श्री. विनायक देशपांडे यांना वर्ष २०२३ चा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार प्रदान !
पुणे – येथील सुपर्ण कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने वर्ष २०२३ चा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार श्री. विनायक काशिनाथराव देशपांडे (निवृत्त व्यवस्थापकीय संचालक, टाटा प्रोजेक्टस आणि वरिष्ठ सल्लागार, नवीन संसद भवन) यांना प्रदान करण्यात आला. ६ जुलै या दिवशी झालेल्या या कार्यक्रमास श्री. विनायकराव डावरे, निवृत्त विंग कमांडर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर, कार्याध्यक्ष श्री. अनिल शिदोरे आणि कार्यवाह श्री. शरद गरभे उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ सार्वजनिक काकांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाला. त्यानंतर निवृत्त विंग कमांडर श्री. विनायकराव डावरे यांचा सत्कार पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर श्री. विनायक देशपांडे यांना २०२३ चा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी श्री. विनायक देशपांडे यांनी पुरस्कारासह मिळालेले ५ सहस्र रुपये पुढील कार्यासाठी संस्थेला परत केले. त्यानंतर श्री. विनायक देशपांडे यांनी ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’च्या साहाय्याने भारताच्या नवीन संसद भवनाच्या उभारणीचे काम कशा पद्धतीने करण्यात आले, त्यामध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणार्या विविध बारकाव्यांचा कशा पद्धतीने अभ्यासपूर्ण समावेश करण्यात आलेला आहे, तसेच हे सर्व करत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेळोवेळी कसे अमूल्य मार्गदर्शन लाभले याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर यांनी मनोगत व्यक्त केले.