ्यातून बाहेर पडता आले. या उदाहरणावरून सर्व प्रकारच्या भावांमध्ये शरणागतभाव सर्वश्रेष्ठ असल्याची प्रचीती आली.
४ ऊ. भक्तीमार्गी जिवाला परेच्छेने वागायची सवय लागल्यामुळे त्याचा मनोलय लवकर होऊन त्याने संतपद लवकर प्राप्त करणे आणि उर्वरित आयुष्य ईश्वरेच्छेने जगणे
भक्तीमार्गी जीव स्वेच्छा न जोपासता परेच्छेने वागण्यास प्राधान्य देतो. त्यामुळे त्याचा मनोलय लवकर होऊन त्याची वाटचाल संतपदाकडे होते. संतपद प्राप्त केल्यावर भक्तीमार्गी जिवाला त्याच्यातील भक्तीमुळे ईश्वरेच्छेचे ज्ञान लवकर प्राप्त होते आणि तो त्याचे उर्वरित आयुष्य पूर्णपणे ईश्वरेच्छेने जगू लागतो.
४ ए. भक्तीयोगातील विविध टप्पे
देवावरील विश्वास, श्रद्धा, व्यक्त भाव, अव्यक्त भाव, सगुण भक्ती, निर्गुुण भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असे विविध आध्यात्मिक टप्पे आहेत.
४ ए १. भक्तीयोगातील विविध टप्पे, संबंधित आध्यात्मिक पातळी (टक्के) आणि भक्ताला मिळणार्या विविध प्रकारच्या मुक्ती
४ ऐ. भक्तीयोगातील साधनेचे प्रकार आणि स्तर
भक्तीयोगातील साधनेचे ‘कर्मकांड, उपासनाकांड आणि भक्तीकांड’, असे विविध स्तर अन् प्रकार आहेत. त्याचप्रमाणे भक्तीयोगांतर्गत सकाम साधना आणि निष्काम साधना असेही दोन प्रमुख प्रकार आहेत. ३० ते ४५ टक्के पातळीचा भक्तीयोगी साधक कर्मकांडांतर्गत ‘मंत्रयोग’ अशी सगुण स्तरावरील साधना करत असतो. त्यामुळे त्याच्या साधनेचा प्रवास स्थूलातून सूक्ष्माकडे चालू होतो. जेव्हा त्याची पातळी आणखी वाढून ती ५० टक्के होते, तेव्हा तो उपासनाकांडाच्या अंतर्गत नामसंकीर्तनयोगानुसार नामजप करू लागतो. जेव्हा त्याची पातळी वाढून ती ७० टक्के होते, तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रवास उपासनाकांडाकडून भक्तीकांडाकडे चालू होतो. तेव्हा त्याच्या साधनेचा प्रवास सूक्ष्माकडून सूक्ष्मतराकडे चालू होतो. या पातळीला प्रथम तो भगवंताची सगुण भक्ती करू लागतो. त्यामुळे त्याला सगुण स्थूलदेहधारी संत किंवा गुरु आणि भगवंताचे सगुण रूप अधिक आवडू लागते. त्यामुळे त्याला सलोकमुक्ती, सरूप मुक्ती इत्यादी विविध प्रकारच्या मुक्ती मिळू लागतात. त्यानंतर त्याच्या सगुण भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीगुरु त्याच्यावर कृपावंत होतात. त्यामुळे त्याच्या भक्तीची वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे चालू होते आणि तो निष्काम आणि निर्गुण भक्ती करू लागतो. अशा प्रकारे भक्तीमार्गी संतांची साधनेतील वाटचाल मुक्तीकडून मोक्षाकडे चालू होते.
(संदर्भ – सनातनचा ग्रंथ : ‘भाव आणि भावाचे प्रकार’)
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(८.६.२०२३)
भाग ३ : https://sanatanprabhat.org/marathi/701904.html
(क्रमशः रविवारच्या अंकात)
|