श्री तुळजाभवानीमातेच्या अभिषेक पूजेचे शुल्क ५० वरून ५०० रुपये !
व्हीआयपी दर्शनासाठीही २०० रुपये मोजावे लागणार !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानीमातेच्या अभिषेक पूजेच्या शुल्क आकारणीत १० पट वाढ करण्यात आली आहे. पूर्वी अभिषेक पूजेसाठी ५० रुपये शुल्क आकारले जात होते ते आता ५०० रुपये केले आहे, तसेच विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शनासाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी विश्वस्त कोट्यातील अतीमहनीय व्यक्तींना विनामूल्य प्रवेश दिला जात होता. मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी १० जुलै २०२३ पासून या निर्णयाची कार्यवाही करण्याचा आदेश मंदिर संस्थानचे व्यवस्थापक, तहसीलदार यांना दिला आहे.
आई तुळजाभवानीच्या अभिषेकासाठी आता 50 रुपयांऐवजी 500 रुपये शुल्क, तुळजाभवानी मंदिर समितीचा निर्णयhttps://t.co/lXUzGJVeg7 #tuljapur
— ABP माझा (@abpmajhatv) July 8, 2023
या निर्णयामुळे संस्थानने तातडीने मंदिराच्या संकेतस्थळावर पुढील अभिषेक पूजेचे ‘ऑनलाईन बुकिंग’ थांबवले आहे. या निर्णयामुळे पुजारी मंडळींमध्ये पुष्कळ अप्रसन्नता असून त्यांनी निर्णय मागे घेण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. या वेळी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, धनंजय लोंढे, अविनाश गंगणे, किशोर गंगणे, कुमार इंगळे आदींची उपस्थिती होती. मंदिर संस्थानच्या विश्वस्तांची १९ मे २०२३ या दिवशी बैठक पार पडली होती. या बैठकीत ठराव क्र. ७ अन्वये अभिषेक पूजेच्या शुल्कात दहापट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरवाढीचा निर्णय दीड मासांपूर्वीच घेण्यात आला होता; मात्र मंदिरातील पुजारी आणि पुजार्यांचे प्रतिनिधी यांना याविषयी कोणतीच माहिती नव्हती.
संपादकीय भूमिकामंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय. मंदिरांच्या संदर्भात योग्य निर्णय होण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यातच हवीत ! |