पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ७७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारची अनुमती !
पुणे – जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ७७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने अनुमती दिली आहे. या निधीतून गड-दुर्ग पर्यटन आणि तीर्थस्थळे यांचा विकास होणार असून भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी दिला आहे, तर गड संवर्धनासाठी ४५ कोटींचा आराखडा सिद्ध केला आहे. शिवकालीन गडांच्या संवर्धनासाठी ३०० कोटींची तरतूद केली आहे. वढु बुद्रुक येथील स्मारकाच्या विकासासाठी २१९ कोटी २४ लाख रुपयांच्या विकास आराखड्यातील निविदा प्रक्रिया चालू केली आहे. अष्टविनायक विकासासाठी ४३ कोटी २३ लाख रुपयांचा आराखडा संमतीसाठी सादर केला आहे, तर श्री क्षेत्र जेजुरी विकासासाठी १०९ कोटी ५७ लाख रुपयांच्या विकास आराखड्यातील मंदिर संवर्धन कामाची प्रक्रिया चालू झाली आहे. याचसमवेत वनपर्यटनाला चालना देण्यासाठी बिबटे सफारी चालू करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.