मूर्तीकारांना नि:शुल्क जागा आणि घरगुती स्तरावर शाडूच्या मूर्तीचे बंधन !
मुंबई महानगरपालिकेकडून शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींसाठी प्रोत्साहन !
मुंबई – गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेने यावर्षी शाडूच्या मातीच्या आणि पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. या दृष्टीने पर्यावरणपूरक मूर्ती घडवणार्या मूर्तीकारांना विनाशुल्क जागा देण्याची घोषणा महानगरपालिकेने केली आहे, तसेच घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या मातीची आणि पर्यावरणपूरकच असावी, असे बंधन महानगरपालिकेकडून घालण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या या भूमिकेचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. (गणेशोत्सवाच्या काळात पृथ्वीवर श्री गणेशतत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. शाडूच्या मातीमध्ये हे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होते. त्याचा लाभ भाविकांना होतो. त्यामुळे अधिकाधिक आध्यात्मिक लाभ मिळण्यासाठी भाविकांनी शाडूच्या मातीची गणेशमूर्ती स्थापन करावी ! – संपादक)
विशेष म्हणजे नवरात्रोत्सवाच्या समाप्तीपर्यंत मूर्तीकारांना या जागेचा विनाशुल्क उपयोग करता येणार आहे. याविषयी मूर्तीकारांनी महानगरपालिकेला वचनपत्र देणे बंधनकारक आहे. मूर्ती बनवण्याच्या अनुमतीसाठी, तसेच मूर्तींची साठवणूक करण्यासाठी मूर्तीकारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. ७ जुलैपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी अर्ज केल्यास पोलीस, अग्निशमनदल आदींच्या अनुमतीसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
अनुमतीपत्राचा नमुना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अर्जासमवेत १ सहस्र रुपये अनामत रक्कम भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व घरगुती मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करावे, तसेच उंची अल्प असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील मूर्तीचे विसर्जनही कृत्रिम तलावांमध्ये करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. (श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यामध्ये केल्यामुळे मूर्तीमधील पवित्रके सर्वदूर पसरतात. त्याचा आध्यात्मिक लाभ सर्वांना होतो. मूर्ती शाडूची मातीची असल्यास त्यातून प्रदूषणही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे करण्याची भूमिका घ्यावी ! – संपादक)